Next
टेपेस्ट्रीत प्रयोग करणारा कलावंत
BOI
Thursday, May 17 | 06:45 AM
15 0 0
Share this story

ह्युमनस्केप

‘टेपेस्ट्री’
म्हणजे विणकाम केलेली, गालिच्यासारखी दिसणारी, पण भिंतीवर लावावयाची कलाकृती किंवा तसबीर. एस. जी. वासुदेव या कलावंताने गेली दोन दशके सातत्याने टेपेस्ट्री या माध्यमामध्ये कलाकृती केल्या आहेत. समकालीन कलाजगतात आणि कलाकारांमध्ये टेपेस्ट्रीला युरोपइतकी मान्यता आणि प्रसिद्धी मिळालेली दिसत नाही. म्हणूनच वासुदेव यांच्यासारख्या चित्रकारांचे या माध्यमातील प्रयोग महत्त्वाचे आणि कायम स्मरणात राहणारे असतात. ‘स्मरणचित्रे’ या सदरात आज पाहू या टेपेस्ट्री हा कलाप्रकार आणि त्यात प्रयोग करणाऱ्या वासुदेव या कलाकाराबद्दल...
......
एस. जी. वासुदेवप्राचीन इजिप्तमध्ये कॉप्टिक भागात म्हणजे पूर्व आफ्रिकेमध्ये मृतांबरोबर ‘टेपेस्ट्री’ पुरण्याची पद्धत होती. इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये जेव्हा ख्रिश्चन धर्म त्या भागात येऊन पोहोचला, तेव्हा टेपेस्ट्रीवर ख्रिस्ती रूपके वापरायला सुरुवात झाली. ‘टेपेस्ट्री’ म्हणजे विणकाम केलेली, गालिच्यासारखी दिसणारी, पण भिंतीवर लावावयाची कलाकृती किंवा तसबीर. मध्य युगात युरोपात सर्वच चर्चच्या सजावटीसाठी आणि धर्माची महानता लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी टेपेस्ट्रीच्या कलाकृती भिंतींवर टांगल्या जात. अशा उत्तमोत्तम टेपेस्ट्रीचे नमुने आज अनेक संग्रहालयांत आहेत. आधुनिक काळात युरोपमध्ये पिकासो, ब्राक, मातिस यांच्यासारख्या प्रख्यात चित्रकारांनी टेपेस्ट्रीत कलाकृती केल्या. आजही एक खास माध्यम म्हणून टेपेस्ट्रीकडे पाहिले जाते. 

भारतात आधुनिक काळात हुसेन या चित्रकाराने टेपेस्ट्री या माध्यमामध्ये कलाकृती केल्या. एस. जी. वासुदेव या मूळच्या चेन्नईच्या असलेल्या, परंतु सध्या बेंगळुरूमध्ये वास्तव्य असलेल्या कलावंताने गेली दोन दशके सातत्याने टेपेस्ट्री या माध्यमामध्ये कलाकृती केल्या आहेत. २००१मध्ये चेन्नईच्या अप्पाराव गॅलरीत त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ही गॅलरी दोन मजल्यांच्या बंगल्यात होती आणि हे प्रदर्शन स्मरणात राहण्याचे कारण म्हणजे टेपेस्ट्री हे माध्यम. युरोपातील कलेत या माध्यमाला मोठा इतिहास आहे. बायझेंटाइन, गॉथिक व पुढे युरोपातील प्रबोधन कलेत अशा टेपेस्ट्रीची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली आणि कलात्मकदृष्ट्या उच्च दर्जाच्या काही टेपेस्ट्री निर्माण झाल्या. लोकर, सुती किंवा रेशमी धाग्यांच्या ताण्याबाण्याच्या तंत्रातून टेपेस्ट्री तयार होते. १७व्या शतकात फ्रान्समध्ये चौदावा लुई याने रॉयल टेपेस्ट्री मॅन्युफॅक्टरी ही संस्था खास टेपेस्ट्रीसाठी सुरू केली होती. ती आजही पॅरिसमध्ये सुरू आहे. 

पूर्वी चित्रकार स्वतः डिझाइन व विणकाम करत. आधुनिक काळात चित्रकार चित्राची रचना करून देतो आणि त्यावर आधारित टॅपेस्ट्री विणकर तयार करतो. त्यामध्ये धागे रंगवण्याचा समावेश होतो आणि त्यासाठी रंगद्रव्ये आणि रसायनांचा वापर होतो. धागे रंगवले, की ते रिळात भरले जातात. यासाठी प्रामुख्याने उभा हातमाग वापरला जातो. पांढरे धागे उभे बांधून घेतले जातात आणि आडवे धागे रंगीत असतात. एकूणच तंत्र बऱ्यापैकी किचकट असते. हाताने विणायच्या मागावरील कामाप्रमाणे हे कष्टप्रद असतेच असते. चेन्नईच्या प्रदर्शनात ठेवलेल्या टेपेस्ट्री चित्रकार वासुदेव यांनी आपले विणकर मित्र सुब्बरायलू यांच्याकडून विणून घेतल्या होत्या. आपण ज्याप्रमाणे सिनेमा ही सांघिक कला मानतो, तसाच काहीसा हा सहयोगी कलेसारखा प्रकार मानला जातो. १५-२० वर्षांपूर्वी यावर वाद झाला होता, की कलाकृती वासुदेव यांची की सुब्बरायलू यांची? परंतु त्यावर पडदा पडला आहे. कल्पना आणि चित्रसंकल्प या गोष्टी वासुदेव यांच्या असल्याने कलाकृतीसुद्धा वासुदेव यांचीच. 

