Next
बॅ. नाथ पै यांच्यासारखे उमदे समाजवादी व्यक्तिमत्त्व दुर्मीळ
समाजवादी विचारसरणीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूकाका अवसरे यांचे उद्गार
BOI
Wednesday, January 16, 2019 | 01:26 PM
15 0 0
Share this article:

बाबूराव अवसरे यांच्याकडून पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना अनुराधा आचरेकर.

मालवण :
‘बॅ. नाथ पै यांच्यासारखे उमदे समाजवादी व्यक्तिमत्त्व होणे आता दुर्मीळच आहे. बॅ. नाथ पै प्रथमच मालवण शहरात आले, त्या वेळी आम्ही त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. आपल्या पहिल्याच भाषणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली होती,’ अशी आठवण समाजवादी विचारसरणीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूकाका अवसरे यांनी आचरे येथे बॅ. नाथ पै नगरीत बॅ. नाथ पै स्मृती सिंधुदुर्ग जिल्हा स्तर वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करताना सांगितली.

व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वित्त आणि बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष प्रकाश कुशे, मालवणच्या नाथ पै सेवांगणचे सचिव लक्ष्मीकांत खोबरेकर, मालवण नगर वाचनालयाचे प्रमुख ग्रंथपाल संजय शिंदे आणि स्पर्धा संयोजक रामकृष्ण रेवडेकर होते. 

आपल्या भाषणात बाबूकाका म्हणाले, ‘भारताच्या इतिहासामध्ये राजकारणात समाजवादी विचारसरणीचा उदय होताच जी झुंजार व्यक्तिमत्त्वे निर्माण झाली, त्यात नाथ पै हे नाव प्रमुख होते. समाजवाद पुढे जावा हे आंतरिक धोरण आणि महत्त्वाकांक्षा मनात धरून जे धडपडणारे तरुण पुढे आले त्यापैकी नाथ पै होते. त्यांनी आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने केवळ कोकणच नव्हे, तर देशवासीयांचीही मने जिंकली.’ 

प्रकाश कुशे, जेरॉन फर्नांडिस, लक्ष्मीकांत खोबरेकर, संजय शिंदे यांचीही या वेळी भाषणे झाली. याच कार्यक्रमात बाबूकाका अवसरे यांच्या हस्ते बॅ. नाथ पै प्रशंसोद्गार स्पर्धेचे पारितोषिक वितरणही झाले. साने गुरुजी कथामालेने ही स्पर्धा आयोजित केली होती. बाबूकाका अवसरे यांच्या हस्ते विजेत्यांना बॅ. नाथ पै प्रशंसोद्गार स्मृतिचिन्ह, रोख रक्कम आणि प्रशंसोद्गार प्रमाणपत्र देण्यात आले. मध्यंतरी मालवण येथील बॅ. नाथ पै. सेवांगण येथे ‘मातीच्या भांड्यांवरील रंगकाम’ हे कृतिसत्र महिलांसाठी आयोजित करण्यात आले होते. बॅ. नाथ पै आज असते, तर ग्रामीण भागातील महिलांनी रंगविलेले हे माठ पाहून ते काय म्हणाले असते, याची कल्पना करून प्रशंसोद्गार लिहिण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तीच ही बॅ. नाथ पै प्रशंसोद्गार स्पर्धा. 

स्पर्धेचा निकाल  (अनुक्रमे पहिले तीन क्रमांक)
- अनुराधा आचरेकर (आचरे)
- उज्ज्वला आनंद महाजन (मुणगे-कारिवणेवाडी)
- सुगंधा केदार गुरव (आचरे)
 
विजेत्यांपैकी उज्ज्वला महाजन यांनी आपले विचार प्रकट केले. प्रास्ताविक माधवराव गावकर यांनी केले, तर आभार परशुराम गुरव यांनी मानले. सूत्रसंचालन अनुराधा आचरेकर यांनी केले. 

या कार्यक्रमाला सदानंद कांबळी, प्रकाश पेडणेकर, बबनराव वझे, अनिल करंजे, रवींद्र वराडकर, तात्या भिसळे, कुमार कदम आदी साने गुरुजी कथामाला आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

(बॅ. नाथ पै स्मृती सिंधुदुर्ग जिल्हा स्तर वक्तृत्व स्पर्धेचा निकाल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search