Next
फेरफटका नागझिरा अभयारण्यात
BOI
Wednesday, March 28, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

नागझिरा अभयारण्य (फोटो : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची वेबसाइट)
‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात फेरफटका मारू या विदर्भातील नागझिरा व्याघ्र प्रकल्प, भवभूतीचे पद्मापूर आणि आसपासच्या ठिकाणी...
..............
नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प जैवविवधतेने संपन्न असून, कान्हा, पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. रामायणात ज्याचा दंडकारण्य म्हणून उल्लेख केला जातो, तो भाग अमरकंटकपासून तेलंगणातल्या कालेश्वरपर्यंत पसरलेला आहे. यामध्ये बांधवगड, कान्हा, पेंच, नागझिरा, नवेगाव, ताडोबा अंधारी, छपराला अशी अनेक अभयारण्ये आहेत.

नागझिरा अभयारण्यसंस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही आहे. त्यावरून नागझिरा हे नाव पडले असावे. नागझिरा या अभयारण्यात तलावही आहे. नैसर्गिक स्थिती टिकविण्यासाठी नागझिरा अभयारण्यात विद्युतपुरवठा केला जात नाही.

विदर्भात पाऊस व ऊन भरपूर असल्याने वनश्रीचा वरदहस्त आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना २०१३मध्ये निघाली. नवेगाव राष्ट्रीय उद्यान (१३३.८८० चौरस किलोमीटर), नवेगाव वन्यजीव अभयारण्य (१२२.७५६ चौरस किलोमीटर), नागझिरा वन्यजीव अभयारण्य (१५२.८१० चौरस किलोमीटर), नवीन नागझिरा वन्यजीव अभयारण्य (१५१.३३५ चौरस किलोमीटर) आणि कोका वन्यजीव अभयारण्य (९७.६२४) आजूबाजूला वसलेली आहेत. अभयारण्यात गवताळ कुरणे मुबलक प्रमाणात असल्याने नीलगाय, तसेच सांबर, चितळ, भेकर आणि गव्यांसारखे शेकडो तृणभक्षी मुक्तपणे विहार करताना दिसतात.

ढाण्या वाघांसह, बिबटे, रानकुत्रे, लांडगे, अस्वल, रानगवे, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर, ऊदमांजर, ताडमांजर, उडणारी खार, सर्पगरूड, मत्स्यगरूड, टकाचोर, खाटीक, राखी धनेश, नवरंग कोतवाल असे अनेक प्राणी-पक्षी येथे पाहायला मिळतात. सुमारे २०० प्रकारचे पक्षी येथे आढळतात.

अभयारण्यात जाण्यासाठी पिटेझरी आणि चोखमारा अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. येथे महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियालसह हळद्या, नीलपंखी, स्वर्गीय नर्तक, नवरंगी, तसेच तुरेवाला सर्पगरूड, मत्स्यगरूड, व्हाइट आइड बझार्ड यांसारखे शिकारी पक्षी, अनेक प्रकारची फुलपाखरे आणि निरनिराळ्या प्रकारचे कोळी दिसून येतात. येथे हिंस्र पशूही आहेत. नवीन नागझिरा अभयारण्य क्षेत्रात भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी यातील काही भाग, तसेच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा काही भाग यांचा समावेश आहे. या क्षेत्रात १२ तलाव आहेत. ते वन्यजीवांना पोषक आहेत. चांदीटिब्बा या परिसरात वन्यजीवांना पाहण्यासाठी मचाण उभारण्यात आले आहे.

