Next
‘आकांक्षा’ फुलवणारी ‘बालरंगभूमी’
BOI
Tuesday, November 14 | 05:30 PM
15 0 0
Share this story


पुण्यातल्या ‘आकांक्षा बालरंगभूमी’ या संस्थेत मुलांना हसत-खेळत नाट्यप्रशिक्षण दिलं जातं. मुलांचं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठीही प्रयत्न केले जातात. मुख्य म्हणजे हे सगळं करताना मुलांना कलेचा आनंद मिळवून देण्यालाच प्राधान्य दिलं जातं. अशा या वैशिष्ट्यपूर्ण ‘आकांक्षा बालरंगभूमी’चे संस्थापक सागर लोधी यांच्याशी आजच्या बालदिनानिमित्त सुरेखा जोशी यांनी साधलेला हा संवाद...
.............
अलीकडच्या काळात मुलांना वेगवेगळ्या कला, खेळ, स्पर्धा परीक्षा इत्यादींच्या प्रशिक्षण वर्गांना पाठवण्याची चढाओढ पालकांमध्ये चाललेली दिसून येते. ही चढाओढ मुलांना ते आवडतंय म्हणून नाही तर बहुतेक वेळा आपलं मूल कुणापेक्षा मागे राहता कामा नये यासाठीच असते. माणसाच्या आयुष्यात कला महत्त्वाची आहेच; पण ती कलेसाठी कला असावी, स्पर्धेसाठी नाही; मात्र काही कलंदर माणसं अशी असतात, की ती एखाद्या चुकीच्या गोष्टीला योग्य वळण देऊन त्यातून कला शिकण्याचा मूळ हेतू साध्य करतात. सागर लोधी हे अशाच कलंदर माणसांपैकी एक. ‘आकांक्षा बालरंगभूमी’ या त्यांच्या संस्थेत ते हसत-खेळत शिक्षण देतानाच मुलांचं व्यक्तिमत्त्व घडवण्याचाही प्रयत्न करतात. हे सगळं करताना मुलांना कलेचा आनंद मिळवून देणं यालाच प्राधान्य दिलं जातं. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगांबद्दल त्यांच्याकडूनच जाणून घेऊ या.

सागर लोधी‘आकांक्षा बालरंगभूमी’ची कल्पना कशी सुचली?
- मी शाळेत असल्यापासूनच लहान मुलांबरोबर नाटक करायचो. शाळेत, महाविद्यालयात असताना लहान मुलांना गोळा करून त्यांच्यासाठी नाटक बसवायचो. त्यातूनच पुढे मला असं वाटायला लागलं, की माझा स्वतःचा असा बालनाट्याचा ग्रुप असायला पाहिजे, जिथं मी मला हव्या त्या पद्धतीचं नाटक करू शकेन. या विचारातून २००४मध्ये कोथरूडमध्ये काही मुलांचे पालक आणि मी मिळून आकांक्षा बालरंगभूमी ही संस्था सुरू केली. सुरुवातीला ग्रुप पाच–सहा मुलांचाच होता. त्यांना घेऊन आम्ही तीन-चार वर्षं नाटक बसवत होतो. हळूहळू मग या मुलांचे मित्र, त्यांच्या ओळखीची मुलं यायला लागली आणि आमचा ग्रुप वाढत गेला. मुलांची संख्या वाढल्यावर नाट्यप्रशिक्षणाची रीतसर बॅच सुरू केली. तिथं आम्ही शनिवार-रविवारी अभिनय प्रशिक्षण देऊन नाटक बसवायला लागलो. तेरा वर्षांपूर्वी एका सोसायटीच्या गच्चीत सुरू झालेल्या या बालरंगभूमीकडे आता स्वतःची जागा आहे. 

