Next
साहित्य अन् कलांच्या अधिष्ठात्री
सुरेखा जोशी
Friday, March 09, 2018 | 12:30 PM
15 0 0
Share this story

कला हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. कला, साहित्याच्या क्षेत्रातही भारतीय महिलांनी मोठी मजल मारली आहे. पारंपरिक ते आधुनिक, पाश्चात्य अशा सर्व कलाप्रकारांमध्ये त्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. इतरांना त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं आहे. ‘पहिलं पाऊल टाकणाऱ्या तेजस्विनी’ या लेखमालेच्या तिसऱ्या भागात घेऊ या भारतीय स्त्रियांसाठी कला आणि साहित्य क्षेत्रातल्या वाटा प्रशस्त करणाऱ्या महिलांची माहिती...
..........
डोगरी भाषेतील कवयित्री पद्मा सचदेव :
जम्मूतील संस्कृत पंडितांच्या घराण्यातील पद्मा सचदेव यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी साहित्यिक प्रवासाला सुरुवात केली. राजे दियाँ मंडियाँ या डोगरी भाषेतील त्यांच्या पहिल्याच कवितेनं त्यांना कवयित्री म्हणून ओळख मिळवून दिली. १९७१मध्ये जेव्हा त्यांना साहित्य अकामीचा पुरस्कार मिळाला, तेव्हा हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या सर्वांत कमी वयाच्या साहित्यिक होत्या. त्यांच्या साहित्यासाठी त्यांना अनेक जागतिक सन्मानदेखील मिळाले आहेत. 

नृत्यांगना के. हेमलता :
शंभराहून अधिक तास सलग नृत्य करण्याचा जागतिक विक्रम करणाऱ्या कलामंडलम हेमलता या शास्त्रीय नृत्य कलाकार आहेत. त्यांनी आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत देशभरात आणि परदेशातसुद्धा भरतनाट्यम्, कुचिपुडी आणि मोहिनीअट्टम नृत्याचे अनेक कार्यक्रम करून भारतीय शास्त्रीय नृत्याला जगभर ओळख मिळवून दिली. 

संतूरवादक डॉ. वर्षा अग्रवाल :
संतूरवादनात जागतिक ओळख मिळवलेल्या पहिल्या भारतीय महिला वादक डॉ. वर्षा अग्रवाल या ललित महंत आणि पंडित भजन सोपोरी यांच्या शिष्या आहेत. त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरही आपल्या संगीत रचना सादर केल्या आहेत. सांस्कृतिक मंत्रालय आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या त्या मानद सदस्या आहेत.

पार्श्वगायिका के. एस. चित्रा :
पार्श्वगायिका चित्रा या ब्रिटfश संसदेच्या ‘हाउस ऑफ कॉमन्स’कडून सन्मान केल्या गेलेल्या पहिल्या भारतीय गायिका आहेत. १९८४मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केलेल्या चित्रा यांनी आजतागायत सुमारे १८ हजार गाणी गायली आहेत. गायनासाठीचे सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि जवळपास ३५ इतर राज्य पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. त्यांच्या स्नेहनंदन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सुमारे २५ वादक कलाकारांना दर महिन्याला चार हजार रुपये दिले जातात. 

ग्राफिटी आर्टिस्ट काजल सिंग :
२०११मध्ये नवी दिल्लीत जर्मन दूतावासानं आयोजित केलेल्या ग्राफिटी कार्यक्रमात काजलनं पहिल्यांदा सादरीकरण केलं. त्यानंतर तिला मुंबईतील जर्मनीच्या राष्ट्रीय दिन समारंभात भारताच्या युवा वर्गाचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली. अमेरिकेतील ट्रिनिटी कॉलेज, जर्मनीतील क्रिएटिव्ह वर्ल्ड फेयर, रशिया आणि चीनमधील स्ट्रीट आर्ट फेस्टिव्हल या ठिकाणी तिनं आपली कला सादर करून नावलौकिक मिळवला आहे. भारतातील गरीब विद्यार्थ्यांसाठी कला शिक्षण कार्यक्रम सुरू करण्याची तिची इच्छा आहे. 

चित्रकार तारा आनंद :
मुंबईची चित्रकार तारा आनंद हिच्या कामावर साहित्य आणि इतिहासाचा प्रभाव आहे. विस्मृतीत गेलेल्या राजघराण्यातील युद्धकुशल स्त्रियांवर आधारलेली ‘आय अॅम नो मॅन’ या चित्रमालेची निर्मिती तिनं केली आहे. हे काम करणारी ती पहिलीच युवा भारतीय कलाकार आहे. तिची ही चित्रमाला दी हफिंग्टन पोस्ट, डीएनए, डेक्कन क्रॉनिकल आणि बीबीसी लंडन एशिया नेटवर्क यासारख्या मातब्बर प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केली आहे. 

