Next
फुटबॉल वर्ल्ड कपची ‘किक’
BOI
Thursday, June 14, 2018 | 04:58 PM
15 0 0
Share this story

वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गुगलने केलेले डूडल

फुटबॉल म्हणजे साऱ्या जगाला वेड लावणारा खेळ. अलीकडच्या काही वर्षांत भारतातही त्याची लोकप्रियता चांगलीच वाढलेली दिसून येत आहे. अशा या खेळाची एकविसावी विश्वचषक स्पर्धा आज, १४ जूनपासून रशियात सुरू झाली आहे. ही स्पर्धा म्हणजे फुटबॉलप्रेमींसाठी जणू चार वर्षांनी येणारी वारीच. १५ जुलैपर्यंतच्या महिन्याभराच्या काळात सुरू राहणाऱ्या या ‘फिफा वर्ल्ड कप’ स्पर्धेतील घडामोडी आणि त्यांच्या अनुषंगाने एकंदरच फुटबॉल या खेळाबद्दलच्या रंजक गोष्टींबद्दलचे ‘नाचू फुटबॉलचे रंगी’ हे सदर सुरू करत आहोत. त्याचा हा पहिला भाग...
....
जगात अनेक खेळ काही ठराविक देशांपुरते मर्यादित आहेत. म्हणजे बुद्धिबळात रशियन्स आघाडीवर आहेत. चीन आणि जपान जिम्नॅस्टिक्समध्ये आघाडीवर आहेत. बॉक्सिंगमध्ये क्युबा झळकतो, तर मॅरेथॉनमध्ये आफ्रिकन धावपटू. असा प्रत्येक खेळ त्या त्या खंडाचा होऊन बसलाय. म्हणजे क्रिकेटचंच उदाहरण घ्या. ‘साहेब’ जगभरात त्यांची सत्ता असलेल्या देशांमध्ये हा खेळ घेऊन गेला; पण आज हा खेळ त्या देशांपुरताच मर्यादित राहिला आहे. त्यातही आशिया खंडात या खेळाला सर्वाधिक लोकप्रियता आहे. म्हणजे बघा, इंग्लंडच्या शेजारी असलेल्या फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, स्पेन या देशांच्या क्रिकेट टीम असल्याचं कधी आपण ऐकलंय का?

जगात फुटबॉल हा एकमेव असा खेळ आहे, की ज्याला कोणतीही भौगोलिक, सामाजिक, आर्थिक सीमा नाही. कोणीही कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही जागी हा खेळ खेळू शकतो. किंबहुना त्यामुळेच जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ म्हणून या खेळाचा उल्लेख केला जातो. म्हणजे, अर्जेंटिनाच्या दक्षिण टोकापासून अगदी जपानच्या उत्तरेला असलेल्या एखाद्या छोट्याशा गावापर्यंतच्या विस्तृत प्रदेशात  फुटबॉल खेळला जातो. भारतात कोलकाता, गोवा आणि महाराष्ट्रात कोल्हापूरला फुटबॉल पंढरी म्हणून ओळखले जाते. एखाद्या व्यक्तीने कदाचित कधी हा खेळ खेळला नसेल; पण तो पाहिलेला नक्कीच असेल किंवा त्याला त्याची माहिती तरी नक्की असेलच. त्यातही समजा एखाद्याने हा खेळ कधीच पाहिला नसेल, तर त्याला एक मॅच पाहायला बसवलं, तर पहिल्या दहा मिनिटांतच त्याला हा खेळ समजून जाईल आणि एकदा या खेळाची ‘किक’ बसली, की त्या व्यक्तीला क्वचितच दुसऱ्या खेळात रस वाटेल.

मधल्या काळात क्रिकेटच्या लोकप्रियतेला कायम ठेवण्यासाठी त्यात खूप बदल करण्यात आले. टेस्ट क्रिकेटपासून टी-२०पर्यंतचा क्रिकेटचा प्रवास सारं काही सांगून जातो. हॉकीच्या नियमांमध्येही बरेच बदल करण्यात आले; पण हॉकीला त्याचा म्हणावा तितका फायदा झालेला दिसत नाही. फुटबॉलमध्ये मात्र आजवर कोणत्याही नियमांमध्ये फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. हा खेळ पूर्वी जसा होता तसाच आजही आहे. या खेळाच्या लोकप्रियतेत कधी घट झाली नाही. उलट खेळाचा प्रसार, प्रचार दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतात ज्या पद्धतीने गेल्या तीन वर्षांत फुटबॉल वाढू लागलाय, ते पाहिल्यावर याची कल्पना येते.

फुटबॉलच्या सध्याच्या स्थितीविषयी लिहिताना त्याचा इतिहास किंवा त्याची सुरुवात कशी झाली, याची इथं नोंद करावी वाटते. खेळाची सुरुवात खूपच रंजक आहे. या खेळाला कोणत्या एका ठिकाणापासून सुरुवात झाली, असे निश्चित सांगता येत नाही; पण ग्रीसमधल्या काही शिल्पकृतींमध्ये फुटबॉल खेळत असलेला एक छोटा मुलगा आणि व्यक्ती दिसते. चीनमध्ये कुजू नावाचा खेळ होता. त्याचे एक ऐतिहासिक पेंटिंग या खेळाच्या त्या वेळच्या अस्तित्वाची झलक देते. पुढे युरोपमध्ये या खेळाला अधिक लोकप्रियता मिळाली. युरोपमधील इंग्लंड, पोर्तुगाल, स्पेन या देशांच्या वसाहती लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडांमध्ये होत्या. त्यांच्या मार्गाने हा खेळ जगभरात पोहोचला; पण तरीही प्रत्येक खंडात या खेळाचं अस्तित्व वेगवेगळ्या रूपानं होतं, असं आजही मानलं जातं. त्या खेळाला नियमांच्या चौकटीत बसवण्याचं काम युरोपीय देशांनी केलं.

फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) या शिखर संस्थेची स्थापन १९०४मध्ये झाली आणि ‘फिफा’च्या वतीने पहिली वर्ल्ड कप स्पर्धा १९३०मध्ये दक्षिण अमेरिकेत उरुग्वे या देशात घेण्यात आली. १८ दिवस चाललेल्या या स्पर्धेत अवघे १३ संघ सहभागी होते. स्पर्धेचं विजेतेपद यजमानांनी पटकावलं. (त्यानंतर आजवर उरुग्वेला एकही विजेतेपद पटकावता आलेलं नाही.) या स्पर्धेनंतर जगातल्या सर्वांत लोकप्रिय फुटबॉल स्पर्धेची शृंखला सुरू झाली.‘फिफा’ने काही दिवसांपूर्वीच केलेल्या एका सर्व्हेनुसार १९५ देशांमध्ये सध्या २५ कोटी फुटबॉल खेळाडू आहेत. यावरूनच आपल्याला या खेळाच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. या फुटबॉलविश्वात सर्वांत मोठी असलेली म्हणजेच वर्ल्ड कप स्पर्धा आजपासून सुरू होतेय. यंदाची स्पर्धा एकविसावी असून, रशियातील ११ शहरांमध्ये ती होणार आहे. या वेळचा वर्ल्ड कप नवं काही तरी घेऊन येईल, अशी अपेक्षा आहे. कारण, सर्वच संघांमध्ये नव्या खेळाडूंचा भरणा आहे. ब्राझीलचा नेमार, अर्जेंटिनाचा मेस्सी, पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो, जर्मनीचा थॉमस म्युलर हे लोकप्रिय खेळाडू मैदानात असले, तरी या अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंच्याही पलीकडे यंदा नव्या दमाच्या खेळाडूंची फौजच वर्ल्ड कपमध्ये उतरणार आहे. त्यात इजिप्तचा मोहम्मद सालेह, जर्मनीचा टिमो वर्नर, अर्जेंटिनाचा पौलो द्याबाला, ब्राझीलचा गॅब्रिल जिजस, स्पेनचा इस्को हे खेळाडू वर्ल्ड कपवर आपली छाप पाडतील, अशी अपेक्षा आहे. या खेळाडूंमुळेच मैदानावर नवी स्ट्रॅटेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

यंदाच्या स्पर्धेत ३२ संघ आपला जोर लावणार आहेत. संघांची संख्या ३२ असली, तरी त्यात तुल्यबळ आणि विजेतेपदाचे दावेदार म्हटले जाणारे काही मोजकेच संघ आहेत. त्यात दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझीलनं सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावलंय. या देशाला फुटबॉल पंढरी म्हणून ओळखलं जातं. पाठोपाठ जर्मनीने चार वेळा (तीन वेळा पश्चिम जर्मनीने), तर इटली, फ्रान्स, इंग्लंड, अर्जेंटिना, स्पेन, उरुग्वे या देशांनीही विजेतेपदाची चव चाखली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आपल्याला कोणी नवा विजेता पाहायला मिळेल, की याच देशांपैकी एका संघाच्या हातात वर्ल्ड कप दिसणार, हे महिन्याभरात कळेलच.

भारताचे स्थान कोठे?
भारताने आजवर एकही फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा खेळलेली नाही. गेल्या काही वर्षांत मात्र भारतीय फुटबॉलने चांगली प्रगती केलीय. फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या खेळात व्यावसायिकता आणण्याचा प्रयत्न केलाय. भारतात झालेल्या १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेने खेळाच्या लोकप्रियतेत भर घातलीय. भारताच्या फुटबॉल संघाचा आलेखही गेल्या काही वर्षांत चढा दिसत आहे. कर्णधार सुनील छेत्रीच्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारताचे फिफा रँकिंग ९७ झाले आहे. सुनीलने १०२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ६४ गोल करण्याची कामगिरी करून, अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीला (६४ गोल, १२४ सामने) मागे टाकले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये सुनील सध्या दुसऱ्या स्थानवर पोहोचला आहे. पोर्तुगालचा रोनाल्डो १५० सामन्यांत ८१ गोल करून पहिल्या स्थानावर आहे. सुनीलच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे संघाचं रँकिंग सुधारलं असून, त्याचा भविष्यात भारताला फायदा होणार आहे. भारतीय फुटबॉल शौकीन आता भारताच्या वर्ल्ड कप प्रवेशाची आस बाळगू लागले आहेत.

- रविराज गायकवाड
ई-मेल : rg.raviraj@gmail.com

(लेखक कोल्हापूर येथील मुक्त पत्रकार असून, क्रीडा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link