Next
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे बिदर
BOI
Wednesday, December 26, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘करू या देशाटन’ या सदराच्या आजच्या भागात सहल करू या कर्नाटकातील  ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बिदरची...
..............
इतिहासात आणि पर्यटनात बिदरला महत्त्वाचे स्थान आहे. इसवी सन पूर्व ३००पासून या भागाचा इतिहास दिसून येतो. हा भाग त्या वेळी मौर्य साम्राज्यात समाविष्ट होता. त्यानंतर हा भाग सातवाहन, कदंब, चालुक्य, काकतीय, राष्ट्रकूट व अखेर यादवांच्या अंमलाखाली होता. तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी, त्यानंतर मोहम्मद तुघलक यांचे येथे आधिपत्य होते. त्यानंतर १४व्या शतकात सुलतान अल्लाउद्दीन बहामनशाह बहामनी यांनी बिदरवर कब्जा केला. अहमदशाह प्रथम (१४२२-१४८६) याच्या शासन काळात बिदरला बहामनी साम्राज्याच्या राजधानीचा दर्जा दिला गेला. मोहम्मद गवान त्या वेळचा वजीर होता. शाहजहानने औरंगजेबाला दख्खन सुभ्यावर नेमणल्यानंतर सन १६५६मध्ये २१ दिवसांच्या लढाईनंतर त्याने बिदर जिंकले. यानंतर बिदर हा मुघल साम्राज्याचा एक भाग बनला. १७२४मध्ये हा भाग निजामाच्या ताब्यात आला. १७६२नंतर तो इंग्रजांचा मांडलिक झाला. 

बिदर किल्ल्यातील बाग

१९४७मध्ये हैदराबाद भारतीय संघराज्यात समाविष्ट झाले. भाषावार प्रांतरचनेत हा भाग कर्नाटकात समाविष्ट झाला. यातील बराच भाग, प्रामुख्याने भालकी तालुका हा मराठी भाषक असून, तो महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची स्थानिक लोकांची मागणी आहे. स्वातंत्र्यसंग्रामात ‘भालकीचे बंड’ प्रसिद्ध असून, सातारा येथील राजघराण्याशी संबंधित व्यक्तींचे महत्त्वाचे योगदान आहे. हा भाग कृषी उत्पादनासाठी, तसेच हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे. 

जांभ्या दगडाचा स्तर

बिदर :
हे राज्याच्या ईशान्य भागातील २३५० फूट उंचीवरील एक मोठे, पठारावरील ऐतिहासिक ठिकाण आहे. कुजबुजणाऱ्या स्मारकांचे (Whispering Monuments) प्रतीक म्हणून बिदर ओळखले जाते. मध्ययुगीन दख्खनची राजधानी असणाऱ्या या भागात सुमारे ९८ ऐतिहासिक ठिकाणे असून, त्यातील चार राष्ट्रीय पुरातत्त्व स्मारके, तर १४ राज्य स्तरावरील पुरातत्त्व स्मारके आहेत. येथे अनेक ऐतिहासिक वास्तू पुरातत्त्व खात्याने जपून ठेवल्या आहेत. बिदरमधील बांधकामावर पर्शियन प्रभाव आहे. त्यामुळे भव्यता व कलाकुसर हे येथील वैशिष्ट्य आहे. बॉलिवूडच्या चित्रीकरणासाठी आता ते प्रसिद्ध झाले आहे. येथील हवा खूपच छान आहे. व्यापारी व शैक्षणिकदृष्ट्या बिदर प्रगत आहे. बिदर येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे वायुसेना प्रशिक्षण केंद्र आहे. येथे लष्करी पायलटना प्रगत जेट प्रशिक्षण दिले जाते. हैदराबादचा चौथा निजाम नासिर-उदौला-आसफ चौथा याचा जन्म इथेच झाला. वास्तुशिल्पीय, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या अनेक ठिकाणांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. येथे जिनिंग मिल्स, कापसाची बाजारपेठ असून, तूरडाळीचा मोठा व्यापार येथे चालतो. 