झुंबा क्वीन सुचेता पाल :
‘भारताची झुंबा क्वीन’ अशी ओळख मिळवलेल्या सुचेता पाल हिनं झुंबाची पहिली जागतिक शुभेच्छादूत होण्याचा मान मिळवला आहे. भारतात झुंबा हा नृत्यप्रकार सुरू करून, त्याला लोकप्रियता मिळवून देण्याचं काम तिनं केलं. अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊनही वेगळ्याच क्षेत्रात कारकीर्द घडवताना, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ध्येयानं वाटचाल करणारी सुचेता आज अनेक भारतीयांची प्रेरणा बनली आहे. 

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन :
ऐश्वर्या राय-बच्चन ही कान्स चित्रपट महोत्सवाच्या परीक्षक मंडळाचं सदस्यत्व मिळालेली पहिली भारतीय अभिनेत्री आहे. डेव्हिड लेटरमन, ओप्रा विन्फ्रे, टायरा बँक्स यांच्या जगप्रसिद्ध शोमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय नागरिक होण्याचा मानदेखील ऐश्वर्याकडेच जातो. ऐश्वर्या सियाचीनमध्ये जाणारी पहिली स्त्री आहे. विविध सामाजिक संस्थांसोबतही ती काम करते.

बॅगपाइपवादक आर्ची :
बॅगपाइप हे परदेशी वाद्य वाजवणारी पहिली भारतीय स्त्री म्हणजे आर्ची जे. ज्या वेळी या वाद्याबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती होती, तेव्हा आर्चीने या वाद्यावर प्रभुत्व मिळवायला सुरुवात केली होती. तिनं जेव्हा शिकायला सुरुवात केली, तेव्हा या वाद्याचं प्रशिक्षण ऑनलाइन उपलब्ध नव्हतं. मग ती ई-बुक्स डाउनलोड करून शिकायला लागली. २०१२मध्ये बॅगपाइप वाजवायला शिकायचा ध्यास घेतलेली आर्ची, ही त्या क्षेत्रातली एकलव्यच आहे. दी गेम ऑफ थ्रोन्स, दी वॉकिंग डेड या चित्रपटांच्या संकल्पना गीतासाठी बॅगपाइप वादन करणाऱ्या आर्चीनं ‘दी स्नेक चार्मर’ हे स्वतःचं यू-ट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. (ते यू-ट्यूब चॅनेल पाहण्यासाठी https://www.youtube.com/user/archyJ03 येथे क्लिक करा.)

दिग्दर्शिका वेणिका मित्रा :
वेणिका मित्रा यांनी मास मीडिया आणि मास कम्युनिकेशनची पदवी घेतली आहे. चित्रपट क्षेत्रात काम करायचं, हीच त्यांची पहिल्यापासूनची इच्छा होती. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच लघुपटाची २३ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत निवड झाली होती. त्यातील दहा महोत्सवांमध्ये हा लघुपट दाखवला गेला. कान्समधील लघुपट महोत्सवात त्यांच्या लघुपटाला दोन पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय लघुपट दिग्दर्शक आहेत.

‘ग्रॅमीविजेती’ तन्वी शहा :
जागतिक संगीत क्षेत्रातला प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘ग्रॅमी पुरस्कार’ मिळवणारी पहिली भारतीय कलाकार आहे तन्वी शहा. २०१०मध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्यासाठी ए. आर. रेहमान आणि गुलजार यांच्यासोबत तन्वीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘वर्ल्ड साउंडट्रॅक अॅवॉर्ड’ आणि ‘बीएमआय अॅवॉर्ड’ हे पुरस्कारही तिला मिळाले आहेत. वैविध्यपूर्ण गायनशैली आत्मसात केलेल्या तन्वीनं तमिळ, हिंदी, तेलगू, स्पॅनिश, अरेबिक, पोर्तुगीज आणि इतर लॅटिन भाषांमधली गाणी गायली आहेत.

तबलावादक अनुराधा पाल :
भारतातल्या पहिल्या व्यावसायिक तबलावादक अनुराधा पाल यांनी जागतिक संगीत, कला आणि नृत्य महोत्सवात कला सादर करण्याचा मान मिळवला आहे. सर्वांत कमी वयात हा सन्मान प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय कलाकार आहेत. या महोत्सवात त्यांनी आपल्या तबलावादनानं लाखो रसिकांना मंत्रमुग्ध केलं. 

