Next
सोलापूर जिल्ह्यात बैलपोळ्याची तयारी उत्साहात सुरू
BOI
Friday, September 07 | 06:19 PM
15 0 0
Share this story

बैलपोळ्यासाठीच्या साहित्याच्या खरेदीची लगबग सुरू आहे.

सोलापूर :
आपल्या लाडक्या बैलांच्या पूजनासाठी शेतकरी साजरा करत असलेला बैलपोळा आता जवळ आला आहे. त्यामुळे सगळीकडे तयारी सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे या सणाला आपल्या सर्जा-राजाची हौस भागवण्यासाठी शेतकरी लगबग करू लागले आहेत. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नसला, तरी शेतकरी बैलांना सजवण्यात जराही काटकसर करताना दिसत नाहीत, हे विशेष.  

यंदा बैलपोळा आला, तरी या भागात अद्याप दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत, तरीही हार न मानता येथील शेतकरी जिद्दीने या संकटाला सामोरे जात आहेत. शेतकरी आपल्या सर्जा–राजाची हौस करण्याच्या तयारीला लागले आहेत. येथील शेतकरी उत्साहात बैलपोळा साजरा करत असल्यामुळे साहित्य विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. या वेळी पांढऱ्या व काळ्या कासऱ्याच्या सुतामध्ये स्पेशल रेशीम आल्यामुळे त्याचे शेतकऱ्यांना खास आकर्षण आहे. गंजी कासरा, नंदी गोप, काळी-पांढरी मोरकी, वेसण, घोगर मणी माळ, कारले कंडा या तयार वस्तू मिळू लागल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचले आहेत. विविध प्रकारच्या घुंगराच्या माळा, काशाच्या घाट्या व शेंब्या लक्षवेधक ठरल्या आहेत. शेतकरी या साहित्याची खरेदी करण्यात व्यग्र असल्याचे चित्र दिसून आले. बैलपोळ्याला लागणाऱ्या विविध वस्तूंच्या किमतीमध्ये यंदा साधारण दहा टक्के वाढ झाली असल्याचे रोपळेतील विक्रेते रेवण वाघ यांनी सांगितले. 

‘आमच्या बैलजोडीची हौस करण्याचा हा वर्षातील एकमेव सण असतो. त्यामुळे आम्ही वस्तूंची खरेदी करताना कधीच मागे-पुढे पाहत नाही,’ असे पंढरपूर तालुक्यातील खरातवाडी येथील शेतकरी पांडुरंग सावंत यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
श्री . रेवण वाघ , रोपळे बु . ता . पंढरपुर About 14 Days ago
छान बातमी आहे . धन्यवाद !
0
0

Select Language
Share Link