बिद्रीकला

बिद्रीकला :
बिदर हे अनेक गृहोद्योगांचे ठिकाण असून, येथील बिद्रीकला (बिद्री वेअर) प्रसिद्ध आहे. येथे शोभेच्या वस्तू बनविल्या जातात. प्रामुख्याने स्थानिक मातीपासून केलेली भांडी (पॉटरी), त्यावर पेंटिंग आणि चांदीच्या तंतूंपासून केलेले नक्षीकाम हे या कलेचे वैशिष्ट्य आहे. परंतु हा उद्योग आता कमी होऊ लागला आहे. 

येथील कोल्हार औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक प्रसिद्ध कारखाने आहेत. येथे औषध कंपन्या आहेत. घडी डिटर्जंट पावडरचाही कारखाना येथे आहे. बिदर हे ठिकाण भूगर्भातील नैसर्गिक पाणीसाठ्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील पठार १०० ते ५०० फूट जाडीच्या जांभ्या दगडाचे असून, त्याखाली अग्निजन्य खडक आहे. त्यामुळे दोन स्तरांमध्ये पाण्याची साठवणक्षमता वाढते. या नैसर्गिक पाण्याचा १५व्या शतकात भुयारी मार्ग काढून शहरासाठी उपयोग करून घेण्यात आला. ही पाणीपुरवठा योजना ‘करेज’ या नावाने ओळखली जाते. 

बिदर किल्ला

बिदर किल्ला :
देशाच्या सर्वांत मोठ्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला मानला जातो. विविध देशांतील अभियंता आणि आर्किटेक्ट्स त्याचे डिझाइन आणि बांधकामावर कार्यरत होते. येथील संग्रहालयात जुनी शस्त्रे, जुन्या मूर्ती, पुरातन दगडांसह अनेक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. 

रंगीन महल किल्ल्यातील गुंबद दरवाजा जवळ असून, रंगीबेरंगी टाइल्स आणि इतर कलात्मक सजावटीमुळे आकर्षक दिसतो. तेथे केलेले लाकाडावरील नक्षीकाम मौल्यवान व अद्वितीय आहे. 

टर्किश महाल सुलतानाच्या तुर्की पत्नीसाठी बांधण्यात आला होता. हा महाल बरीदशाही सुलतानांनी आकर्षकरीत्या बांधला व सजविला आहे. 

बिदर मनोरागगनमहाल बहामनी राजांनी बांधला होता आणि बरीद शाही शासकांनी त्यात काही बदल केले होते. यात दोन दालने आहेत. तसेच रक्षकांसाठी खोल्याही आहेत. तख्त महल किंवा दी रॉयल पॅलेस अहमदशाह यांनी बांधला होता. तो शाही निवास होता. हे ठिकाण रंगीबेरंगी शिलालेख आणि दगडांच्या शिलालेखांनी पूर्णपणे सुसज्ज होते. ते आजही पाहता येते. वरच्या बाजूला एक विशाल सभागृह होते. त्याला दोन बाजूंना रॉयल पॅव्हेलियन्स होत्या. 

सोलह खंबा मस्जिद : सोळा खांब असलेली ही मशीद १४२३/२४मध्ये कुबिल सुलतान यांनी बांधली होती. झनाना मस्जिद म्हणून ओळखली जाणारी ही मशीद २९० फूट लांब आणि ७८ फूट रुंद आहे. या मशिदीच्या दक्षिणेकडील भिंतीच्या मागे एक मोठी विहीर आहे. 

बिदरमधील इतर वास्तूंमध्ये ७२ फूट उंचीचा मिनार, जामा मशीद, बहामनी कबरी (अस्तुर), नरसिंह गुंफा, मैलार येथील खंडोबा मंदिर (जेजुरीला येण्यापूर्वी खंडोबा येथे राहत होते, अशी आख्यायिका सांगितली जाते) आदींचा समावेश आहे. 