२५ वर्षांपूर्वी युरोपमध्ये गेले असताना पिकासो, मातिस, ब्राक अशा दिग्गजांच्या टेपेस्ट्री पाहून वासुदेव यांना कल्पना सुचली व त्यावर त्यांनी २५ वर्षे काम केले. कलाकृतींमध्ये झाडे व आजूबाजूला माणसे, स्त्री-पुरुषांचे चेहरे असे काही परिचित आकार दिसतात. मैथुन, अर्थस्केप, ह्युमनस्केप, जीवनाचा रंगमंच अशा चित्रमालिका वासुदेव यांनी टेपेस्ट्री या माध्यमामध्ये केल्या आहेत. सुब्बरायलू हे मुळातच विणकर कुटुंबातील आणि पारंपरिक स्वरूपात काम करणारे. १४व्या वर्षापासून ते वडिलांकडून विणकाम शिकलेले होते. व्यंकटगिरी पद्धतीची साडी ते विणत असत. विणकाम कलेतील नावाजलेले गुरू म्हणूनदेखील ते प्रसिद्ध आहेत. वासुदेव यांच्या आधीही चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्यासहदेखील त्यांनी टेपेस्ट्री केल्या होत्या. वर आणि खाली लाकडी पट्ट्यांच्या आधारे विणलेले हे कलात्मक गालिचे गॅलरीत चहूबाजूंनी भिंतीला टांगलेले होते. एखाद-दुसरा गालिचा मध्येच टांगलेला... दोन्ही बाजूंनी पाहता यावा म्हणून ही योजना. प्रदर्शनातील कलाकृतींत निळ्या, तांबड्या आणि मातकट रंगांना प्राधान्य दिलेले दिसत होते. कलाकृतीच्या खालच्या बाजूला इंच-दोन इंच उंचीची उभ्या दोऱ्यांची रांग सोडून दिली होती. हे धागे गोळ्यांप्रमाणे काम करत होते. 

टेपेस्ट्रीव्यतिरिक्त त्यांची तैलचित्रे काहीशी अंबादास या मूळच्या भारतीय आणि पुढे नॉर्वेत स्थायिक झालेल्या चित्रकाराच्या पद्धतीची आहेत. अंबादास हे अमूर्त रूपात, तर वासुदेव मूर्त रूपात चित्रकाम करतात. परंतु, त्यातील साम्यस्थळे पाहणाऱ्याच्या नजरेत सहज भरतात. वासुदेव यांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे कलाकारांसाठी चेन्नईजवळ ‘चोलामंडलम आर्टिस्ट व्हिलेज’ ही संस्था उभारणाऱ्या पण्णीकर या आपल्या गुरूला केलेले साह्य.

वासुदेव यांच्या या टेपेस्ट्री कलाकृतींचे प्रदर्शन पुढे विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. भारतात टेपेस्ट्री हा कलाप्रकार एका मर्यादेतच होताना दिसतो आहे. शांतिनिकेतन आणि सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् येथे या विषयाचे स्वतंत्र अभ्यासक्रम पदवी आणि पदव्युत्तर पदवीपर्यंत उपलब्ध आहेत. तरीही समकालीन कलाजगतात आणि कलाकारांमध्ये टेपेस्ट्रीला युरोपइतकी मान्यता आणि प्रसिद्धी मिळालेली दिसत नाही. म्हणूनच वासुदेव यांच्यासारख्या चित्रकारांचे या माध्यमातील प्रयोग महत्त्वाचे आणि कायम स्मरणात राहणारे असतात. सध्या वासुदेव बेंगळुरू येथे राहतात. दक्षिण भारतातील नामवंत चित्रकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. टेपेस्ट्री या माध्यमात सुब्बरायलू यांच्यासोबत ते नवनवे प्रयोग करत आहेत. गृहसजावट किंवा चर्चची सजावट यांच्या पलीकडे जाऊन हे अभिव्यक्तीचे साधन म्हणून भारतीय कलेत स्वीकारले जात आहे, हे महत्त्वाचे आहे. माध्यम म्हणून टेपेस्ट्रीच्या मर्यादा, निर्मितीसाठी लागणारा अनेक महिन्यांचा काळ या गोष्टी लक्षात घेतल्या, तर आपण सर्जनशील माध्यम म्हणून आपण त्याचा स्वीकार करू शकू.

सर्वसाधारणपणे मराठी भाषक समूहात टेपेस्ट्री विणकाम म्हणजे दिवाणखान्यातील गालिचे किंवा आजकाल सर्वत्र दिसणारी चिंध्यांची पायपुसणी इतक्याच स्वरूपात परिचित असते. परंतु सर्जनशील कलावंत त्यापुढेही या माध्यमाला कलाकृती म्हणून वेगळ्या दर्जाला नेऊन ठेवतात, हे यावरून जरूर लक्षात घ्यायला हवे. 

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(एस. जी. वासुदेव यांच्याबद्दलची अधिक माहिती, त्यांच्या कलाकृती http://www.vasudevart.com/ या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr. Madhuri Kathe About 243 Days ago
Hello Dr. Nitin Aapla lekh vachun khup aanand zala. Ashyach anek nir niralya madhyama madhye kam karnarya kalavanta vishayee che abhyas aamhala pudhil smaran chitre madhye miltil ashi mee vinanti karte. Dhanyawad. Aabhar Dr. Madhuri Kathe
1
0

Select Language
Share Link