Next
फुटबॉलच्या महायुद्धातही जर्मनी रशियात पराभूत का झाली?
BOI
Friday, June 29, 2018 | 12:36 PM
15 0 0
Share this storyजग जिंकायला निघालेल्या जर्मन फौजेला रशियात कधी विजय मिळाला नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासाची पुनरावृत्ती रशियातील फुटबॉल वर्ल्ड कपमध्येही व्हावी, हा निव्वळ योगायोग. गेल्या वेळच्या जगज्जेत्या जर्मनीची पहिल्या फेरीतूनच झालेली एक्झिट तमाम फुटबॉल शौकिनांना निराश करणारी आहे. महायुद्धात प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण्याची आणि अतिआत्मविश्वास दाखविण्याची चूक फुटबॉलमध्येही जर्मन फौजेनं केली. त्याचाच हा परिणाम. याचं विश्लेषण करणारा लेख... ‘नाचू फुटबॉलचे रंगी’ या सदरात...
.......
ब्राझीलमध्ये झालेल्या २०१४च्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक संघ एखाद्या स्टार खेळाडूवर अवलंबून होता. जर्मनी हा एकमेव असा संघ होता, की जो ‘टीम’ म्हणून मैदानात उतरत होता. त्यातच या संघाचं यश दडलं होतं. संपूर्ण स्पर्धेत त्यांचा वावर विजेत्यांच्या थाटातच होता. अंतिम सामन्यात अर्जेंटिना संघात लिओनेल मेस्सी एखादा चमत्कार करील, अशी अपेक्षा होती; पण सांघिक खेळाच्या जोरावर जर्मनीनं बाजी मारली. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ‘हाच का तो जर्मनीचा संघ?’ असा प्रश्न सगळ्यांच्या मनात उभा राहिला. 

२०१४च्याच वर्ल्ड कपमध्ये असे नव्हे, तर त्या आधीच्या वर्ल्ड कपमध्येही जी चपळता, व्यूहरचना आणि या संघात दिसत होती, त्याच्या दहा टक्केही संघानं यंदा चाहत्यांना इम्प्रेस केलं नाही. न्यूअर (३२), सॅमी खेड्रिया (३१),  ओझील आणि मार्को रेऊस (२९) अशा चार खेळाडूंना घेऊन प्रशिक्षक जोखिम ल्यो मैदानात उतरले होते. पहिल्याच सामन्यात खेड्रिया आणि ओझील यांच्यात तो दम राहिलेला नाही, असं जाणवल्यानंतर त्यांनी स्वीडनविरुद्धच्या सामन्यावेळी त्यांना कट्ट्यावर बसवलं. ल्यो यांनी कडक निर्णय घेतल्याचं सगळ्यांनीच कौतुक केलं; पण पुन्हा कोरियाविरुद्ध त्यांना मैदानात उतरवून काय साधलं, हेच कळलं नाही. कोरियाविरुद्ध ल्यो यांनी पाच बदल केले. थॉमस म्युलरला बाहेर ठेवून त्यांनी ओझीलला संधी दिली. ल्यो हे खेळाडूंवर विश्वास टाकणारे म्हणून ओळखले जातात. स्वीडनविरुद्ध टोनी क्रूझनं दिलेल्या एका चुकीच्या पासमुळेच संघ पिछाडीवर पडला होता; पण ल्यो यांनी शेवटच्या मिनिटापर्यंत क्रूझला बाहेर काढलं नाही. शेवटी क्रूझनंच गोल करून संघाला विजय मिळवून दिला. ल्यो यांचा उद्देश चांगला असला, तरी प्रत्येक खेळाडू, त्याची क्षमता, प्रतिस्पर्धी आणि सामन्यातील स्थिती या सगळ्याचा विचार इथं व्हायला हवा होता, असं वाटतं. 