मदरसा-ए-महमूद गवान

मदरसा-ए-महमूद गवान :
बिदर येथे १५व्या शतकाच्या उत्तरार्धात बहामनी साम्राज्याचा वजीर महमूद गवान याने स्थापन केलेला हा मध्ययुगीन मदरसा किंवा इस्लामिक महाविद्यालय आहे. याचे बांधकाम १४६०मध्ये करण्यात आले. इंडो-इस्लामिक स्थापत्यशास्त्र शैलीचे हे उत्तम उदाहरण आहे. राष्ट्रीय महत्त्वांच्या स्मारकांच्या यादीत या इमारतीचा समावेश आहे. महमूद गवान हा व्यापारी म्हणून इराणमधून गिलान या गावातून दिल्लीला आला व तेथून बिदर येथे आला. बादशहाने त्याची गुणवत्ता ओळखून त्याला वजीर केले. त्याने स्वतःच्या पैशातून याची निर्मिती केली. 

गुरु नानकझिरा साहिब गुरुद्वारा

नानकझिरा :
इ. स. १५१० ते १५१४च्या दरम्यान गुरुनानक दक्षिण यात्रेदरम्यान ओंकारेश्वर, खांडवा, नांदेडमार्गे गोवळकोंडा येथे गेले. तेथून पीर जलालुद्दीन आणि याकूब अली यांना भेटण्यासाठी बिदरमध्ये आले. तेथे मुस्लिम फकिरांच्या झोपडपट्ट्यांमध्ये ते गेले होते. फकिरांनी गुरूंचा उपदेश आणि शिकवण्यांमध्ये रस घेतला. ही बातमी लवकरच बिदरच्या सभोवतालच्या परिसरात पसरली आणि मोठ्या संख्येने लोक त्यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊ लागले. बिदरमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता होती. विहिरी खोदण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांचा फायदा झाला नाही. काही विहिरींतील पाणी पिण्यासाठी अनुपयुक्त असल्याचे आढळले. ही स्थिती पाहून गुरू दुःखी झाले. त्यांनी तेथील एक दगड हलविला आणि आश्चर्यचकित करणारी घटना घडली. दगडाखालून पाणी वाहू लागले. अशा प्रकारे ही जागा नानकझिरा (झिरा = प्रवाह) म्हणून ओळखली जाऊ लागली. गुरुद्वाराजवळील खडकातून बाहेर पडणारा स्वच्छ नितळ पाण्याचा प्रवाह गुरूंच्या प्रार्थनेमुळे देवाने दिल्याचे मानले जाते. त्यांच्या स्मरणार्थ नानकझिरा या नावाने गुरुद्वारा बांधण्यात आला आहे. 

भालकी किल्ला दरवाजा

भालकी :
भालकी हे एक प्राचीन शहर आहे. चालुक्य काळात भल्लुनके या नावाने ते ओळखले जाई. हे गाव स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे ठिकाण असून, याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. इ. स. १८५७च्या युद्धानंतर तात्या टोपेंच्या अनुयायांपैकी माधोराव उर्फ रामराव यांनी येथे स्वतःची एक पलटण उभारून लढा दिला होता. ते सातारच्या छत्रपतींचे नातेवाईक होते, असा उल्लेख सर रिचर्ड टेंपल यांनी आपल्या डायरीमध्ये केला होता. त्यांना जंगबहादूर म्हणूनही ओळखले जायचे. त्यांनी भालकीच्या जंगलात आसपासच्या सुमारे १५०० लोकांचे सैन्य उभे केले होते. त्यावर त्या काळचे २० हजार रुपये त्यांनी खर्च केले होते. ५०० अनुयायांची नेमणूक करण्यासाठी त्यांनी त्यांचे अनुयायी देवराव यांना २०० रुपये दिले. जमादारला मासिक पगार ४० रुपये, तर शिपायाला ३० रुपये दिले जात होते. त्यांनी सातारच्या राजकुटुंबाचे गमावलेले वैभव प्राप्त करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला, असे मानण्यात येते. त्यात ब्रिटिशांचे मोठे नुकसान झाले होते. शेवटी त्यांना आणि त्यांच्या मुख्य अनुयायांना हैदराबाद राज्यातील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अटक केली. फौजदारी न्यायालयाचे मॅजिस्ट्रेट मुल्वी नसरुल्ला खान यांनी एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत त्यांच्यावर साम्राज्याविरुद्ध विद्रोह आणण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप त्यांच्यावर लावला आणि जन्मठेपेची शिक्षा दिली. जंगबहादूर, त्यांचे सहकारी भीमराव, बालकिस्तय्या आणि विठोबा यांनाही जन्मठेप देण्यात आली. तेथेच त्यांचे निधन झाले. 

