Next
ऐतिहासिक, पौराणिक वारसा असलेला चित्रदुर्ग
BOI
Wednesday, July 25, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

चित्रदुर्ग किल्ला
‘करू या देशाटन’ सदरात आपण सध्या कर्नाटक राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेत आहोत. आजच्या भागात माहिती घेऊ या ऐतिहासिक, पौराणिक वारसा असलेले चित्रदुर्ग शहर आणि किल्ल्याची, तसेच आजूबाजूच्या पर्यटनस्थळांची...
.................
सोलापूर-बेंगळुरू, तसेच पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वेदवती नदीच्या खोऱ्यामध्ये चित्रदुर्ग शहर व किल्ला वसलेला आहे. कलिनाकोट (Kallina Kote) या नावानेही हा किल्ला ओळखला जातो. चित्रदुर्ग हे ऐतिहासिक आणि पौराणिक कथांशी निगडित असलेले ठिकाण आहे. इ. स. ११०० ते इ. स. १३०० या कालावधीत चालुक्य काळात या किल्ल्याचे बांधकाम झाले होते. १५०० एकर क्षेत्रावर विस्तारलेला हा किल्ला भारतातील मोठ्या किल्ल्यांपैकी एक समजला जातो. अजस्र ग्रॅनाइटच्या शिळा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य. किल्ल्याचा परिसर एखाद्या भयानक राक्षसखेळाच्या मैदानासारखा दिसतो. तेथे त्यांनी मध्यभागी दगड फेकलेले असावेत असे वाटते. पूर्वी किल्ल्यावरील बाहेरील भिंतीच्या चार प्रवेशद्वारांतून प्रवेश केला जात असे. किल्ल्याला १९ भव्य दरवाजे होते. ३५ प्रवेश ठिकाणे आणि चार गुप्त वाटा होत्या. भव्य सागवानाचे प्रवेशद्वार हेही किल्ल्याचे एक वैशिष्ट्य. किल्ल्याचे सर्व दरवाजे संरक्षणसिद्ध होते. दोन हजार निरीक्षण मनोरे, अनेक तलाव आणि धान्याची कोठारे किल्ल्यावर होती. हा एक अभेद्य किल्ला होता.

तलावशिलालेखावरील संदर्भ पाहिल्यास चित्रदुर्गचा उल्लेख मौर्य काळापासून दिसून येतो. चित्रदुर्गचा महाभारतातही उल्लेख आहे. भीमाची दैत्यपत्नी ‘हिडिंबा’ येथे राहत असे. हा किल्ला चालुक्य काळात बांधला असावा, असे मानले जाते. इ. स. १३०० ते १५६५पर्यंत चित्रदुर्ग विजयनगर राज्यात समाविष्ट होते. विजयनगर साम्राज्य संपल्यावर त्यांचेच सरदार नायक यांनी या भागावर नियंत्रण मिळविले व त्यांनी १७७९पर्यंत राज्य केले. हैदरने दोन वेळा हल्ला केला; पण त्याला यश मिळाले नाही. तिसऱ्या हल्ल्यात १७७९मध्ये त्याने नायकांचा पराभव केला. टिपूच्या पाडावानंतर १७९७मध्ये इंग्रजांनी किल्ल्यात प्रवेश केला.

