Next
‘मधुर भावा’ने सेवा करणारा वृद्धाश्रम
BOI
Friday, October 12, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:ज्येष्ठांची अत्यंत आपुलकीने काळजी घेणारा ‘मधुरभाव’ हा वृद्धाश्रम पुण्यामध्ये पिंपळे-निलख परिसरात आहे. ‘डिमेन्शिया’ग्रस्त ज्येष्ठांसाठी विशेष सोयीही इथं आहेत. फार्मसी उद्योगात मोठ्या पदावर काम केलेल्या अंजली देशपांडे मधुरभाव वृद्धाश्रमाच्या संस्थापक-संचालिका आहेत. जगण्याचं स्वातंत्र्य, पॅलिएटिव्ह केअर, शस्त्रक्रियेनंतरची सेवा ही या वृद्धाश्रमाची वैशिष्ट्यं आहेत. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज त्या वृद्धाश्रमाबद्दल जाणून घेऊ या.
.................
जगण्याचा वाढलेला वेग, त्यापेक्षा अधिक वेगाने होणारे बदल यामुळे आपलं जगणं यांत्रिक होऊन बसलंय. रात्री घरात एकत्र जेवायलाही आपल्याला वेळ नसतो. अशा परिस्थितीत आपल्या आजारी आई-वडिलांच्या शुश्रुषेसाठी कुठून वेळ काढणार, असा स्वाभाविक प्रश्न सध्याच्या नोकरदार मुला-मुलींना पडतो. त्यात काही चूकही नाही. जगण्याच्या शर्यतीत ‘थांबला तो संपला’ हाच सध्याचा नियम झाला आहे; पण यामुळे बिछान्यावर पडून असलेल्या आजारी ज्येष्ठांचे मात्र खूप हाल होतात. अशा ज्येष्ठांची अत्यंत आपुलकीने काळजी घेणारा ‘मधुरभाव’ हा वृद्धाश्रम पुण्यामध्ये पिंपळे-निलख परिसरात आहे. ‘डिमेन्शिया’ग्रस्त ज्येष्ठांसाठी विशेष सोयीही इथं आहेत. 

साल २०१२. ठिकाण पुणे (पेन्शनरांचे). आपल्या नव्या वृद्धाश्रमात आजी-आजोबा येतील, या आशेने एक मध्यमवयीन बाई वाट बघत होत्या. कॅडिला फार्मास्युटिकल्ससारख्या प्रतिष्ठित कंपनीत बिझनेस सेल्स मॅनेजर पदावर काम केलेल्या एका बाईंनी स्वप्न बघितले पुण्यात एक सुसज्ज, सुशील (कर्मचारी वर्ग असलेला) आणि स्वच्छ असा वृद्धाश्रम सुरू करण्याचे. त्यांनी वृद्धाश्रम सुरू केलाही; पण सहा महिने झाले तरीही कोणी तिकडे फिरकलेच नाही. अखेर अहमदाबादहून एक आजोबा वृद्धाश्रमात आले. या आजोबांची मनोभावे सेवा करता येणार या कल्पनेने त्या बाई व त्यांचे मदतनीस आनंदून गेले. त्याच वृद्धाश्रमात आता ५७ आजी-आजोबा आनंदात राहतात आणि त्यांची सेवा करण्यासाठी ४० जणांचा प्रशिक्षित स्टाफ दिवस-रात्र तत्पर असतो. ही गोष्ट आहे ए. जे. फाउंडेशनच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या मधुरभाव वृद्धाश्रमाची.फार्मसी उद्योगात मोठ्या पदावर काम केलेल्या अंजली देशपांडे मधुरभाव वृद्धाश्रमाच्या संस्थापक-संचालिका आहेत. त्यांच्या वडिलांना डिमेन्शिया झाला. घर, नोकरी, वडिलांची सेवा अशी तिहेरी भूमिका सांभाळताना अंजली यांना जाणीव झाली, की एकतर वृद्धांना कोणी जवळ करत नाही. त्यातून आजारी वृद्धांना तर कोणीच विचारत नाही. वडील दोन वर्षे अंथरुणाला खिळलेले असताना अंजली यांनी त्यांची सेवा केली. आपल्या वडिलांना अशी ‘असिस्टेड मेडिकल हेल्प’ मिळू शकली नाही, याची खंत त्यांच्या मनात खोलवर राहिली. सर्व वैद्यकीय सेवांसह ज्येष्ठांची आपुलकीने व प्रेमाने काळजी घेणारा वृद्धाश्रम सुरू करण्याचा निश्चय त्यातूनच त्यांनी केला. 