नवेगाव बांधनवेगाव बांध : गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेस अर्जुनीमोरगाव तालुक्यात गोंदियापासून ६५ किलोमीटरवर हे स्थळ आहे. येथे बस किंवा रेल्वेने जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन देवूलगाव हे असून, ते ठिकाण गोंदिया-चंद्रपूर या मार्गावर आहे. हे ठिकाण नागपूरपासून १५० किलोमीटर अंतरावर आहे. येथे धरण असून ते बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे. त्यात २०९ प्रकारचे पक्षी, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या नऊ प्रकारच्या जाती, २६ प्रकारचे मांसाहारी प्राणी राहतात. यात मुख्यत: वाघ, जंगली मांजर, हरीण, कोल्हा, लांडगा आदी प्राण्यांचा त्यात समावेश आहे. येथे राहण्यासाठी विश्रामघर, तसेच लॉज, हॉटेल्स इत्यादींची सोय असून, येथेच प्राणिसंग्रहालय व वाचनालयही आहे. (नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची वेबसाइट : http://www.mahanntr.com/)

तेंदूपत्तातेंदूपत्ता गोळा करणे हा येथील आदिवासींचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. तेंदू वृक्ष ४० फूट उंचीपर्यंत वाढू शकतो; पण तेंदू पानांकरिता त्याची जमिनीलगतच छाटणी करण्यात येते. एप्रिल आणि मे महिन्यात या झाडांना चांगली पालवी फुटते. जास्त जुनीही नाहीत आणि कोवळीही नाहीत, अशी पाने तोडली जातात. दहा-पंधरा दिवस कडक उन्हात वाळवल्यानंतर या पानांची रवानगी गोदामात होते आणि मग आवश्यकतेनुसार पाने जराशी ओली करून ती वापरली जातात.

वन विभागाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, एक ऑक्टोबर ते ३१ जानेवारी या कालावधीत सकाळी ७ ते संध्याकाळी सहा या वेळेत, एक फेब्रुवारी ते १५ जून या कालावधीत सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत अभयारण्यात जाता येते. १६ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत अभयारण्यात प्रवेश दिला जात नाही.

पद्मापूरपद्मापूर :
आठव्या शतकात होऊन गेलेला भवभूती हा संस्कृत पंडित, नाटककार आणि कवी ज्या गावात जन्मला ते गाव म्हणजे पद्मापूर होय. त्यांच्या वडिलांचे नाव नीळकंठ व आईचे नाव जतुकर्णी होते. हे गाव गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात आहे. भूवभूतीचे शिक्षण ग्वाल्हेरजवळील डबरा (जुने नाव पद्मपवय) येथे झाले. कनोजचा राजा यशोवर्मन याच्या दरबारी तो पंडित म्हणून होता. महावीरचरितम्, उत्तररामचरितम्, मालतीमाधव ही संस्कृत नाटके त्याने लिहिली. यमुनेच्या काठावरील काल्पी या गावात त्याने ही नाटके लिहिली. पद्मापूर हे ठिकाण भवभूतीसारख्या महान व्यक्तीचे जन्मठिकाण असूनही, फारसे कोणाला माहीत नाही. ओडिशामध्येही पद्मापूर नावाचे गाव असून, भवभूती तेथील असल्याचे सांगितले जाते; पण त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात पद्मापूरचे जे वर्णन आहे, ते तंतोतंत या ठिकाणाशी मिळते जुळते आहे.

सारस पक्षीगोंदिया : सारस पक्ष्यांचा अधिवास असलेले गोंदिया हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आहे. दुर्मीळ असलेल्या सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी गोंदियात वन विभागाने कंबर कसली आहे. जनजागृतीसाठी खास महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सारसमुळेच गोंदियाच्या निसर्गसौंदर्याचे वेगळेपण सतत जाणवत असते. निसर्गाचे वरदान लाभलेल्या गोंदिया जिल्ह्यात वन्यजीवांचे वास्तव्य मोठ्या संख्येने असते. देश-विदेशातले पक्षीही गोंदियाची सफर करण्यासाठी दर वर्षी दाखल होत असतात; मात्र सारसचे वेगळेपण सर्वांमध्ये उठून दिसते. सारसचे वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी एकदाच आपला साथीदार निवडतो आणि आयुष्यभर त्याच्याच सहवासात राहतो. एकाचा मृत्यू झाल्यास दुसरा जोडीदारही अन्न-पाण्याचा त्याग करून मृत्यूला कवटाळतो. प्रेमाप्रति असलेली त्यांची ही निष्ठा आपल्यालाही काहीतरी शिकवून जाणारी आहे.