ओबव्वाने पराक्रम गाजविला तीच ही जागाचित्रदुर्ग किल्ल्याच्या एका रक्षकाच्या पत्नीचा सावधपणा आणि पराक्रमाची गाथा सांगितल्याशिवाय चित्रदुर्गची सफर पूर्ण होत नाही. हैदरअली जेव्हा दुसऱ्यांदा चित्रदुर्गावर चालून आला, त्या वेळी रखवालदार मुद्द हनुमा जेवणासाठी घरी आला होता. त्या वेळी त्याची पत्नी ओबव्वा पाणी आणण्यासाठी बाहेर आली. तेवढ्यात तेथील ‘ड्रेनेज’मधून माणसे बाहेर येताना तिला दिसली. या व्यक्ती आक्रमण करणाऱ्यांपैकी असाव्यात, अशी शंका तिला आली. तिने हाती तलवार घेऊन ‘ड्रेनेज’च्या तोंडावर लपून बसून, बाहेर येणाऱ्या माणसांची डोकी उडविण्यास सुरुवात केली. तिने शत्रूचे जवळजवळ २० सैनिक मारले. हे लक्षात येताच बाकीचे पळून गेले. अति ताण आल्यामुळे ओबव्वा मरण पावली. तेव्हापासून ओबव्वा अक्षरशः ‘हिरॉइन’ झाली. तिच्यावर चित्रपटही निघाला आहे. हे ‘ड्रेनेज’चे तोंड आता पर्यटकांचे आकर्षण झाले आहे.

किल्ल्याला पूर्वी सात तट होते. मुख्य प्रवेशद्वारावर सात तोंडाचा नाग, दोन डोक्याचे पक्षी, राजहंस, कमळफुले कोरलेली आहेत. प्रवेशद्वारावर मोठ्या भांड्यामध्ये उकळते तेल साठविण्यासाठी मोठे भांडे ठेवलेले असे. युद्धाच्या वेळी दारातून आत येणाऱ्या शत्रूवर ते टाकले जाई.

प्रवेशद्वारकिल्ल्यामध्ये १९ मंदिरे होती. येथे एक बौद्ध मठही होता. किल्ल्यावर हिडिंबेचे मंदिर आहे. मंदिराजवळच राजगुरू भृगुराजेंद्र मठ आहे. येथे पाषाणातील हत्ती, ससे, मगरी, नौका, साप, कासव इत्यादी प्राण्याची चित्रे कोरली आहेत. म्हणूनच या किल्ल्याचे नाव चित्रदुर्ग असे पडले असावे, असे काहींचे मत आहे. पुढे गेल्यावर राजाचा पाच टेकड्यांमधील सुरक्षित महाल आहे. १५व्या शतकात मती थिमाना नायक यांनी बांधलेले एकनाथेश्वर मंदिर तेथे असून, जवळच दीपस्तंभ आणि एक कमानही आहे. किल्ल्यावर छोट्याश्या गुहेत असलेल्या बनशंकरी मंदिरात अद्यापही पूजा-अर्चा होते. तेथे पुढे मोठे खड्डे आहेत व त्यामध्ये तोफांकरिता गन पावडरचा चुरा करण्यासाठी मोठे ग्राइंडर स्टोन आहेत. ते रेड्यांच्या साह्याने फिरविले जात असत.

पुरातत्त्व संग्रहालयचित्रदुर्ग गावामध्ये पुरातत्त्व संग्रहालय असून, ते भारतातील विशाल वारसा दाखविणारे संग्रहालय आहे. येथे असलेले काही महाकाय शिक्के आणि प्राचीन भारतातील दुर्मिळ चांदीच्या वस्तू नेहमी सर्व वयोगटातील इतिहासकारांचे लक्ष वेधून घेतात. आता नव्यानेच किल्ल्याजवळ संग्रहालय उभारण्यात येत आहे.

चित्रदुर्गच्या आसपास

ब्रह्मगिरी : हे गाव सम्राट अशोकाची प्रांतीय राजधानी होती. सम्राट अशोकाचा इ. स. पूर्व ३००मधील ब्राह्मी लिपीतील शिलालेख येथे आहे.

अदुमल्लेश्वरअदुमल्लेश्वर : चित्रदुर्ग जिल्ह्यातील हे आणखी एक प्रसिद्ध मंदिर असून, ते किल्ल्यापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. येथे एक शिवमंदिर आहे. तेथे एक लहान प्राणिसंग्रहालयही असून, त्यात काही मोठी मांजरे आणि अस्वल, मगर, मोर, ससे वगैरे पाहायला मिळतात. नंदीच्या मुखातून चालणारे बारमाही प्रवाह देखील आहे जवळच एक तळे आहे. त्यात दुर्मीळ मासे आहेत.