भालकी किल्ला

भालकी किल्ला :
हा किल्ला राजा रामचंद्रराव जाधव यांनी बांधला. येथे मराठा सैन्यासाठी शस्त्रास्त्र साठा केला होता. किल्ला पाच एकर जमिनीवर असून, त्याला २१ फूट उंच तटबंदी आहे. किल्ल्याच्या भिंती बांधण्यासाठी स्थानिक पातळीवरील उपलब्ध काळ्या दगडांचा व चुना यांचा वापर केला गेला आहे. येथे एक विहीर असून, त्यातून किल्ल्याबाहेर जाण्याचा छुपा मार्ग असावा. हा किल्ला इ. स. १८२० ते १८५० दरम्यान बांधण्यात आला असावा. 

बिदरमधील मदरसाबसवकल्याण : हे लिंगायतांचे पवित्र ठिकाण असून, ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे ठिकाण आहे. पूर्वी हे फक्त कल्याण नावाने ओळखले जायचे. १९५६नंतर याचे नाव बदलून महात्मा बसवेश्वरांच्या समरणार्थ बसवकल्याण असे करण्यात आले. या गावाचा उल्लेख गुरुचरित्रातही आढळतो. या गावावर पश्चिम चालुक्य, कल्याणीचे कलाचुरी, देवगिरीचे यादव, काकतीय, दिल्ली, बहामनी (बिदर, गुलबर्गा), बिदर, विजापूर, मुघल या राजवटींसह हैदराबादच्या निजामाने राज्य केले होते. इ. स. १०५० ते ११९५पर्यंत कल्याणी ही चालुक्यांची राजधानी होती. त्यानंतर ती मालखेड येथे हलविण्यात आली. 

कल्याणी चालुक्य शैलीतील काळेश्वर आणि नवलिंग मंदिरे कुकुर येथे आहेत. बसवकल्याण येथे १२व्या शतकात कल्याणी राजा बिजाज याने राज्यारोहण केल्यानंतर बसवेश्वर यांना त्यांचे पंतप्रधान म्हणून नेमण्यात आले. श्री बसवेश्वरांनी अस्पृश्यता आणि लैंगिक भेदभाव थांबविण्यासाठी सामाजिक चळवळ केली आणि शिवशरण क्रांती झाली. बसेश्वरावांनी बऱ्याच लोकांना अनुग्रह दिला. 

बसवेश्वर मंदिर बसवकल्याणच्या मध्यभागी आहे. मोती महाल, हैदराबाद महाल, पीरन दर्गा या काही इस्लामिक वास्तू येथे आहेत. कंबली मठ आणि सदानंद मठासारखी इतर धार्मिक स्थळेही आहेत. 