नाट्यप्रशिक्षणाची तुमची पद्धत काय आहे?
- आम्ही मुलांना वेगवेगळ्या खेळांमधून नाटकाशी संबंधित गोष्टी शिकवतो. नाटकातल्या वेगवेगळ्या संकल्पना आम्ही त्यांना ‘याला असं म्हणतात’ या पद्धतीनं सांगत नाही, तर खेळांमधून या संकल्पना त्यांच्याकडून प्रत्यक्ष करून घेतो. त्यांना सांगतो, की तुम्ही आठवा तुम्ही काय केलं होतंत ते. आता ते पुन्हा करून दाखवा. एखादी गोष्ट सांगून, ती ऐकताना तुमच्या डोळ्यांसमोर काय उभं राहिलं होतं ते आम्हाला दाखवा, असं सांगतो. अशा वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीज करत करत पुढे जातो आणि नंतर त्यांना सांगतो, की तुम्ही जे केलंत त्याला नाटकाच्या भाषेत अमुक असं म्हणतात. केवळ संकल्पना सांगितल्यामुळे मुलं गोंधळून जातात. ज्यांना पुढे अभिनयातच कारकीर्द करायची आहे, त्यांनी त्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केल्यावर या संकल्पना त्यांना नव्यानं शिकायला मिळतीलच. तेव्हा त्यांच्या लक्षात येईल, की आपण हे केलंय, हे आपल्याला येतंय. ललित कला केंद्रातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर आम्ही हा कोर्स पुन्हा डिझाइन केला. खेळांमधून नाट्यप्रशिक्षण देण्यासाठी छोटे छोटे खेळ विकसित केले. मी स्वतः खूप नवीन गोष्टी ‘इन्व्हेंट’ केल्या. मुलांना शिकवताना त्यांची रोजची भाषा, त्यातील त्रुटी, त्यांचे उच्चार, व्याकरण, वाचन या सर्वच बाबींकडे लक्ष द्यावं लागतं. त्या दृष्टीनं काही सुधारणा केल्या. आम्ही मुलांकडून ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाचं नाट्यवाचन करून घेतलं. पाचवी ते आठवीतल्या मुलांनी त्याचा पहिला अंक पूर्ण वाचला आणि लहान मुलांकडून करंदीकरांच्या कविता वाचून घेतल्या. त्या त्यांनी पाठ केल्या आणि सादर केल्या. त्यातून मुलांवर भाषेचे संस्कार झाले. 

मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय केलं जातं?
- मुलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी आम्ही काही संकल्पना राबवतो. जेव्हा मुलं इथं येतात, तेव्हा त्यांच्यातल्या प्रत्येकाला काही ना काही तरी करावंच लागतं. सगळ्या मुलांसमोर येऊन काही तरी बोलावंच लागतं. थोडी लाजरीबुजरी मुलं असतात ती पहिल्या दिवशी एखादाच शब्द बोलतात किंवा अजिबात बोलतही नाहीत; पण हळूहळू त्यांना ती सवय होते आणि त्यांच्यातला बुजरेपणा पूर्णपणे निघून जातो. सर्वांना समान संधी मिळावी, सगळ्यांचा सादरीकरणाचा दर्जा सुधारावा, भाषा चांगली व्हावी, नाटकाबद्दलची समज वाढावी असा आमचा प्रयत्न असतो. इथं आम्ही मुलांना वेगवेगळ्या गोष्टी दाखवतोही. प्रोजेक्टरवर वैशिष्ट्यपूर्ण नाटकं दाखवतो किंवा अमुक एक नाटक आवर्जून बघा असं सुचवतो. ते बघताना आवाज कसा आहे, नट कशा पद्धतीनं हातवारे करतो आहे, कशा पद्धतीनं डोळ्यांचा वापर केला आहे, याकडे लक्ष द्या असं आम्ही त्यांना सांगतो. मुलांना आम्ही प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र विचार करण्याची सवय लावतो. त्यामुळे त्यांची विचार करण्याची वेगळी पद्धत तयार होते. त्यांना विचार करून बोलण्याची सवय लागते. प्रशिक्षण वर्गात इतकी छोटी मुलं एकत्र असूनही त्यांनी कधी आपापसांत मारामारी केलीय असं झालेलं नाही. त्यांच्यात मतभिन्नता असते; पण ती योग्य प्रकारे मांडण्याची पद्धत त्यांना माहीत आहे. अगदी पाच-सहा वर्षांची मुलंसुद्धा राग आला, तरी विचार करून मग व्यक्त कसं व्हायचं ते ठरवतात. हे चांगले संस्कार त्यांच्यावर इथं नकळत घडतात असं मला वाटतं. आपल्याला जे काही म्हणायचंय, ते नेमक्या शब्दात मांडायला ती शिकतात, त्याची त्यांना सवय लागते. मुलांच्या विचारांना दिशा मिळते. 