सिनेमॅटोग्राफर अंजुली शुक्ला :
चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी एकमेव भारतीय महिला म्हणजे अंजुली शुक्ला. ‘कुट्टीस्रंक’ या आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनी हा पुरस्कार मिळवला. मल्याळम् भाषेतील या चित्रपटासाठी पहिल्यांदाच सिनेमॅटोग्राफी करणाऱ्या अंजुली यांनी पुण्यातील ‘एफटीआयआय’ संस्थेतून सिनेमॅटोग्राफीचं प्रशिक्षण घेतलं आहे. 

पहिल्या अभिनेत्री दुर्गाबाई कामत :
१९१३मध्ये तत्कालीन परंपरांना छेद देत, चित्रपटासाठी अभिनय करणाऱ्या दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री. दादासाहेब फाळके यांच्या ‘मोहिनी भस्मासुर’ या चित्रपटात त्यांनी पार्वतीची, म्हणजे चित्रपटाच्या नायिकेची भूमिका साकारली. त्यांनी साकारलेल्या भूमिकेची लोकांनी प्रशंसा केली आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रवेशाचा मार्ग स्त्रियांसाठी मोकळा झाला.


पहिल्या तबलावादक डॉ. अबन मिस्त्री :
तबलावादनात प्रावीण्य मिळवणारी पहिली भारतीय स्त्री म्हणजे डॉ. अबन मिस्त्री. त्यांनी भारतात, तसंच परदेशात केलेल्या तबलावादनाला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. तबलावादनाबरोबरच त्यांनी सतारवादन, गायन आणि हिंदी, संस्कृत या भाषांवर प्रभुत्व मिळवलं. विविध विद्यापीठांमधून परीक्षक, मार्गदर्शक आणि व्याख्यात्या म्हणूनही त्यांनी काम केलं. 


व्हेंट्रिलॉक्विस्ट इंदुश्री रवींद्र :
इंदुश्री रवींद्र या बोलक्या बाहुल्यांना आवाज देणाऱ्या पहिल्या महिला कलाकार (व्हेंट्रिलॉक्विस्ट) आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’नं पाच वेळा घेतली आहे. जगभरातल्या व्हेंट्रिलॉक्विस्ट्सनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. आपल्या कार्यक्रमांमधून त्या एड्ससारख्या सामाजिक समस्यांबाबत जनजागृती करण्याचं काम करतात. 

शिल्पकार अनिला जेकब :
शिल्पकार अनिला जेकब यांना १९६५मध्ये शिल्पकलेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवलेल्या त्या भारतातल्या पहिल्या स्त्री शिल्पकार आहेत. त्यांच्या कलाकृतींना देशातील विविध कलादालनांमध्ये, पलक्कड किल्ला, कालिकत किनारा, कोचीन किल्ला याबरोबरच कोचीनच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या स्वागत कक्षामध्येही स्थान मिळालं आहे.

दस्तंगोई कलाकार फौजिया दस्तांगो :
‘दस्तंगोई’ ही १६व्या शतकातली कथाकथन कला आहे. ही कला सादर करणाऱ्या फौजिया दस्तांगो या पहिल्या महिला कलाकार आहेत. त्यांनी भारतात आणि संयुक्त अरब अमिरातीत दस्तंगोईचे शंभराहून अधिक कार्यक्रम सादर केले आहेत. भारतातल्या प्रतिष्ठित कला महोत्सवांमध्येही त्यांनी हा प्राचीन कलाप्रकार सादर केला आहे. आपल्या कार्यक्रमांमधून स्त्रीकेंद्रित मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 

‘जागर’ करणाऱ्या बसंती बिश्त:
‘जागर’ हा गायनाचा पारंपरिक कलाप्रकार सादर करणाऱ्या पहिल्या महिला आहेत बसंती बिश्त. प्रथम दर्जाच्या लोककलाकार म्हणून त्यांना आकाशवाणीनं मान्यता दिली आहे. सरकारच्या सांस्कृतिक कार्यालयाच्या कार्यक्रम सल्लागार समितीत सदस्या म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मौखिक परंपरेतून चालत आलेल्या आणि नष्ट होत चाललेल्या जवळपास पाचशे अलिखित लोकगीतांचं त्यांनी पुनरुज्जीवन केलं आहे.

(महिला दिनाबद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील सर्व विशेष लेख https://goo.gl/zuvB57 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत. या महिलांबद्दलचा सोबतचा व्हिडिओ जरूर पाहा.) 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link