Next
कसलेल्या गायकांच्या सादरीकरणाने रंगला ‘सवाई’चा चौथा दिवस
BOI
Monday, December 17, 2018 | 12:18 PM
15 0 0
Share this story

दत्तात्रय वेलणकर

पुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात दत्तात्रय वेलणकर यांच्या सुमधुर गायनाने झाली. त्यांनी राग ‘मुलतानी’, तसेच राग ‘पटदीप’मधील ‘नैया पार करो’ ही रचनाही त्यांनी सादर केली. ‘संत भार पंढरीत’ या अभंगाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना प्रशांत पांडव (तबला), अविनाश दिघे (हार्मोनियम), सोमजीत लाल व शरत् देसाई (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

सावनी शेंडे-साठ्ये

त्यांच्यानंतर प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे-साठ्ये यांचे गायन झाले. त्यांनी राग ‘मधुवंती’ने सुरुवात करून ‘जागे मोरे भाग’, ‘री नंदलाल घर मोरे आएं’, ‘श्री अंबिका जगदंब भवानी’ अशा सुश्राव्य रचना सादर करत रसिकांची दाद मिळवली. त्यांनी सादर केलेली पं. भोलानाथ भट यांची रागमाला; तसेच शोभा गुर्टू यांचा ‘सैया रूठ गएं मैं मनाती रही’ हा दादरा यांसदेखील रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. त्यांना केदार पंडित (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम), प्रीती पंढरपूरकर व अक्षता गोखले (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

विवेक सोनार

त्यानंतर बासरीवादक विवेक सोनार यांनी बासरी वादनातून राग ‘वाचस्पती’ रसिकांसमोर उलगडला. त्यांनी आलाप जोड, तसेच मत्त ताल व तीन तालातील सुरेल रचना सादर केल्या. त्यांना पं. रामदास पळसुले (तबला), पं. भवानी शंकर (पखावज) आणि विनय चित्राव (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

श्रीनिवास जोशी

या दिवसाच्या दुसऱ्या  सत्रात पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र व शिष्य श्रीनिवास जोशी यांचे गायन झाले. त्यांनी राग ‘बिहाग’ सादर केला. ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ या त्यांनी गायलेल्या अभंगालाही श्रोत्यांची दाद मिळाली. त्यांना पांडुरंग पवार (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम), मुकुंद बादरायणी आणि नामदेव शिंदे (तानपुरा), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.

पं. गोकुलोत्सव महाराज

त्यांच्यानंतर पं. गोकुलोत्सव महाराज यांनी राग ‘हंसध्वनी’;तसेच राग ‘जनसंमोहिनी’मधील एक स्वरचित बंदिश प्रस्तुत केली. त्यांनी सादर केलेल्या स्वरचित रागमालेलाही श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांना सदानंद नायमपल्ली (तबला), अविनाश दिघे (हार्मोनियम), नामदेव शिंदे व अक्षय गरवारे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

देवकी पंडित

यानंतर प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांनी राग ‘झिंजोटी’ने आपल्या गायनाला सुरुवात केली. संगीतातील अवघड जागाही सहज आणि लीलया सादर करण्याच्या त्यांच्या शैलीस रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. त्यांना रोहित मुजुमदार (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) आणि सुस्मिरता डवाळकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. 
   
उस्ताद शाहिद परवेझ

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ सतारवादक उस्ताद शाहिद परवेझ यांच्या सतार वादनाने झाला. त्यांनी राग ‘मालकंस’ सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना मुकेश जाधव (तबला) आणि उमंग ताडफळे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. 

(देवकी पंडित यांच्या गायनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(सावनी शेंडे-साठ्ये यांच्या गायनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(पं. गोकुलोत्सव महाराज यांच्या गायनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(विवेक सोनार यांच्या बासरीवादनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link