वृद्धाश्रम सुरू करण्याआधी त्यांनी मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मधून वृद्धकल्याणशास्त्राची (Gerontology) पदविका पूर्ण केली. त्याचबरोबर पुण्यातील व अमेरिकेतील वृद्धाश्रमही पाहिले. निरीक्षणात त्यांच्या असं लक्षात आलं, की पुण्यात अनेक वृद्धाश्रम आहेत; पण वैद्यकीय सेवांसह काळजी घेणारे वृद्धाश्रम खूपच कमी आहेत. तसेच या वृद्धाश्रमांमध्ये स्वच्छता खूपच कमी आहे. या सगळ्या प्रश्नांवर उत्तर ठरेल असा ‘मधुरभाव’ हा वृद्धाश्रम अंजली यांनी २०१२मध्ये सुरू केला. मधुकर आणि माधुरी भावे या आपल्या आई-वडिलांच्या आठवणीप्रीत्यर्थ त्यांनी वृद्धाश्रमाला ‘मधुरभाव’ हे नाव दिलं. पहिल्यांदा एका इमारतीत तीन फ्लॅटमध्ये असलेला ‘मधुरभाव’ नंतर पिंपळे-निलखमधल्या एका स्वतंत्र बंगल्यात गेला. आजी-आजोबांना कायमस्वरूपी घर मिळावं, या भावनेतून अंजली यांनी बंगल्यासमोरच वृद्धाश्रमासाठी तीन मजली इमारत विकत घेतली. इथे ३० आजी-आजोबा राहतात. ‘मधुरभाव’मध्ये ३६५ दिवस, २४ तास वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, स्वतंत्र शाकाहारी स्वयंपाकघर, ज्येष्ठांसाठी सभागृह, विविध खेळ उपलब्ध आहेत. ‘मधुरभाव’मध्ये सर्व सण उत्साहाने साजरे केले जातात. 

‘डिमेन्शिया’ग्रस्तांची सेवा ही खासियत
हिंजवडी-मारुंजीजवळ नेरे गावात ‘मधुरभाव’चा दुसरा वृद्धाश्रम आहे. तिथे सध्या २७ ज्येष्ठ राहतात. यापैकी बहुतांश जण ‘डिमेन्शिया’ग्रस्त आहेत. डिमेन्शिया किंवा अल्झायमर झालेल्या रुग्णांची काळजी घेणं हे खूप कठीण काम असतं. विस्मरणामुळे हे रुग्ण काही क्षणांपूर्वी केलेली कृतीही विसरून जातात. तेच ते बोलतात. माणसांना ओळखत नाहीत. अशा रुग्णांना ‘मधुरभाव’चा प्रशिक्षित स्टाफ आपुलकीने सांभाळतो. ‘डिमेन्शिया’ग्रस्तांसाठी प्रेम, आपुलकी हीच औषधे आहेत. 

त्याबाबत देशपांडे म्हणाल्या, ‘डिमेन्शियाच्या रुग्णांना सांभाळणं अवघड काम आहे. त्यामुळे नोकरी करणारी मुलं-मुली ते करू शकत नाहीत. त्यांना आमच्याकडे ठेवतात. आम्ही या रुग्णांची घरच्यासारखी काळजी घेतो. ‘डिमेन्शिया’ग्रस्तांची सेवा ही ‘मधुरभाव’ची खासियत झाली आहे. भविष्यात २०० ‘डिमेन्शिया’ग्रस्त रुग्णांसाठी ‘डिमेन्शिया व्हिलेज’ उभारण्याचा आमचा मनोदय आहे.’मेळघाटमधील तरुणांना प्रशिक्षण व रोजगार
‘मधुरभाव’मध्ये मेळघाटमधील तरुण-तरुणींना वैद्यकीय सेवा करण्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्यांना स्टायपेंडसह ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ मिळते. गेल्या दोन वर्षांत ५० जणांनी हे प्रशिक्षण घेतले असून, या सर्वांना नोकरी मिळाली आहे. मेळघाटसारख्या दुर्गम भागातून आलेल्या तरुणांना प्रशिक्षित करून कौशल्याधारित नोकरीची संधी उपलब्ध करण्याचे सामाजिक कामही हा वृद्धाश्रम करतो. 

