Next
संक्षिप्त भगवद्गीता (उत्तरार्ध)
BOI
Sunday, November 04, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली श्रीमद्भगवद्गीता म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी भगवद्गीतेच्या १८ अध्यायांचे सार लिहिले असून, त्याचा पूर्वार्ध आपण ‘किमया’ सदराच्या गेल्या भागात पाहिला. त्याचा उत्तरार्ध आजच्या भागात पाहू या...
...............
पूर्वार्धात नवव्या अध्यायापर्यंतचे काही श्लोक पाहिले होते. (या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) आज पुढे सुरुवात करू या. 

अध्याय दहावा : विभूतियोग

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम्‌॥ (४१)

ज्या ज्या गोष्टी ऐश्व र्ययुक्त आणि तेजस्वी असतील, त्या परमेश्वराच्या शक्तीच्या अंशापासून निश्चितपणे उत्पन्न झालेल्या असतात. (संपूर्ण विश्वश परमेश्वर आपल्या केवळ एका अंशाने व्यापून - धारण करून राहिला आहे - १०.४२). 

अध्याय अकरावा : विश्वरूपदर्शनयोग

या अध्यायात भगवंताने अर्जुनाला त्याच्या विनंतीवरून विश्वरूपदर्शन दिले. अनंत कोटी ब्रह्मांडे आणि त्यांतील सर्व वस्तुमात्र आणि भूतमात्र पाहिल्यावर अर्जुनाची बोबडी वळते. केवळ त्याच्या पुण्याईमुळे आणि श्रीकृष्णाच्या प्रेमामुळे हा दिव्ययोग येतो. ते विश्व रूप सहन न झाल्याने अर्जुन भगवंताला त्याचे मूळ स्वरूप धारण करण्याची विनंती करतो.

न वेदयज्ञाध्यायनैर्न दानै-
र्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रै:।
एवंरूप: शक्य अहं नृलोके
द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर॥ (४८)

वेदाध्ययन, यज्ञयाग, दानदिक पुण्यकर्मे किंवा घोर तपश्चर्या केली, तरी मनुष्यलोकांत कोणाला (अर्जुनासारखे) भगवंताचे विश्वरूपदर्शन होणे शक्य नाही. (यशोदेला बालकृष्णाच्या मुखात एकदा ते दर्शन झाले होते.)

परमेश्वराला तत्त्वत: जाणणे, पाहणे आणि त्यालाच जाऊन मिळणे, हे अनन्य भक्तीने मात्र शक्य आहे (११.५४). जो आपली सर्व कर्मे ईश्वरार्पण करतो, जो भगवंतमय बनतो, तो खरा ज्ञानोत्तर भक्त असतो. तो फलाची आसक्ती सोडून, सगळ्या प्राणिमात्रांशी वैरशून्य होऊन, अखेर परमात्म्याला जाऊन मिळतो. (११.५५)

अध्याय बारावा : भक्तियोग

गीतेमधील १२वा आणि १५वा अध्याय प्रत्येकी २० श्लोकांचे आहेत. गीता पाठ करताना हे दोन्ही आधी शिकवले जातात. दोन्हीही महत्त्वाचे आहेत. भक्तियोगातील श्लोक ११ ते २० तर पाठ असलेच पाहिजेत; शिवाय ते पक्के झाले पाहिजेत. येथे आपण फक्त ११ वा आणि २०वा श्लोक घेऊ, आणि सगळ्या १० श्लोकांचे सार पाहू.

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रित:।
सर्वकर्मफलत्यागं तत: कुरु यतात्मवान्‌॥ (११)

ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्द्धाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रिया:॥ (२०)

