Next
‘कुटुंबाच्या पाठिंब्यानेच महिला होतील स्वयंसिद्धा’
प्रेस रिलीज
Saturday, March 17, 2018 | 03:50 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘आपल्यातील क्षमतांचा उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे हे दिवस आहेत. महिलांमध्ये उद्यमशीलता आहे. उद्योग उभारण्याच्या दृष्टीने सरकार पायाभूत सुविधा आणि इतर उपक्रम राबवित आहे. अशावेळी कुटुंबियांचा महिलांना पाठिंबा मिळाला, तर त्या अधिक सक्षम आणि स्वयंसिद्धा बनतील,’ असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंतीन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानांतर्गत महिला दिनाच्या निमित्ताने स्वयंसिद्धा व युवा कलाकार आणि समाजभूषण पुरस्कारांचे वितरण अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष उमाकांत जोशी, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, दि. ना. जोशी, राजश्री देशपांडे व सुनेत्रा कुंभोजकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

शरद महादेव उपासनी यांना समाजभूषण पुरस्कार, श्रीमती सावित्रीबाई जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा स्वयंसिद्धा पुरस्कार औरंगाबाद येथील जयश्री जोशी यांना, तर श्रीमती मनोरमा कुंभोजकर स्मरणार्थ दिला जाणारा युवा महिला कलाकार पुरस्कार पंडिता शमा भाटे यांना प्रदान करण्यात आला. याचवेळी अक्षया बोरकर, सायली भिडे, मंजूश्री सोमण, मेधा राजपाठक व सुजाता टिळक या युवा उद्योजिकांना सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह, सन्मानपत्र व रोपटे असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

फडणवीस म्हणाल्या, ‘महाराष्ट्रातील स्टार्टअप हब म्हणून पुणे दुसऱ्या स्थानावर आहेत. पुण्यापासून सिलिकॉन व्हॅलीपर्यंत मराठी माणूस मेहनतीने पुढे गेलेला आहे; पण त्याचा गाजावाजा होत नाही. आपले काम बोलले पाहिजे. अशा पुरस्कारातून प्रोत्साहन मिळते. लघु व मध्यम स्वरूपाचे व्यवसाय निर्माण होण्याची आवश्यकता आहे. आज सरकार या सगळ्याला पाठिंबा देत आहे; तसेच कुटुंबाचा पाठिंबा मिळायला हवा. स्मार्ट सिटीमुळे अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचा फायदा घेतला पाहिजे. जिद्द आणि कठोर मेहनत करण्याची क्षमता असल्यास तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. अशा महिलांच्या यशोगाथा पुढे आणून सर्व स्तरातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.’

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘आज अनेक महिला स्वतःच्या पायावर उभे राहात आहेत. यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो असेही विधान आता केले जाते. तुमच्यातील विशेष गुणांचा वापर करून तुम्ही चांगले काम करण्याचा हा काळ आहे. आपल्या जन्माचे ध्येय ओळखले, तर क्षितीज ठेंगणे होऊ शकते. महिला दिनानिमित्त १५ दिवस हा  महोत्सव होतो; मात्र आज महिला रोजच चांगले काम करीत आहेत. सुपरवूमेन होण्यापेक्षा आरोग्यावर लक्ष द्यायला हवे. आजची स्त्री कर्तृत्वाने झाली आहे. अजून थोडी स्मार्ट व्हावी. आजचा काळ महिलांसाठी चांगला आहे. एकमेकींना मदत करून पुढे जाऊया. घर दोघांचे असते ही भावना स्त्री-पुरुषांनी जोपासली पाहिजे.’

आमदार कुलकर्णी म्हणाल्या, ‘महिला अनेक क्षेत्रात पुढे आहे. कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. त्यांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने युवा उपक्रमांतर्गत प्रयत्न केले आहेत. सरकार महिलांना उद्योजिका बनण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. एक खिडकी योजना, मेक इन इंडिया आणि इतर अनेक योजना सरकार आणते आहे. चौकटीच्या बाहेर येऊन आपण पुरुषप्रधान संस्कृतीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. आभूषणाच्या आड असलेली बंधने आपण झुगारून देऊन स्वयंसिद्ध बनले पाहिजे.’

विश्राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मंजूषा वैद्य यांनी केले. जयंत कुलकर्णी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link