बागुरु : होसदुर्गापासून १० किलोमीटरवर असलेले हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे श्री प्रसन्ना चन्नकेशव स्वामी नावाचे एक प्राचीन मंदिर (चोळकालीन) आहे. तेथे सुंदर रथ आहे आणि विविध प्राचीन मूर्ती आहेत. येथील परिसरात १०१ मंदिरे व विहिरी आहेत.

सिद्धपूरसिद्धपूर : हे एक महत्त्वाचे पुरातन स्थळ आहे, जिथे सम्राट अशोकाचे शिलालेख सापडले. जवळच रामगिरी नावाची एक उंच टेकडी आहे. रामायणाच्या कथेशी या टेकडीचा संबंध सांगितला जातो. इ. स. ९००मधील रामेश्वर मंदिरही येथे आहे.


चंद्रवल्लीचंद्रवल्ली : हे चित्रदुर्ग जिल्ह्यातील एक पुरातन ठिकाण आहे. हा प्रदेश म्हणजे तीन चित्रदुर्ग, किरबाणकाल्लू आणि चोलगाडू या पर्वतांमधील एक खोरे आहे. हा दुष्काळी प्रदेश आहे. येथे मातीची पुरातन मडकी, रंगवलेल्या कमानी, विजयनगर, सातवाहन आणि होयसळ यांसारख्या भारतीय वंशांची, तसेच रोमन सम्राट ऑगस्टस सीझर याची नाणी सापडली. जवळच्या डोंगरात सापडलेले शिलालेख चालुक्य आणि होयसळकालीन आहेत. कदंब राजवंशाचा संस्थापक राजा मयूरशर्मा येथीलच होता.

चिकजाजूर : येथे एक किल्ला आहे, तसेच कॉटन सेंटर आहे. या शहराचे मुख्य आकर्षण म्हणजे ५०० वर्षांपूर्वीचे मारुतीचे मंदिर. अडणूर भीमप्पाचे शानभाग यांनी याचा जीर्णोद्धार केला. बेंगळुरू-हुबळी रेल्वेस्थानकांच्या दरम्यान हे रेल्वे जंक्शन आहे. त्यामुळे त्याला खूप महत्त्व आहे.

प्रवास कसा कराल?

दावणगेरे ते चित्रदुर्ग ६० किलोमीटर. चित्रदुर्ग ते बेंगळुरू २०३ किलोमीटर. हंपी ते चित्रदुर्ग १५० किलोमीटर. चित्रदुर्ग हे ठिकाण रेल्वेने बेंगळुरू-मिरज मार्गाला, चिकजाजूर जंक्शनला जोडलेले आहे. जवळचा विमानतळ बेंगळुरू - २०३ किलोमीटर. पुणे-सोलापूर-विजापूर-बदामी-हंपी-चित्रदुर्ग-दावणगेरे-हळेबीड-चिकमंगळूर-हुबळी-बेळगाव पुणे असा वर्तुळाकार प्रवास करता येईल. साधारण १५ दिवसांत ही मध्य कर्नाटकची सहल होते. ऑक्टोबर ते फेब्रुवारीअखेर हा चांगला कालावधी आहे. चित्रदुर्ग, दावणगेरे, हरिहर, हावेरी, हळेबीड, हुबळी येथे राहण्याची चांगली व्यवस्थाही होऊ शकते.

- माधव विद्वांस
ई-मेल :
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

चित्रदुर्ग शहर आणि किल्ला

(चित्रदुर्ग शहर आणि किल्ल्याची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Suhas shahane. About 360 Days ago
खूपच छान .माहिती ..धन्यवाद .
0
0
Milind Lad About 362 Days ago
Mast pravas & sthal varnan.
0
0

Select Language
Share Link
 
Search