Next
माधुरी पुरंदरे, तुकडोजी महाराज, रवींद्र गुर्जर
BOI
Sunday, April 29, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

बालसाहित्याबरोबरच अनुवाद, नृत्य, नाटक, गायन आणि चित्रकला अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या माधुरी पुरंदरे , ‘ग्रामगीता’ लिहून प्रसिद्ध झालेले संत तुकडोजी महाराज  आणि लोकप्रिय अनुवादक रवींद्र गुर्जर यांचा २९ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
...
माधुरी पुरंदरे 

२९ एप्रिल १९५२ रोजी जन्मलेल्या माधुरी बळवंत पुरंदरे या अतिशय दर्जेदार आणि सहजसोप्या लिखाणातून लहान मुलांना वाचनाची गोडी लावून, पुस्तकांकडे ओढून नेणाऱ्या लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्या उत्तम गायिका, तसंच नाट्यअभिनेत्रीही आहेत. 

त्यांच्या बालसाहित्यातल्या योगदानाबद्दल त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. बालसाहित्याव्यतिरिक्त त्यांनी नृत्य, नाटक, लेखन, गायन आणि चित्रकला अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. जां जीओनो, गी द मोंपासा, सॅम्युएल बेकेट, मोलीये यांसारख्या उत्तमोत्तम फ्रेंच लेखकांचं साहित्य मराठीत अनुवादित करत असतानाच त्यांनी ‘बलुतं’ आणि ‘स्त्री-पुरुष तुलना’ यांसारख्या काही पुस्तकांचं मराठीतून फ्रेंचमध्येही भाषांतर केलं आहे. 

आमची शाळा, बाबाच्या मिश्या, हॅनाची सुटकेस, हात मोडला, जादुगार आणि इतर कथा, कोकरू, फ्लॅट नंबर थर्टी सिक्स, लिहावे नेटके, मासोळी आणि चिमुकलं पाखरू, मोठी शाळा, मुखवटे, पाचवी गल्ली, शाम्याची गंमत व इतर कथा, सिल्व्हर स्टार, सुपरबाबा, Yash Big School, Yash Guest, झाडं लावणारा माणूस, चित्रवाचन, कंटाळा, मामाच्या गावाला, मोतिया, सख्खे शेजारी, वाचू आनंदे, व्हिन्सेट व्हॅन गॉग, परी मी आणि हिप्पोपोटॅमस, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(माधुरी पुरंदरे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
..........


माणिक बंडोजी ठाकूर 

२९ एप्रिल १९०९ रोजी यावलीमध्ये (अमरावती) जन्मलेले माणिक बंडोजी ठाकूर हे अंगभूत गुणांमुळे आणि विवेकनिष्ठ जीवनदृष्टीमुळे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ या नावाने ओळखले जाणारे गेल्या शतकातले महान प्रबोधनकार होते. 

त्यांनी मराठी आणि हिंदीतून काव्यरचना केली आहे. ते गांधी आणि विनोबांचे शिष्य होते. त्यांनी खंजिरी घेऊन भजन करत देशभर हिंडून आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रबोधन केलं.

स्त्रीचं स्थान हे कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राष्ट्रव्यवस्थेमध्ये महत्त्वाचं आहे, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिलं. स्त्रीला अज्ञानात आणि बंधनात ठेवणं कसं अन्यायकारक आहे हे त्यांनी प्रभावीपणे पटवून दिलं. ‘ईश्वरभक्ती करतानाच दुबळ्यांची सेवाही करा,’ असं ते नेहमी सांगत. 

‘ग्रामगीता’ हा त्यांचा ग्रामविकासावरचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
 
१० नोव्हेंबर १९६८ रोजी मोझरीमध्ये त्यांचं निधन झालं.
........... 

रवींद्र गुर्जर

२९ एप्रिल १९४६ रोजी नगरमध्ये जन्मलेले रवींद्र गुर्जर हे अत्यंत लोकप्रिय अनुवादक म्हणून ओळखले जातात. तब्बल ४५ वर्षं ते साहित्य क्षेत्राशी निगडित आहेत. ‘पॅपिलॉन’ या पहिल्याच अनुवादित पुस्तकामुळे अफाट प्रसिद्धी मिळालेल्या गुर्जरांची आजपावेतो ३५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

त्यांनी केलेले सत्तर दिवस, गॉडफादर, सेकंड लेडी, बँको, कोमा, चार्ली चॅप्लिन, अल्बर्ट आइन्स्टाइन, इस्राइलची गरुडझेप, दी स्पाय हू केम इन फ्रॉम दी कोल्ड, दी पेलिकन ब्रीफ, फर्स्ट टू डाय, सुवर्णयोगी यांसारखे एकाहून एक सरस अनुवाद तुफान लोकप्रिय ठरले आहेत. त्यांनी ‘पर्यटन,’ ‘आपले स्वास्थ्य,’ ‘संतकृपा,’ ‘धर्मश्री’ यांसारख्या मासिकांचं आणि काही पुस्तकांचं संपादन केलं आहे. तसंच स्वतःची ‘गायत्री’ नावाची प्रकाशनसंस्था काढून शंभरावर पुस्तकंही प्रकाशित केली आहेत.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि रेखा ढोले फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने त्यांना मानचिन्ह आणि २५ हजार रुपये असा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तसंच कोल्हापूरच्या विमेन्स फाऊंडेशनतर्फे त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

(रवींद्र गुर्जर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search