ईश्वरप्राप्तीसाठी कर्मयोग अशक्य असेल, तर भक्तियोगाचा (उपासना) आश्रय करून, मनोनिग्रहाद्वारे सर्व कर्मफलांचा (आसक्ती सोडून) त्याग करावा. अभ्यासाने प्राप्त होणारे फल म्हणजे ज्ञान. ज्ञानपूर्वक केलेले ध्यान त्यापेक्षा श्रेष्ठ आणि त्यापेक्षाही कर्मफलत्याग श्रेष्ठ आहे. अशा त्यागापासून लवकर मोक्षप्राप्ती (शांती) होते. सगळ्या प्राणिमात्रांविषयी वैररहित मैत्री असलेला, दयाशील, ममतारहिता, अहंकारशून्य, सुखदु:खांबद्दल समबुद्धी बाळगणारा, क्षमाशील, सदासंतुष्ट, कर्तव्यतत्पर, मनोनिग्रही, दृढनिश्चयी आणि मन-बुद्धी ईश्वरार्पण करणारा खरा भक्त असतो आणि तो देवाला प्रिय होतो. त्याच्यामुळे लोकांना त्रास होत नाही आणि तोही लोकांमुळे त्रासत नाही. तो हर्ष, क्रोध, भय आणि त्रास यांपासून मुक्त असतो. तसेच तो नि:स्पृह, पवित्र, कर्तव्यतत्पर, अनासक्त, निश्चिंत असतो. त्यामुळे फलांचा त्याग करणे त्याला सहज शक्य होते. तो द्वेष किंवा शोक करत नाही. कशाचीही इच्छा बाळगत नाही. शुभाशुभ सर्व कर्मफलांचा त्याग करतो (त्यांचा स्वत:वर परिणाम होऊ देत नाही). त्याला शत्रू किंवा मित्र, मान वा अपमान, निंदा-स्तुती, शीत-उष्ण हे सारखेच वाटतात. तो नेहमी शांत असतो. आसक्तीरहित, श्रद्धावान, ईश्वरपरायण, विचारी, संतोषी, स्वयंपूर्ण (दुसऱ्यावर अवलंबून न राहणारा) असा हा भक्त स्थितप्रज्ञ बनतो आणि देवाला प्रिय होतो.

अध्याय तेरावा : क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग

महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च।
इन्द्रियाणि दशैकं च पंच चेन्द्रिय गोचरा:॥ (५)
इच्छा द्वेष: सुखं दु:खं संघातश्चेतना धृति:।
एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृदत्‌॥ (६)

क्षेत्र म्हणजे शरीर (देह) आणि त्याला जाणणारा क्षेत्रज्ञ (आत्मा) होय. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही महाभूते; बुद्धी, अहंकार व अव्यक्त प्रकृतिमात्र; पाच कर्मेंद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये (अशी दहा इंद्रिये); इच्छा, द्वेष, सुख-दु:ख, देह आणि इंद्रिये यांचा संयोग (संघात), चेतना (जीवनशक्ती), धारणाशक्ती - हे सर्व (समुदाय) विकारांनी युक्त असे क्षेत्र होय.

इंद्रियार्येषु वैराग्यमनहंकार एव च।
जन्ममृत्युजराव्याधिदु:खदोषानुदर्शनम्‌॥ (८)

विषयोपभोगाविषयी वैराग्य (अनासक्ती), कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणे, जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि रोग हे सर्व दु:खास कारण असतात - या गोष्टी नेहमी ध्यानात ठेवल्या पाहिजेत.

अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थ दर्शनम्‌।
एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा॥ (११)

ज्ञानविज्ञानाची नेहमी चर्चा करावी, ब्रह्मतत्त्व नेहमी ध्यानात ठेवावे. त्यातून प्राप्त होते तेच आत्मज्ञान. त्याच्या विरुद्ध असलेले अज्ञान म्हणजे दंभ, आत्मश्लाघा, हिंसा, ईषणा हे दुर्गुण.

मोक्ष (आत्मज्ञान) कसा प्राप्त करावा, हे भगवंत श्लोक १२ ते १८ मध्ये सांगतात. ते मुळातूनच वाचावे.

कार्यकारण कर्तृत्वे हेतु: प्रकृतिरुच्यते।
पुरुष: सुखदु:खानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते॥

मूळ प्रकृतीपासून पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये, पाच विषय व मन मिळून १६ कार्ये; पाच महाभूते (शब्दस्पर्शदि) आणि अहंकार व बुद्धी मिळून सात कारणे आणि सर्वत्र दिसणारे त्यांचे कर्तृत्व, यांना कारण असते असे म्हणतात. पुरुष (प्रकृतीला अधिष्ठान असलेला आत्मा) सुख-दु:खाच्या भोगाला (अनुभवाला) कारण असतो.

उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वर:।
परमात्मेति चाप्युत्तो देहेऽस्मिन् पुरुष: पर:॥ (२२)

क्षेत्ररूपी देहामध्ये आत्मा श्रेष्ठ असून, तो अंतर्बाह्य व्यापार, प्रत्यक्ष पाहणारा, ते देहाकडून चालवणारा, त्याला कार्यक्षम ठेवणारा, सुखदु:खाचे सर्व अनुभव घेणारा श्रेष्ठ असा तो परमात्मा आहे.

क्षेत्र-क्षेत्रज्ञांचे यापुढील विवेचन या अध्यायात उरलेल्या नऊ श्लोकांमध्ये अवश्य वाचावे.

अध्याय चौदावा : गुणत्रयविभागयोग

तत्र सत्त्वं निर्मलत्वात्प्रकाशकमनामयम ।
सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ॥ (६)
रजो रागत्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम्‌।
तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनाम्‌॥ (७)
तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम्‌।
प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत॥ (८)
सत्त्वं सुखे संजयति रज: कर्मणि भारत।
ज्ञानामावृत्य तु तम: प्रमादे संजयत्युत॥ (९)

सत्त्व, रज, तम हे त्रिगुण प्रकृतीपासून उत्पन्न होतात आणि ते आत्म्याला देहाविषयी आसक्त करतात. (जीव आणि आत्मा एकरूप होतो).

सत्त्वगुण हा सर्वांत निर्मळ, निर्दोष आहे. सुख आणि ज्ञानाच्या इच्छेने तो आत्म्याला बांधतो (ब्रह्मज्ञानापर्यंत घेऊन जातो). रजोगुण म्हणजे उत्कट वासना आणि आसक्ती - त्याविषयीची प्रीती. तो जिवाला सकाम कर्मांच्या आसक्तीने बद्ध करतो. तमोगुण अज्ञानजन्म आहे. तो प्राण्यांमध्ये मोह उत्पन्न करतो. आळस, झोप व बेसावधपणा यांच्यायोगे तो प्राण्याला बद्ध करतो.

सत्त्वगुणापासून ज्ञान, रजोगुणातून लोभ आणि तमोगुणापासून भ्रम व अज्ञान उत्पन्न होते.

अध्याय पंधरावा : पुरुषोत्तम योग 

हा गीतेमधला अत्यंत लोकप्रिय, लहानपणीच पाठ केला जाणारा २० श्लोकांचा अध्याय आहे.

निर्मानमोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा:।
द्वंद्वैर्विमुक्ता सुखदु:खसंज्ञैर्गच्छत्य मूढा: पदमव्ययं तत्‌॥ (५)

मानापमानाची ज्यांना पर्वा नसते, मोह (काम) नाहीसा झालेला असतो, ज्यांनी आसक्ती आणि तद्नुषंगिक दोष जिंकलेले असतात, जे प्रकृती-परमात्मा यांचा नित्य विचार करतात (ज्ञानविज्ञानसंपन्न), ज्यांच्या त्रैगुणिक वासना नष्ट झालेल्या असतात, जे सुखदु:खादि द्वंद्वापासून मुक्त झालेले असतात, असे स्थितप्रज्ञ पुरुष त्या श्रेष्ठ ब्रह्मपदाला (परमात्म्याचे धाम) जाऊन पोहोचतात. (त्यानंतर ते पुन्हा परत येत नाहीत.)

श्रोत्रं चक्षु: स्पशनं च रसनं घ्राणमेव च।
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते॥ (९)

जीवात्मा हा कान, डोळे, स्पर्शेंद्रिये, जिव्हा आणि नाक या पंचेंद्रियांद्वारे आणि अंत:करणाच्या (मन, बुद्धी, चित्त, अहंकार) आश्रयाने विषयांचा उपभोग घेतो.

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित:।
प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम्‌॥ (१४)

परमात्मा अग्नी बनून आणि प्राणिदेहाचा आश्रय करून - प्राण, अपान इत्यादी वायूंनी युक्त होऊन खाद्य, पेय, लेह व चोष्य असे चतुर्विध अन्न पचवतो.

सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च।
वैदैश्चसर्वैरहमेव वेद्यो वेदान्त कृद्वेदविदेव चाहम्‌॥ (१५)

परमात्मा हा सर्वांच्या बुद्धीत प्रविष्ट असतो. त्याच्यामुळेच स्मृती (संस्कारजन्य ज्ञान) आणि सदसद्विवेकशक्ती बुद्धीत उत्पन्न होते. सर्व वेदांना वेद्य (जाणण्यायोग्य) परमात्माच आहे. ब्रह्मज्ञानाचे उगमस्थान आणि वेदांचे तत्त्व जाणणारा (देहातील) आत्माच आहे.

अध्याय सोळावा : दैवासुरसंपद्विभागयोग

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मन:।
काम: क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्‌त्रयं त्यजेत्‌॥ (२१)

काम, क्रोध, आणि लोभ हे तीन आत्मविघातक नरकांचे द्वार आहे. म्हणून ते दोष वर्ज्य करावेत. (त्यापासून मुक्त झालेला पुरुष, आत्मकल्याणाचा विचार/आचरण करत मुक्त होऊन जातो.)

अध्याय सतरावा : श्रद्धात्रयविभागयोग 

आहार, यज्ञ, उपासना, तप आणि दान हे प्रत्येकी तीन-तीन प्रकारचे असतात. (सात्विक, राजस, तामस)

ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध: स्मृत:।
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता: पुरा॥ (२३)

‘ओम् तत् सत्’ हा ब्रह्माचा तीन प्रकारे निर्देश (ब्रह्मवाचक शब्द किंवा मंत्र) होय. या मंत्रानेच (प्रथम) ईश्वराने ब्राह्मण, वेद व यज्ञ (उपासक, ज्ञानविज्ञान व उपासना) निर्माण केले आहेत.

अध्याय अठरावा : मोक्षसंन्यासयोग 

हा गीतेमधील सर्वांत मोठा, ७८ श्लोकांचा, अखेरचा अध्याय आहे. भगवंताकडून अत्यंत गूढ तत्त्वज्ञान ऐकल्यावर आणि विश्वरूपदर्शन झाल्यानंतर अर्जुनाचा अज्ञानजन्य मोह नष्ट होतो आणि तो युद्धास सज्ज होतो. तत्पूर्वी तो आपला सखा आणि साक्षात् परब्रह्म असलेल्या श्रीकृष्णाकडून सर्व ज्ञानाची पुनरावृत्ती करून घेतो. अखेरचा श्लोक सर्वांत महत्त्वाचा असून, त्याचा बोध झाल्यावर जाणावयाचे असे काहीच शिल्लक राहत नाही.

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम॥ (७८)

ज्याच्या बाजूला (पक्षात) सर्व योगांचा प्रभू भगवान श्रीकृष्ण आहे अणि ज्या पक्षाला पराक्रमी (धनुर्धारी) अर्जुन आहे, त्याच पक्षाला शाश्वबत स्वरूपाची लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य आणि न्याय प्राप्त होतात. हाच मोक्षसंन्यास योग होय.

अशा रीतीने एकूण ३८ श्लोकांमध्ये आपण संक्षिप्त स्वरूपात गीतेतील ज्ञान अभ्यासले. याशिवाय महत्त्वाचे असे इतर श्लोकही आहेत. भगवद्गीता ही नित्य वाचनात असावी. केवळ शाब्दिक (परोक्ष) ज्ञान उपयोगाचे नाही. ते आपल्यात मुरणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच गीतेचे श्रवण, मनन आणि निदिध्यासन सदैव चालू राहावे. सज्जनांची (अधिकारी लोकांची) संगती लाभली, की आपल्या सर्व शंका दूर होऊन अपरोक्ष (प्रत्यक्ष) ज्ञानाची प्राप्ती होते.

आपण सर्व जण या गीतामृताच्या वर्षावाने धन्य होऊ या!

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(श्रीमद्भगवद्गीता, तसेच संबंधित पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. ‘गीताबोध’हे गीतेबद्दलचे वेगळ्या प्रकारचे इंग्रजी पुस्तक लिहिणारे कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व उदय करंजकर यांची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 59 Days ago
Very few read it . Those who do , read it as a religious tract . It is supposed to give merit . Nobody understands the philosophy . Why make pretence that this is not so .
0
0

Select Language
Share Link
 
Search