Next
अन्यायाविरोधात आवाज उठविणारी संवेदनशील ‘कविता’
BOI
Friday, September 28, 2018 | 10:11 PM
15 0 0
Share this article:

आपल्या साहित्यातून चाकोरीबाहेरचे विषय मांडणाऱ्या लेखिका कविता महाजन यांचे २७ सप्टेंबर २०१८ रोजी पुण्यात निधन झाले. अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या बंडखोर, पण तितक्याच संवेदनशील लेखिका आणि चित्रकार असे त्यांचे वर्णन करता येईल. स्त्रियांचे प्रश्न त्यांनी लेखनातून मांडले; पण तरीही स्त्रीवादी लेखिका असा शिक्का त्यांच्यावर बसला नाही. कारण त्यांच्या लेखनात वैविध्य होते. त्यांच्या साहित्याचा चाहता असलेल्या आणि पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने त्यांच्याबद्दल लिहिलेला हा लेख...
.........
‘त्या’ पहिल्यांदा भेटल्या त्या आमच्या गावात. व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी त्यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. त्या व्याख्यानाची एक गंमतच आहे. पुण्यावरून येणाऱ्या एका विचारवंतांनी (?) ऐन वेळी साक्षात्कार झाल्याने आपल्याला पुणे-वसई हा प्रवास करणं शक्य नसल्याचं कळवलं होतं. व्याख्यानमालेचा पहिलाच दिवस असल्याने आता काय करायचे, असा प्रश्न आयोजकांपुढे उभा राहिला. मग एकदम कोणालातरी कविता महाजनांची आठवण झाली. कारण गेल्या अनेक वर्षांपासून त्या वसईतच राहत होत्या. आयोजकांनी त्यांना झाला प्रकार सांगून विनंती केली. त्यांनी आयोजकांचा हिरमोड होऊ नये म्हणून येण्याचं मान्य केलं. 
व्याख्यान सुरू करण्याआधी त्या हसत हसत म्हणाल्या, ‘आज इथे मी बदली कामगार असतो तशी बदली वक्ता म्हणून उभी आहे.’ आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. आपल्या नेहमीच्या शैलीत त्या बोलल्या. त्यांच्या बोलण्यातून तळमळ जाणवत होती. समाजव्यवस्था आणि राजकारण यांविषयी त्यांनी आपली मतं प्रखरपणे मांडली. त्या वेळी त्यांची शैली मला अजिबात आक्रमक वाटली नाही; पण तरी त्यांचे शब्द धारदार होते. त्यांचं काही साहित्य त्याआधी वाचलेलं होतं; त्यामुळे त्या जे काही मांडत होत्या, ते प्रभावीपणे माझ्यापर्यंत पोहोचत होतं. ती त्यांची झालेली पहिलीच प्रत्यक्ष भेट. नंतर त्या फेसबुकवर त्यांच्या लिखाणातून, कवितांमधून आणि सुंदर चित्रांमधून भेटत राहिल्या. 

काल संध्याकाळी (२७ सप्टेंबर २०१८) अचानक त्यांच्या जाण्याची बातमी आली आणि मन सुन्न झालं. काही घटना लगेच पटतच नाहीत. साहित्यावर भरभरून प्रेम करणारी लेखिका अचानक एक्झिट घेते हे पटणारंच नव्हतं. साहित्याच्या विशाल पटावर या लेखिकेनं अनेक विषय हाताळले. कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य आणि काही पुस्तकाचे अनुवाददेखील त्यांनी केले. ‘ब्र’सारख्या कादंबरीमधून त्यांनी स्त्रियांच्या जाणिवा आणि वेदना मांडल्या. त्या वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. स्त्रियांच्या प्रश्नांविषयी त्यांना आस्था होती आणि त्यांनी ते प्रश्न आपल्या लेखनातून मांडले; पण तरीही स्त्रीवादी लेखिका असा शिक्का त्यांच्यावर बसला नाही. कारण इतर विषय आणि साहित्यप्रकारही त्यांनी अभ्यासू वृत्तीने हाताळले. त्यांच्या कविता मानवी मनाचा वेध घेणाऱ्या आहेत. त्यांचे शब्द कधी वेदना भरून काढतात, तर जगण्याला भिडणाऱ्या त्यांच्या काही कविता मनात बसून राहतात. 