मुलं आपसात नाटकाविषयी चर्चा करतानाप्रशिक्षणादरम्यान केलेल्या काही वेगळ्या प्रयोगांविषयी काय सांगाल?
- करंदीकरांच्या सगळ्या कविता एकत्र करून त्यावर आम्ही ‘पिशी मावशी’ हे नाटक केलं होतं. त्या नाटकाला खूप बक्षिसं मिळाली. त्याचे भारतभर प्रयोग झाले. त्या नाटकाच्या वेळेला मुलांना भीतीची जाणीव होण्यासाठी हॅलोविन पार्टी केली होती. भूतबंगला उभा करून व आवाजाच्या साह्यानं मुलांना भीती वाटणं कसं दाखवायचं हे प्रात्यक्षिकातून समजावलं. राजा, राज्य या संकल्पना कळण्यासाठी त्यांच्याकडून इथं किल्ले बनवून घेतले. ते करताना मुलांनीच त्याविषयी स्वतः अभ्यास केला. मुलांना ‘हा अभ्यास करा’ असं थेट सांगण्याऐवजी आम्ही अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडून ते करवून घेतो आणि मग त्याचा नाटकासाठी वापर करून घेतो. हा अभ्यास करताना मुलं आमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगलं काम करतात. मुलांची कल्पनाशक्ती व एखादी गोष्ट व्हिज्युलाइज करण्याची क्षमता खूप चांगली असते. काही वेळा मोठ्या माणसांना ज्या गोष्टी अशक्य वाटतात, त्या मुलं शक्य करून दाखवतात. एका नाटकासाठी शिडीची आवश्यकता होती, तर मुलांनी स्वतःच एकमेकांच्या अंगावर उभं राहून शिडी तयार केली. आमच्या बालनाट्यातली बालनटी त्या शिडीवरून खाली उतरली. आम्हाला वाटलं होतं, की हे मुलांना जमणारच नाही. परंतु फक्त पंधरा-वीस मिनिटांत एकमेकांत चर्चा करून मुलांनी शिडीची अडचण सोडवली. एका नाटकासाठी चालू असलेल्या घड्याळाची आवश्यकता होती. तेव्हाही मुलांनी ओरिगामी, शाळेत शिकलेलं विज्ञान यांचा वापर करून घड्याळ बनवलं. मुलांकडे खूप चांगल्या कल्पना असतात. आम्ही त्यांचा आदर करतो, त्या नाटकासाठी वापरतो. 

नाटकाची संहिता कशी ठरवता?
- यातही आम्ही मुलांच्या कल्पनेला पुरेपूर वाव देतो. एका वर्षी आम्ही मुलांसाठी एका मोठ्या लेखिकेनं लिहिलेलं नाटक बसवायचं ठरवलं होतं. ते त्यांना काही आपलंसं वाटलं नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं, की आम्ही हे करणार नाही. ते खरंच १९८०चं नाटक होतं. त्यामुळे त्या विषयाशी मुलं ‘रिलेट’ होऊ शकत नव्हती. स्पर्धेत नाटकासाठी आधीच प्रवेशिका पाठवून झाली होती; पण मुलं आपल्या मतावर ठाम होती. मग आम्ही मुलांना हवं असलेलं नाटक परत नव्यानं लिहून घेतलं आणि सादर केलं. आमच्याकडे आम्ही मुलांच्या मताला खूप महत्त्व देतो. शंभर टक्के त्यांच्या मताप्रमाणे बदल करतो. हा आमच्या संस्थेचा ‘प्लस पॉइंट’ आहे असं मला वाटतं. नाटक मुलांना आपलंसं वाटणं महत्त्वाचं आहे. नाटक लिहिताना काही कल्पना मुलं सुचवतात किंवा नाटक बसवत असतानादेखील काही बदल करावेसे वाटले, तर मुलं सांगतात. संवादातही मुलं आपल्याला हवे ते बदल करू शकतात एवढं स्वातंत्र्य आम्ही त्यांना देतो. नाटकाच्या आशयाला धक्का पोहोचणार नाही, असे कुठलेही बदल मुलं करू शकतात. आशय बदलत असेल, तर आम्ही त्यांना समजावून सांगतो. त्यामुळे मुलांवर पाठांतराचं कुठलंच दडपण नसतं. तालमी सुरू असताना मुलं बदल करत जातात. आठ-दहा दिवसांनी तीच ठरवतात, की आपण असं बोलायचंय. त्यानंतर आम्ही नाटकाचं स्क्रिप्ट फायनल करतो. अशा प्रकारे मुलांना नाटक पूर्णपणे समजलं असल्यामुळे त्यांच्यात खूप आत्मविश्वास असतो. त्यामुळे ऐन वेळी एखाद्याने वाक्यात काही बदल केला, तरी मुलं गडबडत नाहीत. ‘तुला असं म्हणायचंय का’ असं म्हणून, मुलं ते वाक्य आपल्या वाक्याला जोडून घेतात. प्रेक्षकांना लक्षातही येत नाही, की काय गडबड झालीय. 

