Next
नाशकातल्या गांधीनगरमध्ये रंगतेय ऐतिहासिक रामलीला
६३ वर्षांच्या परंपरेला राष्ट्रीय एकात्मतेची जोड
BOI
Friday, October 12, 2018 | 12:37 PM
15 0 0
Share this article:

रामलीला नाट्यातील क्षण.

नाशिक : रावणाचा पूर्वेतिहास, रावण कुंभकर्ण, बिभीषण वरदान, डाकू रत्नाकर (वाल्मिकी), राम जन्म, सीता जन्म, सीता स्वयंवर, राम-सुग्रीव मित्रता, सीताहरण यांसारखे रामायणातील प्रसंग आजही गांधीनगर येथे रामलीला नाट्यातून उभे राहतात. विशेष म्हणजे ६३ वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या या रामलीलेत विविध जातींचे, धर्मांचे लोक व हौशी कलाकार एकत्र काम करून रामायणातील चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच राष्ट्रीय एकात्मताही जोपासत आहेत.
 
गांधीनगर वसाहतीची स्थापना झाल्यानंतर कामानिमित्त देशभरातून आलेले विविध जाती-धर्माचे लोक या ठिकाणी स्थायिक झाले. यातीलच काही उत्तर भारतीय, गढवाली समाज व महाराष्ट्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी रामलीलेची मुहूर्तमेढ रोवली. ही रामलीला ६३ वर्षे अखंडितपणे सुरू आहे. नवरात्राच्या चौथ्या माळेपासून ते दसर्‍यापर्यंत रामलीलेचे सादरीकरण होते. या दहा दिवसांत रावणाचा पूर्वेतिहास, रावण कुंभकर्ण, बिभीषण वरदान, डाकू रत्नाकर (वाल्मिकी), राम जन्म, सीता जन्म, सीता स्वयंवर, अंगद-रावण संवाद, हनुमान-रावण संवाद, बिभीषण निष्कायन, राम-सुग्रीव मित्रता, सीताहरण, अशोक वाटिका, लक्ष्मण-इंद्रजित युद्ध आदी प्रसंगांचे सादरीकरण केले जाते. हे पाहण्यासाठी जिल्हाभरातून लोक मोठ्या संख्येने येतात.

कित्येक कुटुंबातील तिसरी-चौथी पिढी आजही या रामलीलेत आपले योगदान देत आहे. यात काम करणारे सर्व तंत्रज्ञ, कलावंत विनामोबदला काम करतात, हेच या रामलीलेच्या यशस्वीतेचे गमक आहे. हिंदी संवाद व आवश्यक तेथे शास्त्रीय रागांवर आधारित गीतांमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. गांधीनगर प्रेसमधील अधिकारी हरिलाल यांनी सन १९६०मध्ये रामलीला समितीची स्थापना केली. पीडब्ल्यूडीचे तत्कालीन मुख्य अभियंता सरदार महेंद्रसिंग हे प्रथम अध्यक्ष होते. सन १९५९ ते १९६५ या काळात गांधीनगर येथील वेल्फेअर क्लब हॉलमध्ये रामलीलेचे सादरीकरण होत असे. याच दरम्यान एकदा फिरत्या रंगमंचावरही काही दृश्यांचे सादरीकरण करण्यात आल्याचे काही जुने कलावंत सांगतात. तत्कालीन परिस्थितीत रामलीला बघण्यासाठी सिन्नर, देवळाली आदी भागातून लोक कुटुंबियांसमवेत बैलगाडीतून येत असत. लोकांचा वाढता प्रतिसाद व गर्दी लक्षात घेऊन वेल्फेअर हॉलमध्ये होत असलेली रामलीला हॉलच्या बाहेर मोकळ्या मैदानावर होऊ लागली. तेव्हापासून आजतागायत येथील वेल्फेअर क्लब हॉलच्या मैदानावर रामलीलेचे अखंडितपणे आयोजन होत आहे.

नाटकाची तालीम करताना कलाकार.

तत्कालीन परिस्थितीत सीता स्वयंवराच्या प्रसंगानंतर श्रीराम, लक्ष्मण व सीतेच्या वेशभूषेतील कलावंतांची परिसरात रथातून मिरवणूक काढली जात असे. सुरुवातीच्या काळात रामलीलेतील स्त्री भूमिका पुरुष कलावंतच करीत असत. शब्बीर अली, लियाकत अली पठाण, विष्णू गंगतानी, कृष्णा गवांदे, बालमसिंग, हजरीलाल शुक्ला, बिंदरसिंग, सुरिंदरसिंग या पुरुष कलावंतांनी रामलीलेत सादर केलेल्या स्त्री भूमिका अजरामर ठरल्या आहेत. सन १९६५ मध्ये श्यामा हिंदळेकर यांनी प्रथमच शूर्पणखेची भूमिका केली. त्यानंतर स्त्रियांनी रामलीलेत सहभाग घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीचे काही जुने कलाकार आजही यात काम करत आहेत.

रामलीलेचे प्रमुख आकर्षण म्हणजे दसरा. दसर्‍याच्या दिवशी येथील रामलीला मैदानावर रावणाच्या ६० फुटी पुतळ्याचे दहन करण्यात येते. या प्रसंगी श्रीरामाची वानरसेना व रावणाची राक्षससेना यांच्या घनघोर युद्धाचे दृश्य सादर करण्यात येते. रामलीलेची ही परंपरा गेल्या ६३ वर्षांपासून अविरत सुरू आहे.

दिवसेंदिवस प्रेक्षकांची संख्या वाढत असल्यामुळे कलावंतांनाही प्रोत्साहन मिळते. गांधीनगरच्या रामलीलेने पारंपरिक बाज व आत्मीयता जोपासल्याने आपलेपणाची एक वेगळीच भावना कलावंतांसह प्रेक्षकांमध्ये आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून या रामलीलेची धुरा तरुण मंडळींकडे आली असून, कपिल शर्मा, हरिष परदेशी, प्रदीप भुजबळ, प्रकाश भालेकर, अशोक लोळगे, संजय गंगातीरकर, जितेंद्र गवारे, नगरसेवक अनिल ताजनपुरे, सुनील मोदीयानी, सुनिल साधवानी, भरत राव, सागर पुरी, साहिल शर्मा आदी पदाधिकारी व कलावंत ती यशस्वीपणे पार पाडत आहेत.

याबाबत रामलीला समितीचे अध्यक्ष कपिल शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. ‘गांधीनगरची ऐतिहासिक रामलीला ही नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातील भक्तांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा उत्सव मानला जातो. महाराष्ट्रातल्या काना-कोपऱ्यातून काही भाविक खास रामलीला पाहण्यासाठी नाशिकमध्ये येतात. गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही या रामलीलेला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी लेखी स्वरूपात पत्र पाठवून कौतुक केले होते. ही ६३ वर्षांची वैभवशाली परंपरा ही या पुढेही अशीच अविरतपणे सुरू राहणार आहे,’ असे ते म्हणाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search