कविता महाजन यांचं मन एकाच वेळी संवेदनशील आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारं आहे, हे हळूहळू जाणवत गेलं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बंडखोरपणा होताच; तो त्यांच्या लेखनातून आणि कवितेतून वेळोवेळी व्यक्त होत गेला. कलेतून बंडखोरी कशा प्रकारे व्यक्त होते, हे ‘ग्राफिटी वॉल’सारख्या पुस्तकातून त्यांनी मांडलं आहे. त्यांची निरीक्षण करण्याची शक्ती किती जबरदस्त आहे, ते मला हे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात आलं. 

गेली अनेक वर्षे त्या समाजजीवनाचा अभ्यास करत होत्या. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी जीवनशैलीचा त्यांनी अभ्यास केला होता. अभ्यास करता करता एखादं आदिवासी गाणं त्याच्या अर्थासहित त्या फेसबुकवर टाकत असत. त्यांनी लेखनातून जशा या समाजजाणिवा व्यक्त केल्या, तशाच त्या चित्रातूनदेखील चितारल्या. त्यांना चित्रकलेची विशेष आवड होती. शासकीय कला महाविद्यालयातून त्यांचं शिक्षण झालं होतं. स्वतःच्या बालसाहित्यातील पुस्तकांसाठी त्या चित्रं काढत असत. त्यांची सवय म्हणजे काही चित्रं त्या लगेच फेसबुकवरही पोस्ट करत. त्या चित्रातल्या व्यक्ती, निसर्ग, पशु-पक्षी आणि त्यांचे रंग, हावभाव इतके ताजे आणि ठाशीव असत, की ते पाहिल्यानंतर छान वाटत असे. 

समाजजीवन आणि निसर्ग यांविषयी त्यांनी भरभरून लिहिलं. माणसं हा त्यांच्या लिखाणाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्यातली लेखिका ही संशोधक वृत्तीची होती; मात्र त्यांचं लेखन सुटसुटीत, वाचकाला सहज समजेल असं होतं. त्यांची निसर्गाची निरीक्षणं, चित्रं इतकी सुंदर असत, की ते वाचल्यानंतर प्रसन्न वाटत असे. गेली अनेक वर्षे त्या निसर्गसंपन्न अशा वसईत राहत होत्या. वसईच्या निसर्गाने आणि समुद्राने त्यांना नक्कीच भुरळ घातली असणार. घरातल्या बाल्कनीत फुललेल्या कृष्णकमळाचा आनंद फोटोसहित फेसबुकवर शेअर करणारी ही बंडखोर लेखिका जगण्याच्या किती अंगांवर भरभरून प्रेम करत होती हे लक्षात येतं. 

इतका सगळा आनंद वाचकांपर्यंत फेसबुकच्या माध्यमातून पोचवणारी ही लेखिका मृत्यूच्या चार दिवस आधी याच फेसबुकवर लिहिते, ‘माणसं गेली, की उत्सुकतेनं ढीगभर काव्यात्मक श्रद्धांजल्या वाहणारे आपण... जी माणसं हयात आहेत, त्यांच्यासाठी कधी, कुठे आणि किती असतो? उत्सुकतेचं भाषिक कवच काढून फेकलं, तर आत काय सापडतं? दुटप्पीपणा सापडला, तर आपण स्वतःच काय करतो?’ मन सुन्न होतं हे वाचून. काही घटनांचे अर्थ किती विचित्र असतात. प्रस्थापित समाजव्यवस्थेविरोधात ‘ब्र’ उच्चारण्याची धमक ज्या लेखकांमध्ये असते, अशा लेखकांच्या जाण्याचं दुःख फार मोठं असतं; पण त्यांच्या साहित्यातून त्या कायमच भेटत राहतील आणि वंचितांना जगण्याचं बळ देत राहतील, हे नक्की... 

असंच बळ देणाऱ्या त्यांच्या एका कवितेच्या या ओळी...

उसळायचं... पुन्हा उभं राहायचं, धडपडायचं 
जे शाबूत राहिलंय ते सारं गोळा करायचं 
मातीत तूस मिसळलं, की घट्टपणा येतो घड्याला 
तसंच साऱ्या वाताहती स्वतः कालवत, मिसळत 
मळत घडवत न्यायचा नवा आकार... 
आणि ओलेपणीच नक्षी कोरावी तशी लिहून ठेवावी 
एखादी कविता, नव्या वाताहतीला सामोरं जाण्यासाठी...

- सिद्धार्थ म्हात्रे
ई-मेल : mhatresiddharth87@gmail.com

(सिद्धार्थ मूळचा वसईकर असून, सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.)

(कविता महाजन यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search