आसपासची ठिकाणे :
गोंदिया जिल्ह्यात मोजकी, परंतु अतिशय सुंदर पर्यटनस्थळे आहेत. हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचा पर्यटनासाठी उपयोग करण्यात आला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून निधी प्राप्त करून पर्यटनस्थळांचा विकास करण्याचा प्रयत्न या जिल्ह्यात करण्यात आला आहे.

इटियाडोह धरण : गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेस अर्जुनीमोरगाव तालुक्यात गोंदियापासून ९० किलोमीटरवर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस, तसेच रेल्वेगाड्या आहेत. येथील भव्य जलाशय पाहण्यासाठी दर वर्षी हजारो लोक येतात.

सिरपूर धरण : गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेस देवरी तालुक्यात गोंदियापासून ७५ किलोमीटरवर हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी बस आहेत. या धरणाच्या चारही बाजूंनी जंगल व टेकड्या आहेत.

पुजारीटोला धरण : गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेस आमगाव तालुक्यात गोंदियापासून ५० किलोमीटरवर हे स्थळ आहे. तेथे बसने जाता येते. या धरणाच्या सभोवतालीही जंगले व टेकड्या आहेत.

हाजिरा फॉल्स  : गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेला सालेकसा तालुक्यात गोंदियापासून ५५ किलोमीटरवर हे स्थळ आहे. तेथे बसने जाता येते. येथे टेकडीवरून पाणी खाली पडल्यामुळे धबधबा तयार होतो. त्याचे दृश्य निसर्गरम्य व मनमोहक आहे. हा धबधबा पाहण्यासाठी दर वर्षी सुमारे १० ते १५ हजार पर्यटक व विद्यार्थी येतात. सालेकसातील पर्यटनस्थळांमध्ये हलबीटोला येथील त्रिलोकेश्वरधाममधील वनराई बघता येते. ५१ फुटांचा त्रिशूल व भगवान शंकराची प्रचंड मूर्ती हे येथील खास आकर्षण होय.

कचारगडकचारगड : गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेला सालेकसा तालुक्यात गोंदियापासून ५५ किलोमीटरवर हे स्थळ आहे. तेथे बसने जाता येते. येथे आदिवासी गोंड समाजाचे कुलदैवत असून, चैत्र नवरात्रीला त्यांचा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणी दोन मोठ्या गुहा आहेत. कचारगड येथील उत्खननात कुऱ्हाड, छिन्नी, उखळ ही पाषाणशस्त्रे सापडलेली आहेत. त्याचप्रमाणे मातीची भांडीही मिळालेली आहेत.

कालीसरार धरण : सालेकसा तालुक्यात गोंदियापासून ५५ किलोमीटरवर हे स्थळ असून, तेथे बसने जाता येते. येथील धरण मोठ्या टेकड्यांनी वेढलेले आहे. त्यामुळे धरणाचे मनमोहक दृष्य दिसते. घनदाट जंगल पाहण्यासाठी दर वर्षी ३० ते ३५ हजार जण भेट देतात.

चूलबंध : गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला सडक अर्जुनी तालुक्यात गोंदियापासून २८ किलोमीटरवर हे स्थळ असून, तेथे बसने जाता येते. हे स्थान गोंदिया-कोहमारा या बसमार्गावर आहे. या ठिकाणी लघुपाटबंधारे विभागाचा मोठा जलाशय आहे. हा भाग वन विभागाच्या अखत्यारीत येतो.

