Next
‘महाराष्ट्र तंबाखूमुक्त करू या’
आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Wednesday, May 29, 2019 | 05:21 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘जागतिक तंबाखूविरोधी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र तंबाखुमुक्त करण्याच्या दिशेने आपण कार्य करायला हवे. तंबाखूविरोधी अभियान ही एक चळवळ म्हणून कायमस्वरूपी रुजविणे गरजेचे आहे,’ असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक आरोग्य संघटना व सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू विरोधी दिन राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

आरोग्यमंत्री म्हणाले, ‘भारतात साधारणतः आठ ते नऊ लक्ष व्यक्ती तंबाखूमुळे दगावतात. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, नपुंसकत्व यांसारख्या गंभीर आजारांबाबत जनजागृती राज्यशासन करीत असून, पानाच्या दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांसोबतच अन्य खाद्यपदार्थ, शीतपेये, चॉकलेट व बिस्किटे या पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.’ 

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राज्यात सन २०१७-१८पासून राबविण्यात येत असून, २०१७च्या गॅट्स-टू (ग्लोबल ॲडल्ट टू टोबॅको)  या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र सर्वांत कमी धूम्रपान करणारे राज्य म्हणून पुढे आले आहे.


राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आत्तापर्यंत राज्यभरात ३७४ तंबाखूमुक्ती केंद्रांची स्थापना केली आहे. ८०४ आरोग्य संस्था, तसेच दोन हजार ७५५ शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या असून, आपणा सर्वांच्या प्रयत्नाने या आकड्यांमध्ये वाढ होऊन राज्य तंबाखूमुक्त होईल, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. रेल्वे प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य संस्था या कार्यात अग्रभागी असून, हे अभियान शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यात येत आहे. मौखिक आरोग्य मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केले.

डॉ. अनुपकुमार यादव म्हणाले, ‘सार्वजनिक आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन आणि जागतिक आरोग्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या कार्यामुळे लवकरच राज्य तंबाखुमुक्त करण्यात यश प्राप्त होणार आहे. आजतागायत मौखिक आरोग्य मोहिमेअंतर्गत दोन कोटी लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यंदाचे तंबाखूविरोधी दिनाचे घोषवाक्यदेखील तंबाखू आणि फुफ्फुससंबंधित आरोग्यावरील दुष्परिणाम असेच आहे. आपण आपल्या आजुबाजुला तंबाखू सेवन करणाऱ्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करूया कारण त्यांच्या धुम्रपानाचा परिणाम आपल्या आरोग्यावर सर्वांत जास्त होत असतो.’ 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस फुफ्फुसाच्या प्रतिकाचे अनावरण आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जनजागृतीपर रॅलीला प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली. कार्यक्रमादरम्यान तीन हजार विद्यार्थ्यांनी ई-सिगारेट विरूद्ध स्वाक्षरी मोहीम राबविली होती. ही ई-सिगारेट बंद करण्यासाठीचे निवेदन या वेळी देण्यात आले. पेन्सिलच्या प्रतिकाने ई-सिगारेट नष्ट करण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या हातात ई-हुक्का किंवा सिगारेट न येता पेन आणि पेन्सिल येऊन देशाचे भवितव्य घडविण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना या वेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव, आरोग्य सेवेच्या सहसंचालक डॉ. साधना तायडे, आरोग्य सेवेचे अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार, जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. जगदीश कौर, सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि मुंबईतील महापालिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search