Next
पुण्याच्या वैष्णवीची यशस्वी घोडदौड
BOI
Friday, September 28, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

वैष्णवी आडकर

पुण्याचे टेनिस क्षेत्र नावारूपाला येत आहे, ते इथल्या अगदी छोट्या वयापासून टेनिस शिकून तयार होणाऱ्या खेळाडूंमुळे. या क्षेत्रात पुण्यात सध्या अनेक नवीन तारे उदयाला येत आहेत. यांपैकीच एक म्हणजे टेनिसपटू वैष्णवी आडकर.... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या नवोदित टेनिसपटू ‘वैष्णवी आडकर’बद्दल...
....................................
पुण्याच्या टेनिस क्षेत्रात अनेक खेळाडू सध्या नावारूपाला येत आहेत आणि विविध स्पर्धा गाजवत आहेत. अशाच खेळाडूंमध्ये एक नाव सध्या चर्चेत आहे, ते म्हणजे वैष्णवी आडकर हिचे.  ऑल इंडिया टेनिस असोसिएशन, तेलंगणा राज्य टेनिस संघटनेच्या हैदराबाद येथील सानिया टेनिस अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या नॅशनल सीरिज टेनिस स्पर्धेत पुण्याच्या वैष्णवी आडकरने एकेरी व दुहेरीत विजेतेपद संपादन करत दुहेरी मुकुट मिळवला आहे.

चौदा वर्षांखालील गटाच्या एकेरीत वैष्णवीने उपांत्य फेरीत साई भोईरचा ६-१, ६-१ असा सरळ पराभव केला, तर अंतिम फेरीत महाराष्ट्राच्याच राधिका महाजनवर ६-१, ६-२ असा विजय मिळवला. दुहेरीत उपांत्य फेरीत वैष्णवी आडकरने महाराष्ट्राच्या परी सिंगच्या साथीने तेलंगणाच्या चांदणी श्रीनिवासन व महाराष्ट्राच्या राधिका महाजन या जोडीचा ६-१, ६-१ असा पराभव केला होता, तर अंतिम फेरीत वैष्णवी आडकर व परी सिंगने हरियानाच्या सूर्यांशी तन्वर व मैथिली मोथे या जोडीवर ६-३, ६-२ असा विजय प्राप्त करत दुहेरीच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. गुवाहाटी येथे याआधी झालेल्या सुपर सीरिज टेनिस स्पर्धेतही वैष्णवी आडकरने चौदा वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवले होते.  

वैष्णवी सध्या एरंडवणा येथील अभिनव इंग्रजी माध्यम प्रशालेत आठवी इयत्तेत शिकत असून, ती ‘बाउन्स टेनिस अकादमी’त केदार शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. बारा वर्षांखालील गटापासून वैष्णवीने सुरुवात केली आणि प्रत्येक स्पर्धेत तिने आपला ठसा उमटवला. खरे तर १०व्या वर्षी तिने टेनिसचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. ‘एमएसएलटीए’च्या अनेक स्पर्धा त्यावेळी तिने खेळल्या, मात्र मनाप्रमाणे यश मिळवण्यासाठी तिला बरीच वाट पाहावी लागली. १२ वर्षांखालील गटात खेळण्यास सुरुवात केल्यापासून तिच्या यशाचा आलेख उंचावला. या गटात तिने खऱ्या अर्थाने व्यावसायिक टेनिसमध्ये पर्दापण केले. चंदीगढ, मुंबई आणि गुरगाव येथील स्पर्धा जिंकत तिने जाणकारांना आपल्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले. बंगळूरमध्ये १६ वर्षांखालील गटात तिने विजेतेपद मिळवले आणि आगामी काळात आपण राष्ट्रीय स्तरावरही यशस्वी होऊ असा विश्वास मिळवून दिला.   

आता ती वयोगटात खेळत असली, तरी महिलांच्या खुल्या गटात जेव्हा ती खेळेल, तेव्हा तिची खरी कसोटी लागेल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपाला येण्यासाठी महिला गटात तिची कामगिरी १०० टक्के सरस झालीच पाहिजे. तिचे प्रशिक्षक केदार शहा हेच तिच्या गुणवत्तेची हमी देतात. केवळ ज्युनियर गटाच्या किंवा वयोगटाच्या स्पर्धा न खेळता खुल्या गटांत होणाऱ्या जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळ्यांवरील प्रत्येक स्पर्धेत तिने सहभागी होणे गरजेचे आहे. या सहभागातून सुरुवातीला जरी अपयश आले, तरी त्यातून तिला मिळणारा अनुभव मात्र खूप मोठा असेल.  

सध्या केवळ आठवीत शिकत असलेली वैष्णवी मुख्य स्पर्धांमध्ये खेळेल, तेव्हा तिच्यातील आत्मविश्वासही वाढेल आणि अन्य खेळाडूंचा खेळ पाहून तिच्यात बदलही होतील. हेच बदल तिला तिच्या प्रगतीत मोलाचे ठरतील. वरच्या स्तरावर खेळताना पदरमोड करून खेळण्यापेक्षा तिला एखादे प्रायोजक मिळाले, तर आर्थिक पाठिंबा मिळेल आणि तिचा खेळही आणखी बहरेल. शालेय स्पर्धा, महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ स्तरांवरील स्पर्धेत तिला आता स्वतःला सिद्ध करावे लागेल. तरच ती राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्रवेश करू शकेल. तिचे प्रशिक्षक अत्यंत अनुभवी असल्यामुळे तिची तयारी उत्तमरीत्या सुरू आहे. साधारणतः भारतीय टेनिसमध्ये दक्षिण भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसतो. त्याला जर प्रतिउत्तर द्यायचे असेल तर दक्षिण भारतात होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत तिने सहभाग घेत अनुभव घ्यायला हवा. हे सगळे जुळून आले, तर वैष्णवी एक सामान्य खेळाडू न राहता असामान्य खेळाडू झालेली दिसेल.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. 'क्रीडारत्ने' सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link