Next
‘शिव-हरी’ यांच्या जुगलबंदीचा आस्वाद घेण्याची संधी
‘आनंद संघा’तर्फे ‘गुरू-वंदना’ कार्यक्रमाचे आयोजन
BOI
Friday, September 21, 2018 | 03:31 PM
15 0 0
Share this article:

पुणे : रसिकांना लवकरच प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा आणि प्रख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया या दोन दिग्गज कलाकारांच्या जुगलबंदीचा आस्वाद घेता येणार आहे. क्रियायोग परंपरेतील एक अवतारपुरूष मानले जाणारे परमहंस योगानंद यांचे शिष्य स्वामी क्रियानंद यांनी स्थापन केलेल्या ‘आनंद संघ’या संस्थेतर्फे रविवारी, ३० सप्टेंबर रोजी‘शिव-हरी’ यांच्या जुगलबंदीचा ‘गुरू-वंदना’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गणेश कला क्रीडा मंदिरात सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार असून, या मैफिलीत पं. विजय घाटे आणि पं. भवानीशंकर त्यांना साथ करणार आहेत.

‘योगसाधना आणि ध्यानधारणा यांच्याआधारे समाजाची उन्नती करण्याचे कार्य स्वामी परमहंस योगानंद ट्रस्टकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे निराधार, विधवा, वृद्ध महिला आणि परित्यक्तांना या ट्रस्टतर्फे कायमस्वरूपी मदत पुरविली जाते. त्याचाच एक भाग म्हणून या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमातून मिळणारे उत्पन्न वृंदावन येथील निराधार महिलांच्या मदतीसाठी दिले जाणार आहे. हा कार्यक्रमदेखील वृंदावनमधील महिलांना ‘लाईव्ह’ पाहता येणार आहे. परमहंस योगानंद यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रारंभी पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते भारतीय कलेवर आधारित स्वामी क्रियानंद यांनी लिहिलेल्या ‘आर्ट अॅज ए हिडन मेसेज’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या वेळी आनंद संघाचे जागतिक प्रमुख धर्माचार्य स्वामी ज्योतिश नोवाक, सीबीआयचे माजी संचालक आणि मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष डी. आर. कार्तिकेयन, परमहंस योगानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका पिया सिंग, संचालक मंजुनाथ किणी, स्वामी देवी, स्वामी जया, स्वामी ध्याना आणि आनंद संघाचे अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आनंद संघाचे जागतिक प्रमुख स्वामी ज्योतिश नोवाक यांनी चितारलेल्या तैलचित्रांच्या प्रदर्शनाचेही ऑनलाईन उद्घाटनही या वेळी होणार आहे. हे प्रदर्शन पुण्यातील रेंज हिल्स रस्त्यावरील अशोक संकुलात आनंद संघाच्या योगा सेंटरमध्ये रसिकांना सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत पाहता येणार आहे. सीएसआरवर्ल्ड डॉट नेट(csrworld.net) या लिंकवर ते ऑनलाईनही पाहता येणार आहे’, अशी माहिती आनंद संघाचे पुण्याचे शाखा प्रमुख डॉ. आदित्य गाईत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांचे सहकारी स्नेहल भट,  पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य संतूरवादक दिलीप काळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

‘या कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका ‘बुक माय शो डॉट कॉम’वर, तसेच बालगंधर्व रंग मंदिर,  टिळक स्मारक मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि कमला नेहरू पार्कसमोर शिरीष बोधनी यांच्याकडे २४ सप्टेंबरपासून उपलब्ध होतील’, असेही डॉ. गाईत यांनी सांगितले. ‘सामाजिक जाणिवेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास रसिकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा’,असे आवाहनही त्यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search