Next
‘पुण्याने मला मोठे केले’
BOI
Wednesday, January 03, 2018 | 12:15 PM
15 0 0
Share this article:

 
पुणे : ‘मला पुण्याने मोठे केले. मी माशेलकर नसून पुणेकरच आहे. या पुण्याने माझे लाड केले आणि वाढविले. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत पुण्यातच राहीन,’ अशी कृतज्ञतेची भावना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली. ‘‘फेल’ म्हणजे ‘फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग.’ अहोरात्र मेहनत आणि खचून न जाता कार्य करत राहिल्याने यश तुमच्याकडे धावत येईल,’ असा सल्लाही माशेलकर यांनी दिला.

डॉ. माशेलकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त एक जानेवारी रोजी पुण्यात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, भारती अभिमत विद्यापीठ, सिम्बायोसिस विद्यापीठ, डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी व इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटी यांच्यातर्फे हा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. माशेलकर यांनी वैज्ञानिक  व सामाजिक क्षेत्रात आयुष्यभर केलेल्या संशोधन व राष्ट्रसेवेच्या कार्याबद्दल त्यांना तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञान-विज्ञान-ब्रह्मऋषी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती पद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, भारती विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, वैशाली रघुनाथ माशेलकर, भारती विद्यापीठाचे सचिव डॉ. विश्वजित कदम, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, सिम्बायोसिसच्या प्रिन्सिपल डायरेक्टर डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. जय गोरे, डॉ. राजेंद्र शेंडे, तुळशीराम कराड, पं. वसंत गाडगीळ, फिरोज बख्त अहमद, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण व एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय हे मान्यवर या वेळी उपस्थित होते. तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची सुवर्णजडित प्रतिमा, सन्मानपत्र, सुवर्णपदक व रोख रुपये सव्वा लाख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

डॉ. माशेलकर यांनी या कार्यक्रमात प्रेरणादायी भाषण केले. ते म्हणाले, ‘ऊर्जा केंद्रित केल्यावर काहीही घडू शकते. तसेच, भारत देश एक झाला, तर तो या विश्वात काहीही करू शकतो; पण त्यासाठी कठोर मेहनत व परस्पर सहकार्य असावे लागेल. भारतात एकशे ३० कोटी मेंदू आहेत. त्यांच्या कल्पकतेचा वापर या देशासाठी केल्यास येणाऱ्या काळात भारत वेगाने प्रगतिपथावर जाईल. जय जवान-जय किसान या प्रचलित घोषणेनंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जय विज्ञान ही घोषणा दिली. त्यानंतर देशात वैज्ञानिक क्रांती आली.’

या वेळी आपल्या आईच्या नावाने ‘अंजली माशेलकर फाउंडेशन’ची स्थापना करत असल्याची घोषणा त्यांनी केली. या माध्यमातून चांगले कार्य करणाऱ्या, परंतु जगासमोर न आलेल्या तरुण शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यात येणार असून, त्या माध्यमातून एक नव्हे, तर हजारो माशेलकर तयार होतील, असा विश्वास डॉ. माशेलकर यांनी या वेळी व्यक्त केला.

‘विद्यार्थ्यांनी आकांक्षा मोठी ठेवावी. कुठल्या कार्याची फलश्रुती तत्काळ मिळत नाही. अहोरात्र मेहनत आणि खचून न जाता कार्य करत राहिल्याने यश तुमच्याकडे धावत येईल. ‘फेल’ म्हणजे ‘फस्ट अटेम्प्ट इन लर्निंग.’ त्यामुळे आयुष्य जगताना खचून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी सदैव आपल्या मेंदूचा नव्हे, तर हृदयाचा आवाज ऐकून कार्य करावे,’ असा सल्लाही माशेलकर यांनी दिला.

प्रा. डॉ. विश्वानाथ कराड म्हणाले, ‘२१वे शतक हे भारताचे असेल, असे भाकीत करणारे स्वामी विवेकानंद यांचे स्वप्न डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारखे अध्यात्मिक वैज्ञानिक पूर्ण करतील. ज्ञान-विज्ञान व अध्यात्माच्या आधारे भारतभूमी संपूर्ण विश्वाला शांतीचा मार्ग दाखवेल. भारतीय परंपरा ही त्याग व समर्पणाची आहे. डॉ. माशेलकरांच्या माध्यमातून भारताला मानवतावादी वैज्ञानिक मिळाला आहे. जगभरात ते भारताची प्रतिमा उजळून टाकतील.’

(डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या प्रेरणादायी भाषणाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search