Next
‘फेसबुक पोस्ट हा साहित्याचा नवा प्रकार’
प्रेस रिलीज
Friday, March 16, 2018 | 12:02 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे, आणि ही काळाची गरज आहे. फेसबुक पोस्ट हा साहित्याचा नवा प्रकार आहे. इथे लोकशाही आहे; परंतु इथले मार्केटिंग धोकादायक आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इस्लामपूर आणि ‘राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी’तर्फे आयोजित ‘युवा साहित्य नाट्य संमेलना’त ते अध्यक्ष पदावरून बोलत होते.

या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, धैर्यशील पाटील, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, राजारामबापू सहकारी बँक लिमिटेडचे चेअरमन श्यामराव पाटील, मसापच्या इस्लामपूर शाखेचे अध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील, विभागीय संमेलनाचे निमंत्रक विनोद कुलकर्णी, सहनिमंत्रक, तानसेन जगताप आणि परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते. 

डॉ. आशुतोष जावडेकरडॉ. जावडेकर म्हणाले, ‘कोणतेही साहित्य हे मूलतः सामाजिक आणि राजकीयच असते. सत्तेला तोंड देताना साहित्यिकांना काही दरडावून सांगता येत नसेल, तर नक्कीच दोन्हीत काहीतरी अंतर आहे, हे समजून घ्यावे लागेल.’
संमेलन आणि साहित्य याविषयी जावडेकर म्हणाले, ‘संमेलनाची गरज आहे. त्यातून वाचक घडतो. अनेकांना व्यासपीठ मिळते. खरा वाचकवर्ग ग्रामीण आणि निमशहरी भागात आहे. नव्या दमाचे लेखक काही वेगळे आणि ताकदीचे लेखन घेऊन येताहेत. प्रेम आणि खदखद व्यक्त करण्याचा अधिकार युवा पिढीला मिळायला पाहिजे. नवी पिढी वाचत नाही, हा गैरसमज आहे.’
 
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘युवकांच्या साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, मसापतर्फे प्रतिवर्षी युवा साहित्य-नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. प्रतिभेच्या नव्या कवडशांचा शोध घेणे, हाच या संमेलनाचा हेतू आहे. तरुण पिढीचे भावनिक भरणपोषण करण्यासाठी संमेलने आवश्यक आहेत. ग्रामीण भागातील चांगल्या दर्जाचे साहित्यिक पुढे यावेत, यासाठी साहित्यक्षेत्रात सकारात्मक दबावगट निर्माण झाले पाहिजेत.’

विनोद कुलकर्णी म्हणाले, ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी मसाप करत असलेले प्रयत्न यशाच्या वाटेवर आहेत.’
 
संमेलनाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ग्रंथदिंडी निघाली. सुरुवातीला अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम’ हे पथनाट्य सादर केले. सोमनाथ सुतार व सहकाऱ्यांनी नांदी सादर केली. तिसऱ्या सत्रात ‘भगवती क्रिएशन’ सांगली प्रस्तुत, इरफान मुजावर लिखित आणि यशोधन गडकरी दिग्दर्शित ‘तेरे मेरे सपने’ या एकांकिकेचे सादरीकरण युवा कलाकारांनी केले.  संमेलनाच्या समारोपापूर्वी प्रसिद्ध कवी रमजान मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित युवा कवींचे कवी संमेलन रंगले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link