Next
उलगडली ‘चिंटू’ची गोष्ट...
रत्नागिरीतील ‘पुलोत्सवात’ रत्नागिरीकरांनी अनुभवली व्यंगचित्रांची दुनिया
BOI
Saturday, December 08, 2018 | 05:45 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
गेली २७ वर्षे आबालवृद्धांना हसवणारा चिंटू नेमका कसा साकारला जातो, याची गोष्ट खुद्द ‘चिंटू’कार चारुहास पंडित यांच्याकडूनच जाणून घेण्याची संधी आठ डिसेंबर २०१८ रोजी रत्नागिरीकरांना मिळाली. तसेच त्यांना व्यंगचित्रांच्या दुनियेत फेरफटकाही मारता आला. रत्नागिरीत सुरू असलेल्या ‘पुलोत्सवा’त चित्रकार चारुहास पंडित यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लहान मुलांसह विविध वयोगटांतील व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

‘आशय सांस्कृतिक, पुणे’ आणि ‘आर्ट सर्कल’ या संस्थांनी आयोजित केलेला पुलोत्सव सध्या रत्नागिरीत सुरू आहे. या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पंडित यांनी चिंटूचे चित्र काढून दाखवले, तसेच त्याच्या निर्मितीतील अनेक किस्सेही सांगितले. ते म्हणाले, ‘१९९१पासून आजतागायत चिंटू सुरू आहे. अनेक वर्षे ‘सकाळ’मधून प्रसिद्ध होणाऱ्या चिंटूला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अनेकदा चिंटू शब्दविरहितही  केला. चिंटू तुमच्या-आमच्यासारखाच आहे. कधी स्मार्ट, कधी बावळट, वात्रट, विनोदी, पण काही तरी संदेश देणारा आहे. चिंटूच्या मनातील अनेक भावना व वास्तवातील चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चिंटू घरातलाच वाटतो. पुलं गेल्याची बातमी आली तेव्हा मी व प्रभाकर वाडेकर अस्वस्थच होतो. प्रसंग गंभीर होता. नंतर, आतमध्ये पुलंची पुस्तके ठेवली आहेत आणि चिंटू बाहेर येऊन पाहतोय, असा निःशब्द आविष्कार साधला. ते पाहून अनेकांनी डोळ्यांत पाणी आल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.’ते म्हणाले, ‘पूर्वी दिवाळी अंकामध्ये येणारी व्यंगचित्रे पाहून मी शिकलो. शि. द. फडणीस, बाळासाहेब ठाकरे, मंगेश तेंडुलकर, मारिओ मिरांडा यांनी काढलेली व्यंगचित्रे पाहिली. चिंटू हे काल्पनिक पात्र असले, तरी माझ्या लहानपणी किंवा आसपास दिसणाऱ्या अनेक कथा त्यातून मांडल्या. आता फेसबुकवर चिंटूला सहा लाख फॉलोअर्स आहेत. अॅनिमेटेड स्वरूपातही तो आला आहे. आणखीही काही माध्यमांतून चिंटू दिसेल.’

‘व्यंगचित्रामध्ये कमीत कमी रेषांत बरेच काही सांगायचे असते. व्यंगचित्रकाराकडे भरपूर निरीक्षणशक्ती हवी, शोधक वृत्ती हवी. देहबोली, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, संपादन अशा अनेक विषयांचे ज्ञान त्याला असावे लागते. विद्यार्थ्यांनी किंवा मोठ्यांनीही आपले म्हणून स्वतःचे एक कॅरेक्टर (पात्र) तयार करावे. ते सोप्या पद्धतीने काढता येऊ शकते. एकेका रेषेने चेहऱ्यावरील भावभावना बदलत जातात,’ असेही पंडित यांनी सांगितले.

(कार्यशाळेत चारुहास पंडित यांनी साकारलेले चिंटूचे चित्र आणि त्यांनी सांगितलेले काही किस्से पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link