Next
जावे पुस्तकांच्या गावा...
BOI
Wednesday, April 26, 2017 | 03:21 PM
15 8 0
Share this article:

'पुस्तकांचं गाव' म्हणून नावारूपाला येत असलेलं भिलार गाव

भाषेचे संवर्धन ही खरे तर आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या उपायययोजना राबवल्या जात आहेत, ही आनंदाचीच बाब आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने महाबळेश्वरजवळच्या भिलार गावात ‘पुस्तकांचं गाव’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची ओळख....
................

सातारा जिल्ह्यात पाचगणीजवळ असलेल्या ‘भिलार’ या गावाची ओळख आजवर स्ट्रॉबेरीचे गाव अशी होती. आता ‘पुस्तकांचे गाव’ अशी नवी ओळखही या गावाला मिळणार आहे. या दृष्टीने तेथील तयारी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. गावाची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे. येथे प्रत्येक घरी पुस्तकांचा ठेवा असेल, तसेच वाचण्यासाठी विशिष्ट प्रकारची आसनव्यस्था असेल. या ठिकाणी येणारे पर्यटकही वाचण्यासाठीच येतील. विविध प्रकारचे साहित्यिक उपक्रम या ठिकाणी चालणार आहेत.
 
पुस्तकाचे गाव तयार करण्यासाठी येथे घरे निवडण्यात आली आहेत. सर्व प्रकारची पुस्तके एकाच ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सर्व साहित्यिक, लेखकांनी दिवाळी अथवा इतर सुट्टीच्या कालावधीत या गावात जाऊन तेथील वाचकांशी संवाद साधल्यास वाचक आणि लेखकांचे नाते अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे. आगामी काळात सर्व शाळांनी वर्षातून एकदा तरी पुस्तकांच्या या गावात विद्यार्थ्यांची सहल न्यावी आणि विद्यार्थ्यांना या अनोख्या गावाची माहिती द्यावी, असेच हे गाव तयार होत आहे.
निवडलेल्या मराठी साहित्य प्रकारानुसार प्रत्येक घरात ८०० ते एक हजार पुस्तके ठेवण्यात येत आहेत. उदा. पर्यटकांना मराठी भाषेतील प्रवासवर्णन किंवा काव्य या प्रकारचे साहित्य वाचायचे असल्यास एकाच घरात निवडक ८०० ते एक हजार पुस्तके उपलब्ध असतील. ती पुस्तके त्यांनी तिथेच वाचायची. त्यासाठीची जागा, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्थाही त्याच घरात केलेली असेल. पर्यटकांना ही पुस्तके मोफत वाचता येतील. परंतु निवास व भोजनाचा खर्च त्यांना करावा लागेल. असे हे अनोखे पुस्तकांचे गाव येत्या एक मे रोजी आपल्यासाठी सज्ज होत आहे. एकदा तरी आवर्जून या गावाला भेट द्यायलाच हवी.

काही उल्लेखनीय बाबी 

- भिलार हे निसर्गसंपन्न गाव असून, ते स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे.
- गावात, मराठीतील विविध साहित्यप्रकारानुसार दिशादर्शक फलक लावले जातील.
- मराठी भाषेतील विविध साहित्य छटांनुसार गावातील जवळजवळ तीस घरांची निवड. तिथे निवास आणि भोजन व्यवस्थाही उपलब्ध असेल.
- प्रत्येक साहित्यप्रकारासाठी एक घर.
- पर्यटन तर होईलच. शिवाय स्ट्रॉबेरीसोबतच वाचनाचा आनंदही लुटता येणार आहे.
- पुस्तकांच्या गावामधील तीस घरांना पुस्तकांच्या अनुषंगाने त्या घरांच्या आवश्यकतेनुसार सुशोभीकरण करण्यात आले आहे.
- देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे.
 
15 8 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search