Next
सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दहाव्या स्थानावर
सर्व संस्थांच्या यादीत विद्यापीठाला १७ वे स्थान
BOI
Tuesday, April 09, 2019 | 06:08 PM
15 0 0
Share this article:


पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा दहावे स्थान मिळवले आहे. सलग तिसऱ्या वर्षी विद्यापीठाने पहिल्या दहामध्ये स्थान कायम राखले आहे. गेल्या वर्षी या यादीत पुणे विद्यापीठ नवव्या स्थानावर होते. सर्व संस्थांच्या गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला १७वे स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी विद्यापीठ १६व्या स्थानावर होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संस्थांची नामांकने (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क-एनआयआरएफ) जाहीर केली.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे देशातील उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संस्थांची नामांकने (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क-एनआयआरएफ) सोमवारी, आठ एप्रिल २०१९ रोजी जाहीर करण्यात आली. नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नामांकने जाहीर केली. विद्यापीठे, सर्व संस्था, अभियांत्रिकी, महाविद्यालये, व्यवस्थापन, फार्मसी, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र व कायदा अशा नऊ गटांमध्ये ही नामांकने देण्यात आली आहेत. 


सर्व संस्थांच्या यादीत आयआयटी-मद्रास पहिल्या स्थानावर
सर्व संस्थाच्या यादीत पहिल्या दहा संस्थांमध्ये सात आयआयटींचा समावेश आहे. यात आयआयटी-मद्रास पहिल्या स्थानावर, तर आयआयटी-बेंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे. आयआयटी-दिल्ली तिसऱ्या, तर आयआयटी-मुंबई  चौथ्या स्थानावर आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सातव्या स्थानावर आहे. वाराणसी येथील हिंदू विद्यापीठ दहाव्या स्थानावर आहे.  पहिल्या शंभर संस्थांमध्ये महाराष्ट्रातील १२ संस्थांचा समावेश आहे. 

विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा ५८.४० गुण मिळवून दहावे स्थान पटकावले. गेल्या वर्षी ५८.२४ गुण मिळाले होते

विद्यापीठांच्या गटात डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने  यंदा गेल्या वर्षीच्या ५२ व्या स्थानावरून आघाडी घेत ४६वे स्थान पटकावले आहे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाची कामगिरी घसरली असून, यंदा विद्यापीठ गेल्या वर्षीच्या ४४व्या स्थानावरून ५६व्या स्थानी गेले आहे. भारती अभिमत विद्यापीठ यंदा ६६व्या स्थानावरून ६२व्या स्थानी आले आहे.

महाविद्यालयांच्या गटामध्ये पुण्यातील केवळ दोनच महाविद्यालये पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाली आहेत. यापैकी फर्ग्युसन कॉलेजची कामगिरी घसरली असून, गेल्या वर्षी १९व्या क्रमांकावर असलेले हे महाविद्यालय यंदा २७व्या स्थानी आहे. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ आयटी अँड बायोटेक्नॉलॉजीने ४२ वे स्थान पटकावले आहे. विधी महाविद्यालयांच्या गटात सिम्बायोसिस लॉ कॉलेजने यंदा सातवा क्रमांक पटकावला आहे. या गटात अन्य कोणत्याही महाविद्यालयाला स्थान मिळालेले नाही. वैद्यकीय महाविद्यालयांच्या गटात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ या एकमेव विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी १८व्या क्रमाकांवर असलेल्या या महाविद्यालयाला यंदा विसाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर विद्यापीठाचे यश सामूहिक - डॉ. करमळकर 

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठाने सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये स्थान मिळवणे ही आनंदाची बाब आहे. विद्यापीठाची पावले योग्य दिशेने पडत असल्याची ही पावती आहे. सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व अधिकार मंडळांच्या कार्याचे हे सामूहिक यश आहे,’ असे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले. 
 
 
  

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search