Next
मॅग्निफिसंट मेरी
सुरेखा जोशी
Friday, November 10 | 12:18 PM
15 0 0
Share this story


आशियाई स्पर्धेचे अजिंक्यपद पाचव्यांदा मिळवणारी मेरी कोम एकाच वेळी अनेक आघाड्यांवर यशस्वी कामगिरी करते आहे. राज्यसभेची खासदार, मुष्टियुद्ध प्रशिक्षण संस्थेची संचालिका, स्पर्धेसाठीचा सराव, मुष्टियुद्ध क्रीडा प्रकाराची राष्ट्रीय निरीक्षक म्हणून असलेली जबाबदारी आणि तीन मुलांची आई म्हणून असलेली कौटुंबिक जबाबदारी या सर्वच आघाड्या मेरी यशस्वीपणे सांभाळते आहे. ‘मॅग्निफिसंट मेरी’ हे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने तिला दिलेले नामाभिधान तिच्या कर्तृत्वाला सार्थ असेच आहे. 
................
आपल्याकडे देवीची मूर्ती बऱ्याचदा अष्टभुजा स्वरूपात असते. आपल्या आठ हातांत धरलेल्या निरनिराळ्या आयुधांच्या साह्याने ती एकाच वेळी प्रेरक, तारक व संहारक शक्तीचे रूप दर्शविते. हे कल्पनेतील देवीला शक्य आहे, मग वास्तवातील एखाद्या स्त्रीला शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर मुष्टियोद्धी मेरी कोमने आपल्या जगण्यातून दिले आहे. आशियाई स्पर्धेचे अजिंक्यपद पाचव्यांदा मिळवणारी मेरी कोम गेल्या वर्षभरात एकाच वेळी अनेक आघाड्यांवर यशस्वी कामगिरी करते आहे. ‘माझे प्रत्येक पदक ही संघर्षाची एक स्वतंत्र कहाणी आहे,’ ही अजिंक्यपद मिळवल्यानंतर तिने ‘पीटीआय’ला दिलेली प्रतिक्रिया म्हणूनच सहज, स्वाभाविक ठरते. 

राज्यसभेची खासदार, मुष्टियुद्ध प्रशिक्षण संस्थेची संचालिका, स्पर्धेसाठीचा सराव, मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकाराची राष्ट्रीय निरीक्षक म्हणून असलेली जबाबदारी आणि तीन मुलांची आई म्हणून असलेली कौटुंबिक जबाबदारी या सर्वच आघाड्या मेरी यशस्वीपणे सांभाळते आहे. नुसतीच सांभाळते आहे असे नाही, तर त्या प्रत्येक आघाडीवर ती कौतुकास्पद कामगिरी करते आहे. राज्यसभेवर नियुक्ती झालेल्या, पण सभागृहात गैरहजर राहाणाऱ्या नामवंत खासदारांबद्दल आपण नेहमीच ऐकतो. मेरी यालाही अपवाद ठरलीय! संसदेच्या अधिवेशन काळात राज्यसभेत तिची नियमित उपस्थिती असते. मुष्टियुद्ध क्रीडा प्रकाराची राष्ट्रीय निरीक्षक म्हणून संबंधित सर्व बैठकांना ती हजर राहते. ‘हे सगळं करताना कधीकधी माझं मलाच कळत नाही, की मला इतक्या आघाड्यांवर काम करणं कसं काय जमतंय,’ असंही ती मनमोकळेपणाने बोलून जाते. 

गेल्या वर्षी तिने ५१ किलोऐवजी ४८ किलो वजनी गटात खेळण्याचा निर्णय घेतला आणि नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत ती याच गटात खेळली. ‘हा माझा नैसर्गिक वजनी गट आहे. याआधी ज्यांच्यासोबत ५१ किलो वजनी गटात खेळले, त्यांना या स्पर्धेत हरवल्यामुळे माझे मनोधैर्य खूपच उंचावले आहे,’ असे मेरी म्हणते. ही स्पर्धा पाच वेळा जिंकून तिने स्वतःच्या नावावर नवा विक्रम नोंदवला आहे. आशियाई अजिंक्यपद मिळवण्यासाठी तिने घेतलेली मेहनत सुवर्णपदकाच्या रूपाने फळाला आली आहे. 

मुष्टियोद्धी म्हणून गेली दोन दशके कारकीर्द गाजवणाऱ्या मेरीची जादू आजही कायम आहे. त्यामुळेच की काय, तिच्यासमोर उभे राहताच प्रतिस्पर्धी खेळाडूचे निम्मे अवसान गळून पडते; पण असे म्हणणे मेरीला तितकेसे आवडत नाही. ती म्हणते, ‘प्रतिस्पर्धी खेळाडूच्या अशा पवित्र्यामुळे खरे तर त्रास होतो. परंतु अशा वेळी मला स्वतःचा तोल ढळू देऊन चालत नाही. हा काही मिनिटांचा, सेकंदांचा खेळ आहे. त्यामुळे मला क्षणार्धात स्वतःला सावरावं लागतंच.’  

२०१४मध्ये तिच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यापूर्वीचा तिच्या आयुष्यातील संघर्ष आपण सर्वांनी या चित्रपटात पाहिला आहे; परंतु त्यानंतरही ती वैयक्तिक आयुष्यात व क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी करत असलेले कठोर परिश्रम थांबलेले नाहीत! तिसरा मुलगा प्रिन्स याच्या जन्मानंतर २०१४मध्ये तिने क्रीडा क्षेत्रात पुनरागमन केले. त्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिला अवघ्या काही गुणांनी पदकापासून वंचित राहावे लागले; मात्र इंचिऑन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले. 

२०२०मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवून भारताचा झेंडा उंचावणे हे आता तिचे लक्ष्य आहे. ‘स्वतःच्या कर्तृत्वाने भारताचा झेंडा उंचावणे हे खूप भाग्याचे आहे,’ असे मेरी मानते. ‘मॅग्निफिसंट मेरी’ हे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने तिला दिलेले नामाभिधान तिच्या कर्तृत्वाला सार्थ असेच आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link