Next
स्वयंचलित वाहनासाठीचा विमा
BOI
Saturday, August 11, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

आपण स्कूटर, मोटरसायकल किंवा कार किंवा कोणतेही स्वयंचलित वाहन घेतले, की लगेचच त्या वाहनासाठी इन्शुरन्स घेणे बंधनकारक असते, हे आपल्याला माहीत असते. तथापि बऱ्याचदा आपल्याला अशा इन्शुरन्सच्या नियमांबाबत फारशी माहिती नसते. म्हणून ‘समृद्धीची वाट’ सदरात आज आपण त्याबाबत आवश्यक ती माहिती घेऊ.
..............

मोटर व्हेइकल इन्शुरन्स म्हणजे कोणत्याही स्वयंचलित वाहनासाठी घ्यावयाचा इन्शुरन्स होय. हा एक इन्शुरन्स कंपनी व वाहन मालक यांच्यातील करार असून, यानुसार वाहन मालक गाडीच्या बाजारभावाप्रमाणे एक ठराविक रक्कम विमा कंपनीस प्रीमियम म्हणून देत असतो. त्या बदल्यात विमा कंपनी वाहन मालकास अशा पॉलिसी कालावधीत वाहनाचे काही नुकसान झाले, तर पॉलिसी कव्हर व झालेले नुकसान यातील कमी असणारी रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्याचे मान्य करते. सर्वसाधारणपणे हा करार एक वर्षाचा असतो व कराराची मुदत संपण्यापूर्वी नवीन वर्षासाठी घसारा विचारात घेऊन कमी होणाऱ्या किमतीइतकी नवीन पॉलिसी घ्यावी लागते. याला पॉलिसी नूतनीकरण असे म्हणतात. हल्ली काही विमा कंपन्या तीन वर्षांसाठी पॉलिसी देऊ लागल्या आहेत. अशी पॉलिसी घेण्याचा आणखी प्रमुख उद्देश म्हणजे वाहन चालविताना काही अपघात होऊन दुसऱ्या कोणास शारीरिक इजा अथवा मृत्यू आल्यास, तसेच दुसऱ्या वाहनाची मोडतोड होऊन नुकसान झाल्यास आणि त्याने क्लेम केल्यास अशी नुकसानभरपाईसुद्धा दिली जाते. याला थर्ड पार्टी लायबिलिटी असे म्हणतात. अशा पॉलिसीस कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी असे म्हणतात.

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसीत खालील बाबी समाविष्ट असतात.
- दंगे, गुंडागर्दी, मोर्चा यांमुळे होणारे वाहनाचे नुकसान
- वाहन चोरी 
- प्राणी अथवा पक्षी यांनी धडक दिल्यामुळे होणारे वाहनांचे नुकसान 
- वाहनावर अकस्मात पडणाऱ्या वस्तू अथवा मिसाइलमुळे होणारे नुकसान
- पूर, वादळ किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान
- आग लागल्याने होणारे नुकसान 
- थर्ड पार्टी लायबिलिटी 

थर्ड पार्टी लायबिलिटी प्रोटेक्शन म्हणजे काय ते आता पाहू.
मोटर वाहन कायदा १९८८नुसार थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे. यामुळे, पॉलिसीधारकाच्या चुकीमुळे अन्य वाहनाचे नुकसान झाल्यास, तसेच अन्य कोणास इजा झाली किंवा मृत्यू आल्यास, यातून जी कायदेशीर लायबीलिटी (दायित्व) येऊ शकते, यापासून पॉलिसीधारकास संरक्षण मिळते.
सर्व जनरल इन्शुरन्स कंपन्या मोटर व्हेइकल इन्शुरन्स देऊ करतात. असे असले, तरी अशी पॉलिसी घेताना कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो, तसेच कंपनीचा रिपेअर गॅरेजेसशी असलेला संबंध पाहणे जरूरीचे असते. विशेष म्हणजे सर्व विमा कंपन्या पॉलिसीधारकास पॉलिसी नूतनीकरण करताना ‘नो क्लेम बोनस’ देऊ करतात; मात्र त्यासाठी आधीच्या वर्षात पॉलिसीधारकाने कुठल्याही प्रकारचा क्लेम घेतला असता कामा नये. म्हणूनच याला ‘नो क्लेम बोनस’ असे म्हणतात. पॉलिसी नूतनीकरण करताना जो प्रीमियम द्यावा लागणार असतो, त्यात डिस्काउंटच्या स्वरूपात ‘नो क्लेम बोनस’ दिला जातो. असा डिस्काउंट साधारणपणे २० ते २५ टक्के इतका असू शकतो.

वरील कारणांमुळे होणाऱ्या नुकसानभरपाईचा क्लेम पॉलिसीधारकाने करायचा असतो. होणाऱ्या नुकसानाबाबतचा निर्णय विमा कंपनीच्या सर्व्हेअरने दिलेला रिपोर्ट व दुरुस्तीसाठी टाकलेल्या गॅरेजने दिलेल्या बिलानुसार केला जातो. वाहन चोरीस गेल्यास संबंधित वाहनाच्या डेप्रिसिएटेड किमतीनुसार क्लेम दिला जातो. याउलट थर्ड पार्टी लायबिलिटी क्लेम ज्या ‘थर्ड पार्टी’चे नुकसान झाले आहे, अशी व्यक्ती करत असते.

इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, की अपघात होतेवेळी वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पूर्णत: पालन केलेले असेल, तसेच जर वाहनचालक कुठल्याही प्रकारच्या नशेत नसेल, तरच क्लेम मिळू शकतो. विशेष म्हणजे वाहन चालविताना सोबत इन्शुरन्स पॉलिसी असणे बंधनकारक आहे. अलीकडेच नियमात झालेल्या सुधारणेनुसार आता अशी पॉलिसी डिजिटल फॉर्ममध्ये (डिजिटल लॉकर) सोबत असलेलीसुद्धा चालू शकते.

- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dilip S Borkar About
We are thankful for useful information
0
0
V K BHIDE About
Sir, your all articles I read with interest. All are always very good, educative and informative. Keep it up.
0
0
R R Kulkarni About
अतिशय मोजक्या शब्दात महत्वपूर्ण मुद्द्यांबद्दल माहिती दिली आहे. उपयुक्त लेख.धन्यवाद.
0
0

Select Language
Share Link
 
Search