Next
वर्तमानातील शब्दांवर इतिहासाची बांधणी
BOI
Monday, December 31, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

इंग्रजी भाषेत वर्षाचा शब्द (वर्ड ऑफ दी इयर) नावाची एक सुंदर परंपरा आहे. एखाद्या विशिष्ट वर्षात सार्वजनिक क्षेत्रात चर्चेत असलेल्या शब्दाला हा मान दिला जातो. अशा वेगवेगळ्या वार्षिक शब्दांच्या यादीकडे एक नजर टाकली, तरी त्या-त्या वर्षीचा ढोबळ इतिहास नजरेसमोर उभा राहतो. आजचे वर्तमान म्हणजे उद्याचा इतिहास असतो. त्यामुळे एका-एका शब्दावर इतिहासाची उभारणी करण्याच्या या प्रयत्नांना दाद द्यावी तेवढी थोडी आहे.
.........
सेल्फी, पोस्ट-ट्रुथ, जस्टिस... निव्वळ पाहायला गेल्यास हे केवळ एक-एक शब्द आहेत; मात्र या शब्दांच्या मागे प्रत्येकाचा इतिहास आणि कहाणी आहे. ही कहाणी, हा इतिहास आपल्यासमोर उलगडतो तो या शब्दांना मिळालेल्या एका बहुमानावर नजर टाकली तर. 

इंग्रजी भाषेत वर्षाचा शब्द (वर्ड ऑफ दी इयर) नावाची एक सुंदर परंपरा आहे. तशी ही परंपरा फारशी जुनी नाही; मात्र बऱ्यापैकी रूढ झाली आहे. एखाद्या विशिष्ट वर्षात सार्वजनिक क्षेत्रात चर्चेत असलेल्या शब्दाला हा मान दिला जातो. दर वर्षी कॅलेंडर वर्षाच्या अखेरीस हा शब्द जाहीर करण्यात येतो. एखाद्या शब्दाला हा मान मिळण्यासाठी तो त्या १२ महिन्यांतच तयार झालेला असावा, असे नाही; मात्र त्या वर्षभरात त्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि त्याची जास्तीत जास्त चर्चा झालेली असावी, अशी अपेक्षा मात्र असते.

ज्याप्रमाणे देश-काल-परिस्थितीप्रमाणे इंग्रजी भाषेची वळणे वेगळी, त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणचा इंग्रजीचा शब्दकोश व इंग्रजीप्रेमी वेगळे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्याला हवा तो शब्द वर्षाचा शब्द म्हणून जाहीर करतात आणि त्यामागची कारणमीमांसाही जाहीर करतात. 

आता यंदाच्या नोमोफोबिया (Nomophobia) या शब्दाकडे पाहा. केम्ब्रिज डिक्शनरीच्या प्रकाशकांनी हा शब्द जाहीर केला आहे. हा शब्द फारसा वापरात येत नाही; मात्र त्याच्या अर्थाची चर्चा मात्र सातत्याने होते. नोमोफोबिया म्हणजे आपल्या मोबाइलवाचून राहण्याची किंवा तो वापरता न येण्याची भिती. या एका शब्दावर नजर टाकली, तरी आपले दैनंदिन जीवन किती तंत्रज्ञानाधारित झाले आहे, याची कल्पना येते. 

केम्ब्रिजची प्रतिस्पर्धी असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस (ओयूपी) कंपनीचे शब्दकोश आपल्याकडे सर्वाधिक लोकप्रिय आहेत. हा शब्दकोश इंग्रजीतील सर्वांत अधिकृत आणि कर्मठ असा मानला जातो. ही कंपनी वर्षाचे दोन शब्द प्रकाशित करते - ऑक्सफर्ड डिक्शनरी यूके वर्ड ऑफ दी इयर आणि ऑक्सफोर्ड डिक्शनरी यूएस वर्ड ऑफ दी इयर. हे दोन्ही शब्द कधीकधी एकच असतात. या ‘ओयूपी’ने २०१५ साली चक्क एका इमोजीची निवड वर्षाचा शब्द म्हणून केली होती. ‘आनंदाश्रू आलेला चेहरा’ असे त्या इमोजीचे वर्णन करण्यात आले होते. भाषिक संवादामध्ये वाढणाऱ्या चित्रात्मक संकेतांची ताकदच त्या कृतीतून दिसून आली होती. यंदाचा म्हणजे २०१८चा शब्द आहे Toxic म्हणजे ‘विषारी.’ ‘ऑक्सफर्ड’ने म्हटले आहे, की हा शब्द या वर्षात राजकीय, पर्यावरण किंवा स्त्रीवादाच्या चळवळींच्या संबंधात अनेकदा वापरण्यात आला. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियन नॅशनल डिक्शनरी सेंटर २००६पासून वर्षाचा शब्द जाहीर करत आहे. यासाठी विशेष संपादकीय कर्मचारी निवडण्यात येतात आणि दर वर्षी डिसेंबरमध्ये हा शब्द जाहीर केला जातो. ऑस्ट्रेलियातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात जास्तीत जास्त वापरल्या जाणाऱ्या शब्दांची निवड यासाठी करण्यात येते; मात्र हा शब्द ऑस्ट्रेलियाचाच असेल असे नाही. यंदा ‘कॅनबेरा बबल’ या शब्दाला हा मान मिळाला आहे.