जगण्याचं स्वातंत्र्य 
‘मधुरभाव’मध्ये दाखल झाल्यावर ज्येष्ठांना स्वतंत्रपणे जगता येतं. घरभाडं, बिलं भरणं, हाउसकीपिंग, औषधं आणणं, वैद्यकीय तपासण्या करणं, नर्सिंग या व इतर कोणत्याही गोष्टींची चिंता त्या व्यक्तीला किंवा रुग्णाला करायची गरज भासत नाही. ‘मधुरभाव’ आपल्या घरापासून दूर असलेलं दुसरं घरच आहे, अशी भावना अनेक ज्येष्ठ व्यक्त करतात. शस्त्रक्रियेनंतरची सेवा
एखाद्या ज्येष्ठाची शस्त्रक्रिया झाली, तर त्यानंतर त्याची काळजी घेण्याचा प्रश्न उभा राहतो. ‘मधुरभाव’ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ड्रेसिंग, फिजिओथेरेपी, आंघोळीसाठी मदत, जेवण आणि दैनंदिन आयुष्यात गरजेच्या गोष्टी करायला जी मदत लागते, ती ‘मधुरभाव’मधील स्टाफ पुरवतो. शस्त्रक्रियेनंतर तीन महिने सेवा करण्याचे पॅकेज उपलब्ध आहे. 

पॅलिएटिव्ह केअर 
पॅलिएटिव्ह केअर हे ‘मधुरभाव’चं एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना विश्रांतीची खूप गरज असते. ते दीर्घकाळ रुग्णालयामध्येही राहू शकत नाहीत. तसंच त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांची घरी काळजी घेणं शक्य नसते. अशा सर्व रुग्णांची ‘मधुरभाव’मध्ये काळजी घेतली जाते. उच्च रक्तदाब, संधिवात, तसंच ‘बेड सोअर्स’ झालेल्या रुग्णांचीही इथं सेवा केली जाते.मैत्री डे-केअर सेंटर 
वेळ कसा घालवायचा, हा ज्येष्ठांसमोरचा सर्वांत मोठा प्रश्न असतो. त्यासाठी मैत्री डे-केअर सेंटर चालवले जाते. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ज्येष्ठ ‘मधुरभाव’च्या वृद्धाश्रमात राहू शकतात. त्यांच्यासाठी बुद्धिबळ, कॅरम यांसारखे अनेक खेळ इथं आहेत. दुपारचं जेवण झाल्यावर ते विश्रांतीही घेऊ शकतात. इतर ज्येष्ठांशी गप्पा मारू शकतात. त्यांचा वेळ आनंदात जातो. सायंकाळी ते आपापल्या घरी जाऊ शकतात.

घरी नर्सिंग सेवा
अनेकदा ज्येष्ठांना आपलं घर सोडून वृद्धाश्रमात जायचा संकोच वाटतो. अशा ज्येष्ठांसाठी ‘मधुरभाव’तर्फे घरी नर्सिंग सुविधाही दिली जाते. ‘मधुरभाव’चा प्रशिक्षित, विश्वासार्ह कर्मचारीवर्ग घरी जाऊन ही सेवा देतो. ‘आमच्या वृद्धाश्रमाची सर्व कामं देणग्यांवर चालतात. देणगीदाराला ८० जी कायद्यांतर्गत करसवलत मिळते. तसंच वृद्धाश्रमात येऊन आजी-आजोबांशी गप्पा मारणं हीदेखील गरज आहे. त्यामुळे ज्यांना ज्या पद्धतीनं मदत करणं शक्य आहे, ती त्यांनी करावी,’ असं आवाहन देशपांडे यांनी केलं.

आधुनिक उपचार पद्धतींमुळे माणसांचं आयुर्मान वाढलं आहे. त्यामुळे भविष्यात वृद्धाश्रांची गरज वाढणार आहे. ज्येष्ठांना सन्मानानं जगता यावं यासाठी प्रयत्नशील असलेला मधुरभाव वृद्धाश्रम नक्कीच आदर्श ठरू शकेल. 

संपर्क : अंजली देशपांडे,
संस्थापक-संचालिका, मधुरभाव वृद्धाश्रम 
मोबाइल : ९८५०० १६६६९
पत्ता : मधुरभाव ब्लिस, सर्व्हे नंबर २८/२/२३, समर्थ कॉलनी, जगताप डेअरीजवळ, पिंपळे-निलख, पुणे – ४११०२७.
वेबसाइट : http://www.ajmedicalfoundation.com
ई-मेल : ajfoundation05@gmail.com

- अमोल अशोक आगवेकर 
ई-मेल : amolsra@gmail.com

(मधुरभाव वृद्धाश्रमाच्या संस्थापक संचालिका अंजली देशपांडे यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 138 Days ago
It meets a need which is growing all the time . And not only in big towns,
0
0
Netra Vivek Deshpande About 342 Days ago
अतिशय स्तुत्य उपक्रम, मलाही तिथे येऊन काही मदत काम करायला आवडेल. अंजु तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे
0
0

Select Language
Share Link
 
Search