Next
‘विस्ताराने गायला जाणारा राग ऐकण्याचा सराव करायला हवा’
BOI
Friday, December 15, 2017 | 06:18 PM
15 0 0
Share this article:

स्वरसंवाद’ कार्यक्रमात सहभागी झालेले आरती अंकलीकर – टिकेकर, महेश काळे आणि श्रीनिवास जोशी
पुणे : ‘भारतीय शास्त्रीय संगीतातील विलंबित ख्यालासारखे संगीत जगात दुसरे कुठलेही नाही. ते टिकवून ठेवणे हा आपला धर्म आहे. राग जेव्हा विस्ताराने गायला जातो आणि गायकाबरोबर श्रोतेही स्वतः तो राग होतात. हा अनुभव अत्यंत सुंदर असतो. त्यामुळे एका तासाचा राग ऐकण्याचा प्रेक्षकांनी सराव करायला हवा,’ असे मत जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांनी व्यक्त केले.

‘केवळ राग गाणारे तेजस्वी गायक तयार व्हावेत यासाठी त्यांच्यासमोरील आर्थिक अडचणीही हलक्या होणे गरजेचे असते. ही समाजाची जबाबदारी असून मोठ्या व्यावसायिक समुहांनी त्यांना पाठबळ द्यायला हवे,’ असेही त्यांनी सांगितले. 

‘आर्य संगीत प्रसारक मंडळा’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमात शुक्रवारी  ‘स्वरसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आरती अंकलीकर – टिकेकर, प्रसिद्ध गायक महेश काळे आणि श्रीनिवास जोशी यांनी ‘सर्जनाची आव्हाने’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले.

आरती अंकलीकर- टिकेकर म्हणाल्या, ‘लोकांना आवडतो म्हणून कलाकाराने दहा मिनिटांचा राग का गावा? रागसंगीत गाणारा गायक हा केवळ राग गात नसतो, तर तो संगीताची परंपरा पुढे नेत असतो. विस्तृतपणे गायल्या जाणाऱ्या रागाच्या सुरांमध्ये तरंगणे हा सुंदर अनुभव आपण का बरे गमवावा? त्यामुळे श्रोत्यांनीही एक तासाचा राग ऐकण्याचा सराव करावा. मैफलीच्या ठिकाणी पंधरा मिनिटे आधी पोहोचून शांतपणे बसावे आणि मग समोरच्या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे सांगावेसे वाटते.’

‘रागाच्या तानांमधून गायकाचे कौशल्य दिसते, परंतु रागाचे खरे सौंदर्य आलापीत असते. ‘आलापी’, ‘मिंड’ या खोलवर जाऊन अनुभव घ्यायच्या गोष्टी श्रोत्यांच्या समोर येणे आणि टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. विस्ताराने गायला जाणारा राग जगाच्या अंतापर्यंत टिकून राहायला हवा,’ असे त्या म्हणाल्या. या वेळी आरती अंकलीकर- टिकेकर आणि महेश काळे यांनी स्वरचित बंदिशीही ऐकवल्या.

महेश काळे म्हणाले, ‘अभिषेकी बुवांकडे मिळालेल्या शिक्षणात पेशकश नव्हे, तर साधना हे अंग अधिक होते. रियाजाच्या वेळातच गायक खऱ्या अर्थाने सर्जनशीलता जपत असतो. मैफलीतील सादरीकरण हे हिमनगाचे केवळ टोक असते. स्वैर अंग हे शास्त्रीय संगीताचे वैशिष्ट्य आहे. जोपर्यंत माणसात उत्स्फूर्तपणा टिकून राहील, तोपर्यंत शास्त्रीय संगीत टिकून राहील आणि समयोचित वाटत राहील.’ 

तसेच, ‘षड्ज’ या कार्यक्रमात रजत कपूर दिग्दर्शित ‘तराना’  आणि पी. के. साहा दिग्दर्शित ‘सारंगी – दी लॉस्ट कॉर्ड’ हे लघुपट दाखविण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search