यात ‘दी अमेरिकन डायलेक्ट सोसायटी’ची वर्ड ऑफ दी इयर जाहीर करण्याची परंपरा आगळीच होय. खरे तर इंग्रजीतील वर्षाचा शब्द जाहीर करण्याची परंपरा या संस्थेने सुरू केली. त्याला सुरुवात झाली १९९१पासून. शिवाय वर्ष संपल्यानंतर म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंतच्या शब्दांचा व्यवहार लक्षात घेऊन हा शब्द जाहीर करण्यात येतो. तटस्थ भाषाशास्त्रज्ञांचा एक चमू या शब्दाची निवड करतात आणि कुठल्याही व्यावसायिक गोष्टीशी त्याचा संबंध नसतो.

अमेरिकेची स्वतःची असलेली मेरिअम-वेबस्टर डिक्शनरी याही बाबतीत आपले वेगळेपण राखून आहे. मेरिअम-वेबस्टर शब्दकोशाच्या वतीने दर वर्षी एका शब्दाऐवजी दहा-शब्दांची यादी जाहीर करण्यात येते. ही यादी जाहीर करण्याची पद्धत २००३मध्ये सुरू झाली. आधी मेरिअम-वेबस्टरच्या संकेतस्थळावरील हिट्सचे विश्लेषण करून आणि लोकप्रिय शोधांचे विश्लेषण करून ही यादी निश्चित करण्यात येत असे; मात्र २००६पासून ही यादी ऑनलाइन मतदान आणि वापरकर्त्यांच्या सूचनांनुसार तयार करण्यात येते. यंदा जस्टिस (न्याय) हा शब्द या शब्दकोशाने सर्वांत लोकप्रिय म्हणून निवडला आहे.
दी ग्लोबल लँग्वेज मॉनिटर (जीएलएम) ही अमेरिकेतील कंपनी असून, २००० सालापासून ती सर्वोत्कृष्ट शब्द निवडत आहे. किंबहुना तिची प्रमुख ओळखच ती आहे. इंग्रजी भाषेत २००० सालापासून सर्वाधिक वापरण्यात आलेले शब्द, वाक्प्रचार आणि नामांची संख्या ही कंपनी देते. ही शब्द व वाक्ये निवडण्यासाठी जागतिक पातळीवरील मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, इंटरनेट आणि ब्लॉग जगत, तसेच सोशल मीडियामधील भाषेच्या वापराचे विश्लेषण करण्यात येते; मात्र त्यांची गणिती पद्धत चुकीची आहे, असे भाषाशास्त्रज्ञ आणि कोशकारांचे म्हणणे आहे.

याशिवाय स्कॉटलंडमधील कॉलिन्स इंग्लिश डिक्शनरी २०१३पासून प्रत्येक वर्षी वर्षाचा शब्द जाहीर करते. यंदा ‘सिंगल यूज’ या शब्दाला हा मान मिळाला आहे. इंग्रजीची ही परंपरा खरे तर सुरू झाली ती जर्मनीतून. तेथे ‘वोर्ट डेस याहरेज’ या नावाने ही परंपरा १९७१पासून सुरू आहे. तिथे तर या प्रयत्नांना थेट सरकारचेच पाठबळ मिळालेले आहे. गेझेलशाफ्ट फ्यूर डॉईट्शे स्प्राखे (Gesellschaft für deutsche Sprache - जर्मन भाषेसाठी संस्था) या नावाची ही संस्था १९७१पासून हा शब्द जाहीर करते. आधी ही निवड लोकप्रियतेवर किंवा वापरावर अवलंबून होती; मात्र १९७७पासून जर्मन समाजातील भाषिक, आर्थिक आणि सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या एका शब्दाला हा बहुमान देण्यात येतो. यंदा हाइत्साइट (उष्ण वेळ) हा वर्षाचा शब्द म्हणून निवडण्यात आला आहे. यंदा एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे या शब्दाची निवड झाली आहे. 

खरे तर अशा वेगवेगळ्या वार्षिक शब्दांच्या यादीकडे एक नजर टाकली, तरी त्या-त्या वर्षीचा ढोबळ इतिहास नजरेसमोर उभा राहतो. आपल्याकडेही अशी परंपरा निर्माण व्हायला हवी. त्या दृष्टीने प्रयत्न झालाही होता. ‘ओयूपी’ने भारतीय शब्दांसाठीही गेल्या वर्षीपासून ही परंपरा सुरू केली आहे. ‘आधार’ या शब्दाला ऑक्स्फर्ड डिक्शनरीने हिंदी वर्ड ऑफ दी इयर (२०१७) ठरविले होते. गेल्या वर्षी अनेक हिंदी शब्द चर्चेत होते आणि त्यांचाही विचार करण्यात आला होता. हा मान मिळवण्यासाठीच्या स्पर्धेत ‘मित्रों’, ‘नोटबंदी’ आणि ‘गोरक्षक’ यांसारखे शब्द होते; मात्र त्यात ‘आधार’ने बाजी मारली. केंद्र सरकारने आणलेल्या आधार कार्डमुळे हा शब्द सर्वतोमुखी झाला. त्यावरून व्यापक चर्चेला तोंड फुटले आहे. एवढेच नव्हे, तर आधार कार्डचा विषय सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला होता. त्यामुळे त्या शब्दाने तेव्हा बाजी मारली होती. यंदाचा शब्द अजून जाहीर व्हायचा आहे. 

... मात्र अन्य संस्थांनीही असे प्रयत्न करायला हवेत. आपल्याला शब्दांची गरज आहे आणि इतिहासाचीही. आजचे वर्तमान म्हणजे उद्याचा इतिहास असतो. त्यामुळे एका-एका शब्दावर इतिहासाची उभारणी करण्याच्या या प्रयत्नांना दाद द्यावी तेवढी थोडी आहे.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link