Next
‘जीजीपीएस’मध्ये मुलांनी भरवला बाजार
BOI
Saturday, February 02, 2019 | 11:41 AM
15 0 0
Share this story

शाळेत भरवलेल्या बाजाराचे उद्घाटन करताना उद्योजक आनंद देसाई आणि प्रियांका देसाई. शेजारी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विजया पवार

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम शाळेत (जीजीपीएस) एक फेब्रुवारी २०१९ रोजी तिसरी ते पाचवीतील मुलांनी वार्षिक बाजार भरवला होता. या बाजाराला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या बाजाराचे उद्घाटन रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक आनंद देसाई आणि प्रियांका देसाई यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या प्रसंगी ‘जीजीपीएस’च्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विजया पवार यांसह शाळेतील शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे, बाजारातील व्यवहार कशाप्रकारे चालतात, ग्राहक आणि विक्रेता यांच्यातील नाते कसे असावे, संवाद कशा प्रकारचा असावा, आपली वस्तू विकण्यासाठी ग्राहकाला कशा प्रकारे तयार करावे आणि महत्त्वाचे म्हणजे पैसे कमविण्यासाठी कशा प्रकारे मेहनत करावी लागते याचे प्रात्यक्षिक मिळावे या हेतूने शाळेच्या वतीने हा बाजार भरविण्यात आला होता. हे या बाजाराचे दुसरे वर्ष होते. गतवर्षी आयोजित केलेल्या बाजाराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून या वर्षीही शाळेतील शिक्षकांनी पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या बाजाराचे नियोजन केले होते.

बाजारात खरेदी करण्यासाठी पालकांनी केलेली गर्दी

या विषयी बोलताना उद्योजक देसाई म्हणाले, ‘शाळेने आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय स्त्युत्य असून, या  विद्यार्थ्यांमधून भावी उद्योजक तयार व्हावेत यासाठी शाळेने दर वर्षी असे उपक्रम राबवावेत. हा बाजार बघून अतिशय आनंद होत असून, या वयात मुलांना बाजाराचे स्वरूप काय असते, तेथील व्यवहार कसे चालतात याची माहिती मिळाली, तर निश्चितच त्यांना याचा फायदा होईल आणि त्यांची प्रगतीही होईल.’

प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पवार म्हणाल्या, ‘रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन आणि पदाधिकारी यांच्या प्रोत्साहनामुळे या वर्षीही मुलांचा वार्षिक बाजार भरविण्यात आला होता. यासाठी पालक, विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुलांनी भरविलेल्या या बाजारातून खरेदी-विक्री करताना प्रत्यक्ष बाजारातील व्यवहार कसे चालतात याचा अनुभव मुलांना घेता यावा यासाठीच या विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते.’

या बाजारात तिसरी ते पाचवीतील मुलांनी विविध प्रकारच्या वस्तू, सामान विक्रीसाठी ठेवले होते. यामध्ये भाजी, पुस्तके, खाद्य, फळे, झाडांची रोपे आणि खते, कागदी आणि कापडी पिशव्या, वेगवेगळ्या प्रकारची पीठे, धान्य आदींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या या सर्व स्टॉल्सवरील वस्तू शिक्षक, पालकांनी खरेदी करून मुलांना प्रोत्साहन दिले.

(‘जीजीपीएस’मध्ये भरविण्यात आलेल्या बाजाराचा व्हिडिओ सोबत देत आहोत)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link