मुंबई : ‘आपण जर पाहिले, तर बहुतेक गाणी ही त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या धून आणि मेलडीमुळे गाजलेली दिसतात. अशी अनेक गाणी आहेत, ज्यामधील शब्दांचे अर्थ कित्येकांना ठाऊक नाहीत, पण ती गाणी आज हिट आहेत.’ ८४ वर्षीय राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार गुलजार यांनी गाण्याबद्दल त्यांचा अनुभव शेअर केला.

निमित्त होते संगीतासाठी आठ ऑस्कर पुरस्कार मिळवलेल्या चित्रपट ‘स्लमडॉग मिलियनेयर’ च्या दशकपूर्तीचे. यानिमित्त मुंबईत नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात या चित्रपटाची संपूर्ण संगीत टीम उपस्थित होती. या चित्रपटाच्या संगीताबाबत सांगतानाही गुलजार म्हणाले, ‘‘जय हो..’ गाणे हिट ठरले, ते ए. आर. रेहमान यांनी दिलेल्या धूनमुळे. या गाण्याचे बोल खूप कमी लोकांना माहित असतील. इथेही तुम्ही पाहिले धून ही शब्दांपेक्षा वरचढ ठरली.’
‘स्लमडॉग मिलियनेयर’ चित्रपटातील ‘जय हो..’ हे गाणे म्हणजे संगीतकार ए. आर. रेहमान, गीतकार गुलजार आणि गायक सुकविंदर सिंग या त्रयींच्या एकत्रित प्रयत्नाचा चमत्कार आहे. याव्यतिरिक्त ‘दिल से’, ‘गुरू’, ‘बंटी और बबली’ या चित्रपटांमधून या तिघांनी एकत्र काम केले आहे.

ए. आर. रेहमान यांच्या मागील दोन दशकांतील कारकीर्दीबद्दल गुलजार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी ए. आर. रेहमान यांच्यासाठी सुफियाना लिहिण्यास सुरुवात केली. तो त्यांच्यासोबत माझ्याही करिअरचा टर्निंग चाप्टर ठरला. तत्पूर्वी, ‘हमने देखी है, उन आखों की महकती खूशबू..’, यांसारखे मी केलेले काम कल्पनेत, भावविश्वात रमणारे असे होते. त्यानंतर सुफियाना गाण्यांच्या विश्वात आम्ही पाऊल ठेवले आणि त्यातला पहिला चित्रपट होता ‘दिल से..’ ‘दिल से’ची गाणी खूप गाजली. माझी आधीची गाणी आणि ‘दिल से’मधील ‘ए अजनबी..’ या दोन्हींतला फरक तुम्ही पाहू शकता..’