Next
एक, दोन, तीन, चार.... भारताच्या वैश्विकतेचा जयजयकार!
BOI
Monday, August 26, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:गुगलने मोठ्या हौसेने ज्या मिठायांची नावे अँड्रॉइडला दिली होती, त्यातील अनेक मिठायांची नावे अनेक देशांमध्ये कोणी ऐकलेली नव्हती, त्यांच्या उच्चारातही अडचणी होत्या. म्हणून यापुढे अँड्रॉइडच्या प्रत्येक आवृत्तीला केवळ अंक देण्यात येतील, असे गुगलने जाहीर केले आहे. त्यामुळे अँड्रॉइडच्या पुढील आवृत्यांची नावे अँड्रॉइड १०, अँड्रॉइड ११ अशी असतील. एकपासून सुरू होणारा अंकांचा क्रम ही भारतीयांनी जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे हा भारताच्या वैश्विकतेचा विजय आहे.
..............
साधारण चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई दिल्लीतील ‘श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स’मध्ये आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांनीही त्यांना अनेक रंजक प्रश्न विचारले. त्यातील एकाने विचारले, की अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमची नावे मिठायांवर आधारित असतात. मग तिला एखाद्या भारतीय मिठाईचे नाव का दिले जात नाही. उदाहरणार्थ, नानकटाई किंवा पेढा. ‘मी माझ्या आईला भेटेन तेव्हा या बाबतीत नक्कीच विचारीन,’ असे त्यावर पिचाई हसत म्हणाले होते. ‘अँड्रॉइडच्या पुढील आवृत्तीचे सादरीकरण करू तेव्हा ऑनलाइन मतदान घेऊ आणि सर्व भारतीयांनी मत दिल्यास आम्ही तसेच करू,’ असेही ते म्हणाले होते. 

यामागे एक रंजक कहाणी होती. जगभरातील स्मार्टफोनवर अधिराज्य गाजवणाऱ्या अँड्रॉइड या प्रणालीची मालकी गुगलकडे आहे. ही प्रणाली मुक्तस्रोत आहे. याचा अर्थ या प्रणालीचे मूळ कोड कोणीही प्राप्त करून तीत आपल्या गरजेप्रमाणे किंवा पसंतीप्रमाणे बदल करू शकतो. त्यामुळे जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांनी अँड्रॉइडला पसंती दिली आहे. आज फक्त मोबाइल फोनच नव्हे, तर टॅबलेट, कार, घड्याळ, टीव्ही आणि अन्य अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू या अँड्रॉइड प्रणालीवर चालतात. या प्रणालीवर आधारित असलेली २.५ अब्ज उपकरणे जगभरात असल्याचा एक अंदाज आहे. 

परंतु एकीकडे ही प्रणाली अशी जगव्यापी होत असतानाच लोकांमध्ये तिची स्वीकारार्हता वाढावी यासाठीही काळजी घेणे कंपनीला गरजेचे वाटू लागले आहे. या प्रणालीची प्रत्येक नवी आवृत्ती सादर करताना गेली सुमारे दशकभर गुगलने एक प्रथा पाळली होती आणि ती म्हणजे नव्या आवृत्तीला मिठाईचे नाव देण्याची रीत! इंग्रजीतील वर्णांच्या क्रमानुसार ही मिठायांची नावे देण्यात येत होती. यामध्ये कपकेक, डोनट, इक्लेअर, फ्रोयो, जिंजरब्रेड, हनीकॉम्ब, आईस्क्रीम सँडविच, जेली बीन, किटकॅट, लॉलीपाप, मार्शमॅलो, नूगट, ओरियो आणि पाय या मिठायांच्या नावांचा त्यात समावेश होता. या क्रमाने पुढचे नाव ‘क्यू’ या आद्याक्षरापासून सुरू होणे अपेक्षित होते. परंतु अँड्रॉइड प्रणालीची पुढील आवृत्ती ‘क्यू’ अक्षरापासूनच्या पदार्थाने ओळखली जाण्याऐवजी केवळ ‘अँड्रॉइड १०’ या नावाने ओळखली जाणार आहे स्वतः गुगल कंपनीने प्रसिद्ध केलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 

‘अशा प्रकारे मिठायांची नावे ठेवणे ही मजेदार गोष्ट होती; मात्र जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये लोकांना त्यांची नावे उच्चारायला अवघड जात असल्याचे आमच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे इंग्रजीतील ‘एल’ आणि ‘आर’ या अक्षरांचा उच्चार अनेक देशांमध्ये जवळपास सारखा होतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने अगदी योग्य उच्चार केला तरी ऐकणाऱ्याच्या डोक्यात गोंधळ उडतो,’ असे निरीक्षण कंपनीने नोंदवले आहे. इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे असे हिरीरीने सांगणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. असो. 

