Next
नवजात बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी
गटारात फेकलेल्या बालकाला जेरबाई वाडिया हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले जीवदान
BOI
Friday, April 05, 2019 | 06:25 PM
15 0 0
Share this article:

बेबी टायगरसह बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटलची टीम

मुंबई : जन्मताक्षणी कोणीतरी मृत्यूच्या स्वाधीन केलेल्या त्या एका दिवसाच्या बाळाने मेंदूच्या संसर्गासारख्या आजाराशी वाघासारखी झुंज देऊन मृत्यूला पराभूत केले. त्यामुळे मुंबईतील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ‘बेबी टायगर’ असे त्याचे नामकरण केले आहे. या डॉक्टरांच्या उपचारांनीच त्याला पुनर्जन्म मिळाला असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ते बाळ नवीन आयुष्यात पाऊल टाकत आहे.

त्याचा जन्म होताच त्याला गटारात फेकून देण्यात आले होते; पण एका सहृदय जोडप्याने त्याचा आवाज ऐकला आणि त्याला या गटारातून बाहेर काढले. ३० डिसेंबर २०१८ रोजी अंबरनाथ येथे ही घटना घडली. या जोडप्याने या नवजात बाळाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले; पण मेंदूला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २८ जानेवारी रोजी त्याला वाडिया हॉस्पिटलमधील नवजात शिशूंसाठीच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. 

मेनिंजायटिस आणि व्हेंट्रिक्युलायटिस हे गंभीर संसर्ग त्याला झाले होते. त्यातून त्याला वाचविण्यासाठी उच्च क्षमतेच्या प्रतिजैविकांचे डोस त्याला रक्तातून देण्यात आले. त्यानंतर त्याच्या मेंदूवर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली. अनेक अल्ट्रासाउंड चाचण्या, एमआरआय, सिटीस्कॅन करण्यात आले. दोन महिन्यांहून अधिक काळ उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि हा चिमुकला या आजारातून पूर्णतः बरा झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेव्हा त्याचे वजन केवळ एक किलो ८०० ग्रॅम होते. आता त्याचे वजन तीन किलो चारशे ग्रॅम झाले आहे. सध्या त्याला फिजिओथेरपी देण्यात येत असून, आणखी काही काळ ती सुरू राहणार आहे.

याबाबत वाडिया हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, ‘आमच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर या बाळाचा जीव वाचवू शकले आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ते घरी जात आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. यानंतर त्याची वाढ योग्य प्रकारे होत आहे याची नियमित तपासणी करावी लागणार आहे.’

‘या बेबी टायगरचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलने केलेल्या मदतीसाठी मी त्यांचा आभारी आहे. येथील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी या सगळ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे आज हे बाळ सुखरूप घरी चालले आहे. त्याला उदंड आणि आरोग्यमय आयुष्य लाभो, हीच सदिच्छा,’ अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी व्यक्त केली.


(आठ वर्षांच्या अनुश गिरनाळेलाही ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी यशस्वी यकृत प्रत्यारोपण करून नवजीवन दिले आहे. त्याची सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मकरंद About 105 Days ago
बेबी टायगरला हार्दिक शुभेच्छा आणि ज्या जोडप्याने त्याला आपलेसे केले व वाडिया हॉस्पिटलचे डॉक्टर व सिस्टर्सचे खूप खूप अभिनंदन
0
0

Select Language
Share Link
 
Search