Next
सवाई, बहुरंगी मेजवानी..
BOI
Monday, December 18, 2017 | 12:29 PM
15 0 0
Share this article:

संगीतातील प्रत्येक रागाचं आपलं असं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. त्याचा मूड असतो, त्यानुसार त्या रागाची रचना व सादरीकरण केलं जातं. हीच संकल्पना लक्षात घेऊन, या रागांनुसार निर्मिती करण्यात आलेल्या अत्तरांचा एक स्टॉल यंदाच्या 'सवाई गंधर्व' महोत्सवातील बहुरंगी मेजवानीत होता... या महोत्सवात संगीताबरोबरच रसिकांना घेता आलेल्या अन्य   रसास्वादाबद्दल....
................  

सवाई गंधर्व महोत्सव म्हणजे रसिकांसाठी जशी सुरेल स्वरांची पर्वणी असते, तशीच इतरही अनेक रसास्वाद अनुभवण्याचीही ही एक जागा आहे. याची पुन्हा एकदा प्रचीती येण्याचं कारण म्हणजे मंडपाच्या पलीकडच्या बाजूस असलेली खाऊगल्ली. दरवर्षीप्रमाणे यंदाही या खाऊगल्लीत खवय्यांची गर्दी होती. त्यातही यंदा खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सबरोबर आणखी भर पडली ती रागानुसार अत्तराच्या स्टॉलची... शिवाय छापील आणि ऑडिओ पुस्तकांचेही स्टॉल्स यंदा रसिकांच्या सेवेत हजर होते. 

सवाईचा हा मंडप कला आणि तिच्या निरनिराळ्या आस्वादकांनी अक्षरशः ओसंडून वाहत असतो. इथल्या खवय्येगिरीची लज्जत वर्षानुवर्षे वाढतच चाललेली दिसते. दडपे पोहे, साबुदाणा वडा, पोहे, थालीपीठ, सँडवीचेस, इडली-डोसा, वडापाव, मिसळ या दरवर्षीच्या लोकप्रिय पदार्थांसोबत यंदा चायनिजचीही भर पडलेली पाहायला मिळाली. चायनिजच्या या स्टॉलवर सूप, राईसपासून ते नूडल्सपर्यंत सर्व उपलब्ध होते. शिवाय विशेष अशा हुरड्याच्या स्टॉललाही उत्तम प्रतिसाद मिळाला. हुरड्याच्या दोन-तीन प्रकारच्या डिश इथे चाखायला मिळाल्या. हे सर्व कमी म्हणून की काय, स्विट्समध्ये पुणेकरांच्या आवडीचे उकडीचे मोदक आणि खव्याची पोळीसुद्धा खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यास सज्ज होते. 

संगीतातील रागांनुसार तयार करण्यात आलेल्या अत्तरांचा स्टॉलयंदाचे आणखी एक आकर्षण म्हणजे Rusit - Ragas Collection नावाचा अत्तराचा स्टॉल. संगीतातील प्रत्येक रागाचं आपलं असं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. त्याचा मूड असतो, त्यानुसार त्या रागाची रचना व सादरीकरण केलं जातं. हीच संकल्पना लक्षात घेऊन, आनंद जोग व मंदार लेले या द्वयीने रागानुसार अत्तरांची निर्मिती केली आहे. १०० रुपयांपासून ते २०० रुपयांच्या रेंजमध्ये ही अत्तरे याठिकाणी उपलब्ध होती. यामध्ये जवळपास १५ - २० प्रकारची अत्तरे याठिकाणी पाहायला मिळाली. मागील काही वर्षे हा स्टॉल नव्हता, तरी त्यापूर्वी मात्र असायचा असे स्टॉलधारकांनी सांगितले. शिवाय अत्तर विकण्यासोबतच ते लावण्याविषयीही मार्गदर्शन करताना ते दिसत होते. तिकडे खवय्यांप्रमाणेच इकडे सुगंधाच्या अस्वादकांची गर्दी होताना दिसत होती. 

ऑडिओ बुक्स स्टॉलअत्तर आणि खवय्येगिरीप्रमाणेच विचारांना खाद्य पुरविणाऱ्या पुस्तकांच्या स्टॉलवरही रसिकांची गर्दी दिसली. यामध्ये गेल्या काही वर्षांत नव्याने सुरू झालेल्या ऑडिओ बुक्सचेही स्टॉल होते. छापील पुस्तकांइतकाच प्रतिसाद ऑडिओ बुक्सनाही असल्याचे रश्मी नायगावकर यांनी सांगितले. 'ही संकल्पना आता लोकांमध्ये रुजली आहे. तसेच संगीतेतर विषयांना जास्त मागणी आहे.  आणि ऑडिओ बुक्सचा आणखी एक फायदा म्हणजे अवघड विषय वाचण्यापेक्षा ऐकणं सोप्प जातं. शिवाय उत्तम भाषा कानावर पडली की ती शिकणं सोपं जातं’, असंही त्या म्हणाल्या. 

याशिवाय पुणे व परिसरातील कातकरी, आदिवासी मुलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेने लावलेल्या स्टॉलवर आकर्षक हँडमेड कलाकुसरीच्या वस्तू विकायला उपलब्ध होत्या. कातकरी मुलांनी हाताने बनविलेल्या किचैन, चित्रे व इतर अनेक वस्तू इथे होत्या. थोडक्यात सांगायचे तर यंदाचा 'सवाई गंधर्व' महोत्सव हा अवघ्या  पंचज्ञानेंद्रियांची भूक भागविणारा होता.  

- आकाश गुळाणकर
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search