Next
‘परिक्रमा’ नृत्य महोत्सव ६ ते ९ डिसेंबरदरम्यान
शास्त्रीय नृत्यकलेचा पुण्यातील सर्वांत मोठा महोत्सव
BOI
Thursday, November 29, 2018 | 06:32 PM
15 0 0
Share this article:

डॉ. सुचेता भिडे चापेकरपुणे : ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या कलाकारांचा कलाविष्कार आणि नृत्यसादरीकरण अनुभवण्याची संधी देणाऱ्या ‘परिक्रमा’ या नृत्य महोत्सवाचे आयोजन गुरुवार, सहा डिसेंबर ते रविवार, नऊ डिसेंबर २०१८ दरम्यान करण्यात येणार आहे. रेणुका स्वरूप प्रशालेच्या पटांगणावर हा चार दिवसीय महोत्सव होणार आहे’,अशी माहिती ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या सचिव अरुंधती पटवर्धन यांनी दिली. 

‘परिक्रमा नृत्य महोत्सवाचे यंदाचे हे दहावे वर्ष असून, भरतनाट्यम् गुरु डॉ. सुचेता भिडे चापेकर या आपल्या ७० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत, त्या निमित्ताने त्यांचे अभिष्टचिंतन हादेखील या वर्षीच्या महोत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे. भारतीय शास्त्रीय नृत्याचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. ‘परिक्रमा’ नृत्य महोत्सव हा त्याचाच एक भाग असून, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि बजाज ट्रस्ट यांच्या सहकार्याने दहाव्या वर्षानिमित्त या वर्षीचा महोत्सव हा सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे’, असेही पटवर्धन यांनी सांगितले. 

त्या पुढे म्हणाल्या, ‘दहाव्या वर्षानिमित्त या वर्षी महोत्सवात चार दिवसांच्या भरगच्च अशा कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महोत्सवाची सुरुवात गुरुवारी, सहा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता रेणुका स्वरूप प्रशालेच्या पटांगणावर होईल. या वेळी ७० व्या वर्षात पदापर्णानिमित्त भरतनाट्यम् गुरु सुचेता भिडे चापेकर यांचे अभिष्टचिंतन होईल. या वेळी कलावर्धिनी परिवाराच्या ३५ शाखांमधील विद्यार्थीनी आपल्या गुरु डॉ. सुचेता चापेकर यांना दिव्यांनी ओवाळतील. त्यानंतर चापेकर यांचा ज्येष्ठ संगीतकार पं. हदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते सत्कार होईल. यानंतर सुचेता भिडे चापेकर लिखित ‘नृत्यात्मिका’ या त्यांच्या आयुष्य आणि त्यांची नृत्यक्षेत्रातील वाटचाल उलगडून दाखविणाऱ्या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन करण्यात येईल. हा इंग्रजी अनुवाद हा प्रीती पाटील यांनी केला असून, ‘नृत्यात्मिका’ या मराठी पुस्तकाच्या आजपर्यंत तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. यानंतर डॉ. सुचेताताईंवरील ‘व्योमगामि’ या लघुपटातील काही भाग दाखविण्यात येईल. अमृता महाडीक यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले असून, यामध्ये सुचेताताईंचा नृत्य आणि जीवनप्रवास मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर स्वत: सुचेताताई त्यांचा ‘नृत्यगंगा’ हा भरतनाट्यम् नृत्याविष्कार सादर करतील.’ 

‘महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, ७ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून ‘अभिव्यक्ती’ अंतर्गत प्रत्येक नृत्यप्रकारातील दिग्गज कलाकारांचे नृत्यसादरीकरण होईल. यामध्ये गुरु सी. व्ही. चंद्रशेखर यांचे भरतनाट्यम्, दर्शना झवेरी यांचे मणिपुरी, डॉ. कनक रेळे यांचे मोहिनीअट्टम आणि सुनैना हजारीलाल यांची कथक प्रस्तुती होईल. हे चारही कलाकार त्यांच्या नृत्य शैलीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार असून या नृत्यप्रकारांना लोकाश्रय मिळावा म्हणून त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे. या सर्वांच्या नृत्य सादरीकरणानंतर प्रसिद्ध नृत्याभ्यासक आशिष खोकर हे या सर्वांशी संवाद साधतील.

यानंतर कथक गुरु रोहिणी भाटे आणि भरतनाट्यम् गुरु डॉ. सुचेता चापेकर यांच्या परंपरेतील शिष्या या ‘अर्घ्यम’ अंतर्गत सांघिक सादरीकरण करतील. यामध्ये गुरु रोहिणी भाटे यांच्या शिष्या शर्वरी जमेनीस, प्राजक्ता राज आणि मनीषा अभय यांचा ‘मनस्वी’ गट कथक प्रस्तुती करेल, तर रमा कुकनूर, वृषाली चितळे, प्राजक्ता पावनसकर, मानसी जोग, वैशाली टांक आणि अरुंधती पटवर्धन या शिष्यांचा ‘कलावर्धिनी संकुल’चा गट ‘नृत्यगंगा’ या भरतनाट्यम् सादरीकरणाची प्रस्तुती करेल.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी, आठ डिसेंबर रोजी सकाळीच्या ‘संवाद’ या सत्रात ज्येष्ठ नृत्य समीक्षक डॉ. सुनील कोठारी यांच्याबरोबर डॉ. सुचेता चापेकर या संवाद साधतील. यामध्ये डॉ. कोठारी यांचा सहा दशकांचा नृत्यप्रवास उपस्थितांसमोर उलगडला जाईल. हे सत्र सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवन येथे सकाळी १० वाजता पार पडेल. हे सत्र सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. यानंतर तिसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता ‘त्रिधारा’ अंतर्गत प्रसिद्ध नृत्यांगना विद्या सुब्रमण्यम, इंदिरा कदांबी आणि लावण्या अनंत या भरतनाट्यम् प्रस्तुती करतील.  

महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रविवारी, नऊ डिसेंबर रोजी सकाळी ‘त्रिविधा’ या सत्रात नवीन नृत्यरचनांच्या प्रक्रिया उलगडून दाखविल्या जातील. यामध्ये भरतनाट्यम् नर्तक परिमल फडके, ओडिसी नृत्यांगना शाश्वती घराई घोष आणि कथक नृत्यांगना अमीरा पाटणकर नृत्यप्रस्तुती आणि त्या निर्मितीमागील त्यांची विचार प्रक्रिया उलगडून दाखवतील. हे सत्रदेखील सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवन येथे सकाळी १० वाजता पार पडेल. ते सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. 

महोत्सवाचा समारोप चौथ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता ‘डॉन कुझोट’ भरतनाट्यम् नृत्याभिनयाने होणार आहे. एका स्पॅनिश कादंबरीवरीवर आधारित हे सादरीकरण असून, श्रीजित कृष्णा आणि त्यांच्या सह्रदय ग्रुप यांच्या वतीने याचे सादरीकरण होणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search