Next
पत्रकारांसाठी ‘म्हाडा’तर्फे घरकुल योजना
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BOI
Monday, June 24, 2019 | 01:03 PM
15 0 0
Share this article:

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ‘स्मृतिचित्रे’ या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी पत्रकार संघाचे सरचिटणीस पांडुरंग सांडभोर, संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, खासदार गिरीश बापट आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे : ‘पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच सकारात्मक असून, ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पत्रकारांचा घराचा प्रश्नही महत्त्वाचा असून, ‘म्हाडा’च्या विशेष योजनेच्या माध्यमातून पुण्यातील पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


येथील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पुणे पत्रकार संघाच्या वर्ष १९४० ते २०१९ या आठ दशकांचा चित्रमय प्रवास असणाऱ्या ‘स्मृतिचित्रे’ या स्मरणिकेचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते रविवारी, २३ जून रोजी झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, आमदार जगदीश मुळीक, मेधा कुलकर्णी, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते.

 ‘ज्येष्ठ पत्रकारांसाठीच्या सेवानिवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पुढच्या महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्या पत्रकारांना याचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. ‘पुणे प्रेस क्लबसाठीही जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू’, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

ते पुढे म्हणाले, ‘आपल्या देशात अनेक संस्था निर्माण झाल्या, त्या मोठ्या झाल्या; मात्र त्याच्या इतिहासाचे जतन करण्याचे काम आपल्याकडे फारसे झाले नाही. परदेशात मात्र संस्थांच्या इतिहासाचे योग्य प्रकारे जतन करण्यात येते. संघर्षाच्या काळात, तसेच पुढील पिढीसाठी हा ऐतिहासिक दस्ताऐवज उपयुक्त ठरतो. पुणे श्रमिक पत्रकार संघाला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा ऐतिहासिक वारसा आहे. हा सर्व इतिहास संग्रहीत करून तो चित्ररूपाने प्रदर्शीत करण्याचा पत्रकार संघाचा हा उपक्रम अभिनव आहे.’

‘पत्रकारिता व्यवसायासमोर आज अनेक अडचणी आहेत, त्यातच नवमाध्यमांच्या उदयाने हे क्षेत्र अधिकच आव्हानात्मक बनले आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या कल्याणासाठी त्यांचा समावेश शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये करण्यात आला आहे. याचा लाभ राज्यातील पत्रकारांना होणार आहे,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पत्रकारितेला अधिक प्रगल्भ करण्यासाठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन विशेष अभ्यासदौरे आणि अभ्यासक्रम सुरू करण्याचे आवाहनही फडणवीस यांनी केले.
 
खासदार गिरीश बापट म्हणाले, ‘पुणे श्रमिक पत्रकार संघाचा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठा वाटा आहे. पत्रकार हा लोकशाहीचा आधार आहे. समाजाच्या दुःखाला न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार करत असतात. पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इतिहास आदर्शवत असून, पुणे प्रेस क्लबच्या उभारणीत शहरातील सर्व लोकप्रतिनिधी सक्रीय सहभाग नोंदवणार आहेत.’ 

जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘आषाढी वारी २०१९’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले.

‘आषाढी वारी २०१९’ मार्गदर्शिकेचे प्रकाशन

पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आणि नागरिकांना वारीच्या संदर्भात अद्ययावत माहिती मिळावी, महत्त्वाचे फोन नंबर उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘आषाढी वारी २०१९’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले, तर सरचिटणीस पांडुरंग सांडभोर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रशांत आहेर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत हंचाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पुणे शहर आणि परिसरातील ज्येष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search