तर सांगण्याचा मुद्दा हा, की गुगलच्या ताज्या निर्णयाने भारतीयांच्या आशांवर पाणी फेरले आहे. अँड्रॉइडच्या एका तरी आवृत्तीला भारतीय मिठाईचे नाव मिळावे, ही भारतीयांची स्वाभाविक इच्छा होती. कारण अँड्रॉइड प्ले स्टोअरवरून अॅप डाउनलोड करण्यात भारत हा जगात पहिल्या क्रमांकाचा देश आहे. ॲप ॲनी कंपनीच्या ‘स्टेट ऑफ मोबाइल २०१९’ नावाच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत आयओएस आणि अँड्रॉइड उपकरणांत अॅप डाउनलोड करण्यात भारताने १६५ टक्के वाढ नोंदविली आहे. ब्राझील आणि अमेरिका हे देश भारताच्या खालोखाल आहेत. म्हणूनच ‘एन’ या अक्षराचा क्रम आला तेव्हा नानकटाई आणि नय्यापम या मिठायांची नावे अँड्रॉइडला दिली जातील, अशी चर्चा होती; पण तो मान भारतातील कोणत्याही मिठाईला मिळाला नाही. 

...मात्र ज्या निर्णयाने भारतीयांच्या मिठायांचा सन्मान हिरावून घेतला, त्याच निर्णयाने भारतीयांच्या एका वैश्विकतेचा विजयही साध्य केला. तो म्हणजे अंकांची पद्धत! मिठायांची नावे ओळखणे भलेही लोकांना अवघड जात असेल; मात्र अंकांच्या बाबत तसे नाही. गुगलने मोठ्या हौसेने ज्या मिठायांची नावे अँड्रॉइडला दिली होती, त्यातील अनेक मिठायांची नावे तर अनेक देशांमध्ये कोणी ऐकलेलीही नव्हती. म्हणून यापुढे अँड्रॉइडच्या प्रत्येक आवृत्तीला केवळ अंक देण्यात येतील, असे गुगलने जाहीर केले आहे. म्हणजे ‘अँड्रॉइड १०’नंतरची आवृत्ती ‘अँड्रॉइड ११’ असेल. 

अन् या अंकांतच भारतीयता दडली आहे. याचे उत्तम विवेचन आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्रप्रसाद यांनी त्यांच्या ‘संस्कृत और संस्कृति’ या पुस्तकात केले आहे. स्वातंत्र्यापूर्वी दिलेल्या त्यांच्या काही व्याख्यानांचे हे पुस्तक करण्यात आले आहे. त्यात ते म्हणतात, ‘पेशावर जिल्ह्यातील युसुफजई भागातील बख्शाली गावात केलेल्या खोदकामात चौथ्या शतकातील एक पोथी सापडली आहे. त्यात अंकलिपीचा वापर झालेला आहे. त्यापूर्वी ही पद्धत जगातील अन्य कुठेही कोणालाही ज्ञात नव्हती. त्यामुळे तिचा शोध लावण्याचे श्रेय भारतीयांनाच आहे. येथूनच ती अरबस्तानातून युरोपमध्ये गेली, हे जगमान्य आहे. त्यापूर्वी आशिया आणि युरोपमधील खाल्दी, हिब्रू, अरब इत्यादी वंश अक्षरांद्वारेच अंकांचे काम करत असत.’

आज आपण १,२,३,४ हा अंकांचा जो क्रम वापरतो, तो निर्विवादपणे भारतीयांनी लावलेला शोध आहे. राजेंद्रप्रसाद यांनीच ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’चा हवाला देऊन म्हटले आहे, ‘आपला सध्याचा अंकांचा क्रम हा भारतीय आहे. एका भारतीय राजदूताने इ. स. ७७३मध्ये बगदादला आणलेल्या खगोलशास्त्रीय सारण्यांसह या अंकांचा प्रवेश अरबस्थानात झाला. त्यानंतर नवव्या शतकात अबू जफर मुहम्मद अलखारिज्मी यांनी हा क्रम अरबीत आणला आणि तेव्हापासून अरबांमध्ये त्याचा प्रसार झाला. युरोपमध्ये शून्यासहित सर्व अंकांचा क्रम १२व्या शतकात अरबांकडून घेण्यात आला.’ 

बघा, म्हणजे एका देशातील पदार्थ दुसऱ्या देशांतील लोकांना अनोळखी वाटतो, त्याचा उच्चार करता येत नाही म्हणून एका जगड्व्याळ कंपनीला आपली पद्धत सोडावी लागली; मात्र त्याच कंपनीला भारताने दिलेल्या एका वैश्विक प्रणालीचा आधार घ्यावा लागला. जो कोणी एक, दोन, तीन, चार या मार्गावरून जाईल, तो भारतीय परंपरेचा पाईकच असेल. हा भारतीय वैश्विकतेचा विजय नसेल, तर अन्य कशाचा असेल?

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search