संघनिवडीवरच प्रश्नचिन्ह
जर्मन संघाच्या निवडीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं; पण संघाची तयारी चांगली झालीय, असा दावा ल्यो सातत्यानं करत होते. याच संघानं रशियात गेल्या वर्षी झालेला फिफा कॉन्फिडरेशन कप जिंकला होता. त्यामुळे ल्यो यांच्यावर विश्वास टाकण्यात येत होता; पण तरी काही खेळाडूंना संघात का घेतलं नाही, यावरून आजही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यात मँचेस्टर सिटीकडून खेळणाऱ्या लिरोय सेनी या २२ वर्षांच्या खेळाडूला संघात घेण्यात आलं नाही. त्यानं मँचेस्टर सिटीला प्रीमिअर लीगचं विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. गेल्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध गोल करून संघाला विजेतेपद देणारा मारिओ गोत्झेही संघात स्थान मिळवू शकला नाही.

प्रशिक्षक जोखिम ल्यो म्हणतात...
मला अजूनही वाटत नाही, की जर्मन फुटबॉलसाठीचा हा आजचा दिवस वाईट किंवा काळा आहे. आमच्याकडे तरुण आणि चांगले कौशल्य असणारे खेळाडू आहेत. संघाला पुढे घेऊन जाण्याची त्यांच्यात क्षमता आहे. मुळात अशा प्रकारची एक्झिट होणं, हे यापूर्वीही अनेक संघांच्या बाबतीत झालं आहे. यातून आपण एक योग्य निष्कर्ष काढावा आणि पुढे जावं, हेच योग्य ठरेल.
 
काय झालं जर्मनीच्या पराभवामुळे? 
- गतविजेत्या संघानं सर्वांत कमी गोल करण्याच्या रांगेत जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर. यापूर्वी १९९८च्या विजेत्या फ्रान्सला २००२मध्ये एकही गोल न करता स्पर्धेबाहेर पडावं लागलं होतं. जर्मनीनं यंदा दोन गोल केले. 
- आशियाई संघांविरुद्ध जर्मनीचा संघ सहा सामने खेळला आहे. त्यात पहिल्यांदा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 
- २०१०च्या वर्ल्ड कपनंतर दक्षिण कोरियाचा हा पहिला विजय आहे. २०१०मध्ये त्यांनी ग्रीसचा २-० असा पराभव केला होता. 
- २००२मध्ये यजमान असताना दक्षिण कोरियानं ‘सेमी-फायनल’पर्यंत धडक मारली होती. त्यात जर्मनीनेच त्यांचा २-० असा पराभव केला होता. 
- कोरियाने २००२मध्ये पोर्तुगालचा १-० असा पराभव करून त्यांना स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखविला होता.
- वर्ल्ड कपमध्ये दक्षिण कोरियाने तिसऱ्यांदा जर्मनीशी सामना केला होता. त्यात त्यांचा हा पहिला विजय होता. 
- २०१०च्या वर्ल्ड कपनंतर ज्या सामन्यात थॉमस म्युलर पहिल्यापासून खेळत नाही, ते दोन्ही सामने जर्मनीने गमावले आहेत. २०१०च्या सेमी-फायनलमध्ये स्पेनकडून त्यांना ०-१ असा पराभव पत्करावा लागला होता.

गतविजेत्यांचा पराभव - आगळी परंपरा
फ्रान्सने १९९८मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर २००२मध्ये त्यांना साखळी फेरीतूनच माघारी जावं लागलं. महान फुटबॉलपटू झिनेदिन झिदान जायबंदी होता. शेवटच्या साखळी सामन्यात तो खेळला; पण त्याला संघाला पुढं नेता आलं नाही. २०१०मध्ये स्पेननं विजेतेपद पटकावलं; पण २०१४च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांची अवस्था खूपच वाईट झाली. नेदरलँडनं त्यांचा पहिल्याच सामन्यात ५-१ असा धुव्वा उडवला होता. तीनपैकी दोन सामन्यांत पराभव स्वीकारून हा संघ स्पर्धेबाहेर पडला होता.

- रविराज गायकवाड
ई-मेल : rg.raviraj@gmail.com

(लेखक कोल्हापूर येथील मुक्त पत्रकार असून, क्रीडा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘नाचू फुटबॉलचे रंगी’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/AYA3iS या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Deepak homkar About 233 Days ago
वाह रवी मस्तच लेख...
0
0

Select Language
Share Link