Next
पुणेकरांनी अनुभवला शिवमणींचा अद्भुत तालाविष्कार
BOI
Saturday, August 11, 2018 | 12:53 PM
15 0 0
Share this story

पुणे : तबला, ड्रमसेट, झेंबे, घुंगरू, झांज, शंख, डमरू यांसोबतच बादली, प्लास्टिकचा जार, सूटकेस यांसारख्या पारंपरिक वाद्य नसलेल्या वस्तूंना शिवमणी या तालयोगीचा जादुई स्पर्श झाला आणि त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या नादातून वातावरणात एकच रंग भरला. तोंडाच्या वाफेने आवाज, शंख आणि घुंगरू, बादली वाजवून नानाविध वस्तूंमधून नाद निर्माण करीत जगप्रसिद्ध तालवादक शिवमणी यांनी आपली कला पुणेकरांसमोर पेश केली. पुणेकरांनीदेखील टाळ्यांच्या गजरात त्यांना साथ देत अद्भुत असा तालाविष्कार अनुभवला.  

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत वेंकीज उद्योग समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव व उत्तरादेवी राव यांच्या स्मरणार्थ नातूबाग पटांगण येथे राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवांतर्गत जगप्रसिद्ध तालवादक शिवमणी यांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी पराग ठाकूर, नितीन पंडित, शिरीष मोहिते, डॉ. विजय पोटफोडे, मंदार रांजेकर, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व कलाकार उपस्थित होते. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव यांनी उत्सवाला विशेष सहकार्य केले आहे.

उच्च प्रतीचे ड्रमसेट, तबला, झेंबे, घुंगरू, झांजा, शंख, डमरू वाजवून मंत्रमुग्ध करणारे नाद निर्माण करणे ही शिवमणींची खासियत; परंतु ढोल-ताशा पथकांच्या निनादाने ते भारावले  आणि मंचावरून खाली येत वादकांसोबत ताशा वाजविला. ढोल-ताशा पथकांच्या वादनाची जगभर कीर्ती पसरत असताना त्यांना देखील ताशा वाजविण्याचा मोह आवरला नाही. शिवमणी यांनी वादकांमध्ये मिसळत ताशा वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या खास शैलीत ताशा वादन करुन प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध केले.

शिवमणी म्हणाले, ‘ढोल ताशा वादकांकडून खूप काही शिकायला मिळाले. वादकांनी वाजविलेल्या वेगवेगळ्या तालातून आज नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. कोणतीही कला जोपासण्यासाठी सराव आवश्यक आहे. त्यामुळे कलेची साधना करायला हवी.’

श्री साक्षी नाशिक ढोल-ताशा आणि कोल्हापूरच्या स्वराज्य ढोलताशा पथकाचे या वेळी सादरीकरण झाले. अश्विनी जोग आणि योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी आज (ता ११) रंगणार आहे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट वाद्यपथकांमध्ये विजेतेपदासाठी चुरस पहायला मिळणार आहे. यासोबतच उत्कृष्ट ढोल वादक, उत्कृष्ट ताशा वादक, तसेच उत्कृष्ट ताल यांची देखील निवड होणार आहे. महाराष्ट्रातील विविधरंगी, विविधढंगी ढोल ताशावादन ऐकण्याची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. सायंकाळी सहा वाजता महाकरंडकपदासाठी वादन होणार आहे. रात्री ९.३० वाजता बालाजी राव यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होईल.

(झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत..)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link