याआधी प्रसिद्ध झालेली बालनाट्यं बसवता का?
- मोठ्या लेखकांनी लिहिलेलं नाटक मुलांना वाचायला आवडतं, पण ते नाटक करायचं म्हटलं, की ती नाही म्हणतात. आम्हाला आमची गोष्ट सांगायचीय, असं त्यांचं म्हणणं असतं. विंदा करंदीकर, इंदिरा संत यांच्या कवितांच्या वाचनाचे, ‘पुलं’च्या बालनाट्याच्या वाचनाचे खूप प्रयोग आम्ही पालकांसाठी केले. वाचायला आवडत असलं, तरी या साहित्यावर आधारित प्रयोग करायचा म्हटलं, की ‘आम्हाला आमची गोष्ट करायचीय,’ असं मुलं म्हणतात असा आमचा अनुभव आहे. मुलांवर वाचनाचे संस्कार व्हावेत, त्यांना इतिहास कळावा, लेखक माहीत व्हावेत यासाठी आम्ही त्या नाटकांचं वाचन मुलांकडून करून घेतो; पण नाट्यप्रयोग त्यांना जो हवा असेल, तो करायची मुभा देतो. 

मुलांना प्रवेश देताना काही निकष लावता का?
- नाटक ही कलाच अशी आहे, की त्यामध्ये कोणीही रमतं, मग ते मूल बडबड करणारं असो की गप्प राहणारं. म्हणून आम्ही सगळ्यांनाच प्रवेश देतो. नाटक करताना सगळ्याच मुलांना संधी मिळायला हवी असं आमचं मत आहे; मात्र कधी कधी पालकांच्या वाढत्या अपेक्षा पाहून आम्हाला प्रवेश नाकारावा लागतो. म्हणजे आधी असं व्हायचं, की नाट्यप्रशिक्षण वर्गाला घालताना मुलांची भाषा सुधारणं, चांगलं बोलता येणं, आत्मविश्वास वाढणं या पालकांच्या अपेक्षा असायच्या. आता दहातल्या नऊ पालकांची अशी अपेक्षा असते, की आमचा मुलगा शाहरुख खान व्हायला पाहिजे. ‘आमचा मुलगा अमुक एका टीव्ही शोमध्ये भाग घेणार आहे; त्याला तीन महिन्यांत तयार करायचं आहे,’ अशी अपेक्षा घेऊन येणाऱ्या पालकांच्या पाल्याला आम्ही प्रवेश देत नाही. ही कला तीन महिन्यांत शिकण्यासारखी नाही. याला खूप संयमाची गरज आहे. जी मुलं निखळ आनंदासाठी इथं येतात, त्यांच्यावर याचा परिणाम होईल असं वाटतं. म्हणून प्रवेश देताना आम्ही मूळ हेतू बाजूला पडणार नाही याची काळजी घेतो. 

(मुलांचं बदलतं भावविश्व, आधुनिक गॅजेट्स आणि बालरंगभूमी याविषयीचे विचार सागर लोधी यांनी सोबतच्या व्हिडिओत व्यक्त केले आहेत.)


(‘आकांक्षा बालरंगभूमी’त मुलांना दिलं जाणारं प्रशिक्षण कसं असतं आणि नाटक बसवण्यासाठी मुलं आपसात चर्चा कशी करतात ,याची झलक आणि त्यांनी  बसवलेलं एक छोटं बालनाट्य सोबतच्या व्हिडिओत पाहायला मिळेल.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link