Next
र. वा. दिघे, के. नारायण काळे, प्र. न. जोशी, अँथनी ट्रॉलप
BOI
Tuesday, April 24 | 03:45 AM
15 0 0
Share this story

प्रत्यक्षात भेटलेल्या रूपसुंदरीची कहाणी ऐकून तिला कादंबरीत शब्दबद्ध करणारे र. वा. दिघे, नाटककार आणि समीक्षक के. नारायण काळे, संतसाहित्याचे अभ्यासक प्र. न. जोशी आणि बार्सेटशर नावाच्या काल्पनिक इंग्लिश काउंटीमध्ये घडणाऱ्या कथानकांवर सहा लोकप्रिय कादंबऱ्या लिहिणारा अॅन्थनी ट्रॉलप यांचा २४ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....  
रघुनाथ वामन दिघे

२४ एप्रिल १८९६ रोजी जन्मलेले रघुनाथ वामन दिघे हे गेल्या शतकातले एक अग्रगण्य कादंबरीकार आणि म्हणून ओळखले जातात. प्रादेशिक वाङ्मयाला त्यांच्यामुळे नवीन दिशा मिळाली. ग्रामीण जीवन आणि मनोहारी निसर्गवर्णन हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी शेतकऱ्यांचा जीवनसंघर्ष आपल्या कादंबऱ्यामधून सुरेख चितारला आहे. 

पावसाला शेतकऱ्यांच्या भाषेत ‘पाणकळा’ असंही म्हणतात. पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची कथा मांडणारी त्यांची ‘पाणकळा’ ही कादंबरी लक्षवेधी ठरली होती. ३०च्या दशकात पुण्यामध्ये वकिली करत असताना भेट झालेल्या गोजरा नावाच्या रूपसुंदर गायिका-नृत्यांगनेच्या आयुष्यात घडलेल्या विलक्षण प्रसंगांवर आधारित ‘हिरवा सण’ ही त्यांची कादंबरी वाचकप्रिय ठरली होती. 

कार्तिकी, गानलुब्धा मृगनयना, पावसाचे पाखरू, पूर्तता, सराई, सोनकी, पड रे पाण्या, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

चार जुलै १९८० रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(र. वा. दिघे यांची ‘पड रे पाण्या’ ही कविता वाचण्यासाठी https://goo.gl/xDV7rs येथे क्लिक करा. र. वा. दिघे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.......

केशव नारायण काळे 

२४ एप्रिल १९०४ रोजी जन्मलेले केशव नारायण उर्फ ‘के. नारायण’ काळे हे नाटककार, कवी आणि चित्रपट निर्माते म्हणून प्रसिद्ध होते. युरोपीय रंगभूमीचा त्यांचा विशेष अभ्यास होता. ते साहित्य समीक्षकही होते. ‘भावशर्मा’ नाव घेऊन त्यांनी काही कविताही लिहिल्या होत्या. 

नाटकाच्या प्रेमामुळे त्यांनी ‘कौटिल्य’, ‘प्रयोजन’ यांसारखी नाटकं लिहिली. तसंच त्यांनी स्तानिस्लाव्स्कीच्या ‘अॅन अॅक्टर प्रीपेअर्स’चं भाषांतर ‘अभिनयसाधना’ या नावानं केलं होतं. अनंत काणेकर, पार्व्यनाथ आळतेकर यांच्या सहकार्याने त्यांनी ‘आंधळ्यांची शाळा’ या नाटकाची निर्मिती केली आणि ते नाटक खूपच गाजलं. त्याचे त्या काळात शंभरावर प्रयोग झाले होते.  

रत्नाकर, प्रतिभा, मराठी साहित्य पत्रिका, अशा नियतकालिकांचं त्यांनी संपादन केलं होतं. 

२० फेब्रुवारी १९७४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(के. नारायण काळे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.....

प्रल्हाद नरहर जोशी

२४ एप्रिल १९२४ रोजी जन्मलेले प्रल्हाद नरहर जोशी हे संतसाहित्याचे अभ्यासक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. 

अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, भारतीय संत (भाग १ ते ४), भारतीय एकात्मता (भाग १ ते ६), चोखा डोंगा परी, महापुरुषांच्या प्रणयकथा, माहुरगडवासिनी श्रीरेणुका, मराठी संतांच्या विराण्या, पांचाली, मराठी वाङ्मयाचा विवेचक इतिहास, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

पाच जून २००४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(प्र. न. जोशी यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
......

अॅन्थनी ट्रॉलप

२४ एप्रिल १८१५ रोजी लंडनमध्ये जन्मलेला अॅन्थनी ट्रॉलप हा १९व्या शतकाच्या मध्यातला प्रसिद्ध कादंबरीकार. व्हिक्टोरियन कालखंडात घडणाऱ्या त्याच्या कथा-कादंबऱ्या त्या वेळी लोकांना विशेष भावल्या होत्या. 

बार्सेटशर नावाच्या काल्पनिक इंग्लिश काउंटीमध्ये घडणाऱ्या कथानकांवर आधारित त्याच्या सहा कादंबऱ्या लोकप्रिय होत्या. दी वॉर्डन, बार्चेस्टर टॉवर्स, डॉक्टर थॉर्न, फ्राम्ली पार्सनीज, दी स्मॉल हाउस अॅट अॅर्लीन्गटन, दी लास्ट क्रॉनिकल ऑफ बार्सेट अशा त्या पश्चिम इंग्लंडमध्ये घडणाऱ्या सहा कादंबऱ्या चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. 

ऑर्ली फार्म, दी प्राइम मिनिस्टर, कॅन यू फर्गिव्ह हर?, दी वे वुई लीव्ह नाऊ, असं त्याचं लेखन प्रसिद्ध आहे. सहा डिसेंबर १८८२ रोजी त्याचा लंडनमध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Parashuram Babar About 265 Days ago
Thanks Good information
0
0

Select Language
Share Link