Next
मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान
सह्याद्री हॉस्पिटलमध्ये यशस्वी हृदय प्रत्यारोपण
BOI
Wednesday, June 12, 2019 | 04:31 PM
15 0 0
Share this article:

पुणे :  नुकतीच दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला कोल्हापूरमधील १८ वर्षीय तरुण दुचाकी अपघातामुळे मेंदूमृत झाला. त्याचे हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान करण्यात आल्याने चार रुग्णांना नवजीवन मिळाले. 

मंगळवारी, ११ जून रोजी सकाळी ग्रीन कॉरिडॉरच्या साहाय्याने अवघ्या दोन तास २० मिनिटांत दात्याचे हृदय कोल्हापूरहून पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांच्या चमूने हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज यांच्या नेतृत्त्वाखाली भिगवण येथील ३० वर्षीय शेतकऱ्यावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण केले. हे डेक्कन येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दुसरे हृदय प्रत्यारोपण आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. मनोज दुराईराज म्हणाले, ‘कोल्हापूरमधील डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे एका १८ वर्षीय तरूणाला मेंदूमृत घोषित केल्याचे समजले. त्यानुसार डॉक्टरांचा चमू कोल्हापूरला रवाना झाला. पहाटे दोन वाजता तेथे पोहोचल्यानंतर या दात्याचे हृदय काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहाटे पाच वाजता हे ह्रदय घेऊन निघालेला डॉक्टरांचा गट ग्रीन कॉरिडॉरद्वारे अवघ्या दोन तास २० मिनिटांत पुण्याला पोहोचला. त्यानंतर तब्बल सहा तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे ३० वर्षीय शेतकऱ्यावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्यात आले.’

हृदयप्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज यांच्या नेतृत्त्वाखालील डॉक्टरांच्या चमूमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. शंतनू शास्त्री, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राजेश कौशिक, डॉ. तडस, हृदयभूलतज्ज्ञ डॉ. सुहास सोनवणे, डॉ. सौरभ बोकील, प्रशांत धुमाळ आदींचा समावेश होता. डॉ. स्वाती निकम यांनी समन्वयाचे काम पाहिले.

सह्याद्री हॉस्पिटल्सचे डॉ. केतन आपटे म्हणाले, ‘डेक्कन येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हे दुसरे हृदय प्रत्यारोपण आहे. पहिले हृदय प्रत्यारोपण मार्च महिन्यात झाले होते. दोन-तीन दिवसांपूर्वी सह्याद्रीच्या हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञांनी नागपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये मध्य भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण केले. प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती, या समितीच्या प्रमुख आरती गोखले, वाहतूक पोलिस, कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर यांच्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे.’

मेंदूमृत तरुणाचे यकृत आणि मूत्रपिंड दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील रुग्णांसाठी वापरण्यात आले. 

हेही जरूर वाचा :

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search