Next
महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्य पुरस्कार
प्रेस रिलीज
Thursday, February 14, 2019 | 12:38 PM
15 0 0
Share this article:नवी दिल्ली : महाराष्ट्राने रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांनी स्वीकारला.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या केंद्रीय रेशीम बोर्डातर्फे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी केंद्रीय रेशीम बोर्डाचे अध्यक्ष हनुमंत रायप्पा, वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव राघवेंद्र सिंग, रेशीम बोर्डाचे सदस्य सचिव ओखंडीयार, एस. सी. पांडे, विशेष सचिव वित्त मंचावर उपस्थित होते.

भारत देश हा जगात रेशीम वस्त्रे आणि मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आजही जगात रेशीम वस्त्रांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. या बाबत बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या, ‘रेशीम धाग्यातच इतकी क्षमता आहे की, जागतिक बाजारपेठ आजही सहज उपलब्ध होईल. आता, तर महिलांना धागा काढण्यासाठी होणाऱ्या शारीरिक त्रासापासूनही वस्त्रोद्योग मंत्रालयाने मुक्तता दिली आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठ भारताची वाट बघत आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून आवश्यक असणारे सर्व सहकार्य पुरविले जाईल.’ या वेळी स्वराज यांनी त्यांचे रेशीम साडीविषयी व्यक्तिगत अनुभवही सांगितले.

‘टसर धागा काढण्यासाठी महिलांना त्यांच्या मांड्यांचा वापर करावा लागतो. २०२०पर्यंत या शारीरिक त्रासापासून भारतातील सर्व महिलांना मुक्तता मिळेल,’ अशी घोषणा ईराणी यांनी या वेळी केली. वस्त्रोद्योग मंत्रालयाने टसर धागा काढण्याचे तंत्र विकसित केले असून, प्रातिनिधिक स्वरूपात सहा राज्यांतील महिलांना या मशीनचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले. ही मशीन सर्वच टसर धागा काढणाऱ्या देशभरातील महिलांना उपलब्ध करून देण्यात असल्याचे ईराणी यांनी जाहीर केले.

महाराष्ट्रात रेशीम हा अपरंपरागत व्यवसाय असूनदेखील महाराष्ट्र रेशीम शेती उद्योगात अतुलनीय योगदान देत आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल ईराणी यांनी राज्याचे विशेष अभिनंदन केले.

अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, ‘रेशीम शेती उद्योगवाढीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्याचा परिपाक म्हणून आज हा पुरस्कार राज्याला मिळाला. राज्य शासनाने रेशीम उद्योगाला अधिक चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना आखल्या आहेत. यामध्ये रेशीम रथ यात्रा स्पर्धा घेऊन उत्कृष्ट रथाला पुरस्कार दिला जातो. रेशीम शेती उद्योगावर आधारित कॉलेंडर काढण्यात आले आहे. यामध्ये रेशीम शेती विषयी, हंगामा विषयी, नैसर्गिक वातावरणा विषयी संपूर्ण माहिती दिली आहे. यासह रेशीम शेती उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना विभागामार्फत अनुदान तसेच प्रशिक्षण दिले जाते. रेशीम शेती उद्योगाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठशी करार करून विद्यार्थ्यांना रेशीम शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे. यासह रेशीम शेती उद्योग टिकून राहावा आणि यातून अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दूरगामी धोरणही राज्य शासन आखत आहे.’

या प्रसंगी रेशीम संचालनालयाच्या संचालक बानायत म्हणाल्या, ‘रेशीम शेती उद्योगाला पूर्ण कृषी दर्जा मिळण्यासाठी समिती नेमली असून, यामध्ये तज्ञ, कृषी विद्यापीठातील कुलगुरू, अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत प्रस्ताव मंत्रालयाकडे मांडण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास इतर शेतकऱ्यांना मिळणारे सर्वच लाभ रेशीम शेतकऱ्यांनाही मिळतील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search