हाजिरा फॉल्सइतर धार्मिक व पर्यटनस्थळे :
प्रतापगड, बोंडगाव, देवी, परसटोला, शशिकरण पहाडी, घुकेश्वरी माता मंदिर, चित्रकूट पलार टेकडी, शिवमंदिर कामठा, कोरणी, रजेगाव, शिवमंदिर नागरा, ताजुद्दिनबाबा मजार, दांडेगाव, पोंगेझरा, बोळूंदा, पोंगेझरा हिरडामाली, गडमाता, डाकराम, सुकडी, बोदलकसा
गोंदिया हा तसा मागास जिल्हा आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी असून, जिल्ह्यात भात सडण्याचे अनेक कारखाने (rice-mills) आहेत.

कसे जायचे?

विमानतळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर - १२० किलोमीटर. रेल्वे स्टेशन : भंडारा रोड - ३५ किलोमीटर, गोंदिया - ५० किलोमीटर, सौंदड - २० किलोमीटर, तिरोरा - २० किलोमीटर

रस्तेमार्ग : नागपूर ते नागझिरा १२२ किलोमीटर. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील साकोली गाव २२ किलोमीटर.
या भागात राहण्यासाठी तंबू, तसेच हॉटेल्सही आहेत. तसेच वन विभागाची विश्रामगृहेही आहेत. सुका मेवा, फराळाचे सुके पदार्थ, बॅटरी इत्यादी अत्यावश्यक साहित्य आपल्यासोबत अवश्य ठेवावे.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(लेखामधील सर्व फोटो नवेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या वेबसाइटवरून घेण्यात आले आहेत.)

नवेगाव बांध
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मो. र. अंजारीया About 360 Days ago
मा.विध्वंससाहेब, आपल्या पोस्ट खुपच अभ्यासपुर्ण असतात. मी आपल्या लिखाणाचा चाहता आहे. सध्याच्या ऊपक्रमातून घरबसल्या प्रयटनाची छान माहिती मिळते. धन्यवाद. - अंजारीया
1
0
Shreyas Joshi About 361 Days ago
सुंदर माहिती👌
1
0
M A kmt About 361 Days ago
माहिती वाचून खुप समाधान वाटला आपण माहिती द्वारे नागझिरा अभय करण्याची सफारीच घडवली
1
0
Purushottam Karmarkar About 362 Days ago
छान वर्णन व छायाचित्रं.
1
0
🌒 शेखर बेजकर About 362 Days ago
अप्रतिम वर्णन व फोटो वाचताना प्रत्येक ओळीला मीच जणू काही तिथे पर्यटन करत सर्व गोष्टी पाहात आहे अस सुंदर वर्णन केले आहे 👍👍👍
1
0
prasad p About 362 Days ago
छान
1
0
विजय पुजारी About 362 Days ago
खुप सुंदर लेख
1
0
वसंत परब About 362 Days ago
सुंदर माहिती
1
0
संजय कुलकर्णी About 362 Days ago
अप्रतिम माहिती प्रत्यक्ष पाहिल्याचीच आलीअनुभूती
1
0
Parashuram Babar About 362 Days ago
The information and photos are very beautiful
1
0
Suhas varale About 362 Days ago
Nice travel informatiom ...
1
0
Milind Lad About 362 Days ago
Wow. Khup Sundar article. Dandkaranya hay kute aahe prathamach mahit zale. Thodkyach shabdat vistrut mahitee. Thanks. Madhavji.
1
0
Satish dhande About 362 Days ago
Khupach sunder mahiti!
1
0
Anand G Mayekar About 362 Days ago
Nehamipramanech apratim Ani ashtapailu mahiti. He vachlya var kalte ki, Vidarbhat keval rakgrakhatach nahi tar ashi vanashri pan jivant ahe. Snehamaya Dhanyawad Anand Mayekar Thane West
1
0
Milind M.Pimputkar. About 362 Days ago
मस्त लेख
1
0
Milind pimputkar About 362 Days ago
Aprtim maahiti.
1
0
माधव रिसबुड About 362 Days ago
अप्रतिम माहिती आहे
1
0
Shilpa Soman About 362 Days ago
Detailed and precise description.
1
0

Select Language
Share Link