Next
जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज
१८ राज्यांतील ४८ स्पर्धकांचा समावेश
BOI
Tuesday, July 30, 2019 | 12:35 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : रशियात ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी अर्थात ‘ऑलिम्पिक्स ऑफ स्किल्स’करिता भारताचा संघ सज्ज झाला असून, १८ राज्यांमधून निवडण्यात आलेल्या ४८ स्पर्धकांचा यात समावेश आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाने नुकतीच या संघाची घोषणा केली. 

रशियातील कझान येथे २२ ते २७ ऑगस्ट २०१९ दरम्यान ही स्पर्धा होणार असून, यात एकूण ५५ कौशल्य स्पर्धांमध्ये ६० देशांतील दीड हजारपेक्षा अधिक स्पर्धक भाग घेणार आहेत. भारत यातील ४४ विभागांमध्ये भाग घेणार आहे. यात मोबाइल रोबोटिक्स, प्रोटोटाइप मॉडेलिंग, हेअरड्रेसिंग, बेकिंग, कन्फेक्शनरी आणि पॅटीसेरी, वेल्डिंग, विटा लावणे, कार पेंटिंग, फ्लोरिस्ट्री आदी कौशल्यांचा समावेश आहे.

केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्या (एमएसडीई) अखत्यारीतील राष्ट्रीय कौशल्य महामंडळ (एनएसडीसी) २०११ सालापासून या द्विवार्षिक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. अबूधाबीमध्ये २०१७ मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने एक रौप्यपदक, एक कांस्यपदक आणि उत्कृष्टतेसाठीची नऊ बक्षिसे (मेडलियन्स) प्राप्त केली होती. या स्पर्धेत भाग घेतलेल्या ५६ देशांमध्ये भारताने १९वे स्थान मिळवले. ही या स्पर्धेतील भारताची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

यंदाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या निवडीची प्रक्रिया जानेवारी २०१८ मध्ये सुरू झाली. यासाठी इंडियास्किल्स स्पर्धा घेण्यात आली. २२हून अधिक राज्यांनी मार्च ते एप्रिल २०१८ दरम्यान सुमारे ५०० जिल्हा, तसेच राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या. या स्पर्धांतील विजेत्यांना जयपूर, लखनौ, बेंगळुरू आणि भुवनेश्वर येथे झालेल्या चार प्रादेशिक स्तरावरील स्पर्धांमध्ये उतरवण्यात आले. 

प्रादेशिक स्पर्धांच्या विजेत्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा झाली. दोन ते सहा ऑक्टोबर २०१८ या काळात दिल्लीतील एरोसिटी ग्राउंड्सवर ही स्पर्धा घेण्यात आली. तेव्हापासून निवड झालेल्या स्पर्धकांना कठोर प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्या कौशल्यांचा अधिक विकास करण्यासाठी; तसेच आवश्यक तो अनुभव मिळवण्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागाची संधीही देण्यात आली. बहुतेक स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय केंद्रांवर प्रशिक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्यांची कौशल्ये लक्षणीयरित्या सुधारली आहेत.

भारतीय संघामध्ये संपूर्ण देशभरातील स्पर्धक आहेत. यात ईशान्य भारतातील राज्यांमधील सहा स्पर्धकांचा समावेश आहे. ७७ टक्के स्पर्धक छोट्या शहरांतील आहेत. हे सर्व स्पर्धक १० वेगवेगळ्या भाषा बोलतात. यातील बहुतेक स्पर्धक अत्यंत सामान्य पार्श्वभूमीतून आलेले आहेत. ३५ टक्के स्पर्धकांचे आईवडील एकतर कृषीक्षेत्रात काम करत आहेत किंवा रोजंदारीवरील कामगार आहेत.

कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे भारतीय संघाची घोषणा करताना म्हणाले, ‘या जागतिक पातळीवरील स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या देशातील तरुणाईला जगभरातील स्पर्धकांसोबत स्पर्धा करण्याची, त्यांतून शिकण्याची संधी देण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. अशा स्पर्धांमुळे आपल्याला आपली कौशल्ये आंतरराष्ट्रीय मानकांवर तपासून बघण्यात मदत मिळते आणि भारतातील व्यावसायिक प्रशिक्षणाचा एकंदर दर्जा सुधारणेही यामुळे शक्य होईल. हे तरुण स्पर्धक ज्या कळकळीने, प्रयत्नशीलतेने व निष्ठेने स्पर्धेसाठी तयारी करत आहेत, ते बघणे खरोखरंच अभिमानास्पद आहे. मी प्रत्येक स्पर्धकाचे त्याने आतापर्यंत पार पाडलेल्या प्रवासाबद्दल अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्यकाळातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. भविष्यकाळातील स्पर्धकांना, तसेच व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या सर्वांना हे स्पर्धक प्रेरणा देतील अशा विश्वास मला वाटतो.’

या उपक्रमाला १००हून अधिक उद्योग तसेच शैक्षणिक संस्थांनी मदत केली असून, यामध्ये मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, टोयोटा, फेस्टो, व्हीएलसीसी, गोदरेज, एक्झाल्टा, अपोलो, बर्जर पेंट्स, सिस्को, कॅपल, सेंट गोबेन, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम), श्नायडर, पर्ल अकॅडमी, एनटीटीएफ, डायकिन, एल अँड टी आदींचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धकाला प्रत्यक्ष अनुभवातून प्रशिक्षण (हॅण्ड-ऑन-ट्रेनिंग) देण्यासाठी, तसेच त्यांच्या दैनंदिन प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशिक्षक/तज्ज्ञ निश्चित करण्यातही या कंपन्यांनी मदत केली.

यंदा जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघांमध्ये भारतीय संघ सहाव्या क्रमांकाचा सर्वांत मोठा संघ आहे. गेल्या स्पर्धेच्या तुलनेत (अबूधाबी २०१७) आपली कामगिरी सुधारण्याची व देशासाठी सन्मान जिंकण्याची इच्छा हा संघ बाळगून आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search