बसवेश्वरांची १०८ फूट उंचीची मूर्ती

माणिक प्रभू यांची बालस्वरूप मूर्तीबसवकल्याण किल्ला : हा किल्ला चालुक्यांनी बांधला होता. किल्ल्यामध्ये बाजूला एक संग्रहालय आहे. तेथे ऐतिहासिक मौल्यवान वस्तू आणि माहितीचा प्रचंड संग्रह आहे. येथे १०, ११व्या शतकातील जैन मूर्ती आहेत. बसवधर्मपीठ चॅरिटेबल ट्रस्टने शरण सांस्कृतिक वारसा पुनरुत्थानाच्या उद्देशाने बसवकल्याण शहराच्या प्रवेशद्वाराच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला २० एकर जमीन घेऊन प्रार्थना सभागृह व यात्रीनिवास बांधला आहे. तसेच तलावही बांधला आहे. ट्रस्ट एक अनाथाश्रम चालवत आहे. जवळ असलेल्या सुशोभित टेकडीवर बसवेश्वरांची १०८ फूट उंचीची मूर्ती बसविण्यात आली आहे. दत्तसंप्रदायातील संत माणिक प्रभू यांचा जन्म बसवकल्याणजवळील लाडवांती गावात झाला. येथे त्यांचे मंदिरही बांधण्यात आले आहे. तेथे माणिक प्रभू यांची बालस्वरूपातील मूर्ती ठेवण्यात आली आहे. जवळ असलेल्या जलसंघवी, नारायणपुरा आणि शिवपुरा येथे चालुक्य शैलीतील मंदिरे आहेत. 

हुमणाबाद : या गावाजवळच माणिकनगर येथे विराज नदी आणि गुरू गंगा यांच्या संगमावर दत्तसंप्रदायातील संत माणिक प्रभू यांची समाधी बांधण्यात आली आहे. लोक संत माणिक प्रभू याना दत्ताचे अवतार मानतात. महाराष्ट्र, आंध्र, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागांतून सुमारे पाच लाख भाविक येथे भेट देतात आणि दर्शन घेतात. 

जलसंघवी : हे गाव चालुक्य घराण्यातील राजा विक्रमादित्य सहावा याने उभारलेले आहे. गावाच्या परिसरात एक मोठा तलाव आहे. त्याच्या जवळपास काही चालुक्य मंदिरे आहेत. कमलीश्वर मंदिर उत्कृष्ट मदनिकांच्या शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. जलसंघवी मंदिरातील शिल्पकलेतून बेलूर, हळेबिडू आणि सोमनाथपूरच्या होयसळ चित्रांसाठी प्रेरणा मिळाली. हे चालुक्य मंदिर ताऱ्याच्या आकारात तयार करण्यात आले आहे. या गावातील लोक मुख्यतः दुग्धशाळा, मेंढीपालन आणि ऊस लागवडीत गुंतलेले आहेत. खो-खो हा येथील लोकांचा आवडीचा खेळ आहे. 

कसे जाल बिदर येथे?
बिदर हे लातूर-हैदराबाद रेल्वे व रस्ते मार्गावरील ठिकाण आहे. येथून मोटारीने गुलबर्गा, तसेच हैदराबाद येथेही जाता येते. जवळचा विमानतळ हैदराबादला, १४७ किलोमीटरवर; पण तो लष्कराचा विमानतळ आहे. बिदर येथे राहण्याची जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. जाण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोबर ते मार्च. 

(ऋणनिर्देश : या लेखाच्या माहितीसाठी बिदर या गावात संपर्क साधण्याकरिता हैदराबाद येथील जयश्री चारेकर यांनी प्रयत्न केले आणि बिदर येथील डॉ. धनंजय नाईक यांच्याशी संपर्क साधून दिला. डॉ. धनंजय नाईक यांनी काही वास्तूंची, खासकरून पाणी योजना व मदरसा-ए-महमूद गवान यांची माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे आभार.)

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
जयश्री चारेकर About 182 Days ago
अप्रतीम लेख खूप सविस्तर वर्णन आहे.
1
0

Select Language
Share Link
 
Search