Next
‘माझ्या कलाकृतींमध्ये कलात्मकताच’
BOI
Wednesday, January 03 | 05:41 PM
15 0 0
Share this story

रवी जाधव यांची मुलाखत घेताना मृणाल देव-कुलकर्णीपुणे : ‘मी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चा विद्यार्थी असल्यामुळे मी निर्माण करीत असलेल्या कलाकृतींमध्ये अश्लीलता नाही, तर कलात्मकताच असेल, याची खात्री बाळगावी. न्यूड मॉडेल हे कला क्षेत्रातील वास्तव असल्यामुळे या संज्ञेकडे साशंकतेने पाहणे हे त्या कलाकृतीवर अन्याय करणारे आहे. घराला असलेल्या उंबरठ्याप्रमाणे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या मनातही एक उंबरठा असतो, त्यामुळे ‘न्यूड’विषयीचे धुके लवकरच निवळेल,’ असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्यक्त केला. 

जागतिक मराठी अकादमीतर्फे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या १५व्या जागतिक संमेलनात तीन जानेवारी रोजी प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. वैयक्तिक आयुष्यापासून चित्रपटसृष्टीतील पदार्पण, विविध चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा अनुभव, त्यात येणारी आव्हाने आणि एकूणच कलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन या सगळ्याशी संबंधित विविध प्रश्नांना उत्तरे देताना रवी जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

रवी जाधव म्हणाले, ‘कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन किंवा निर्मिती करणे ही सोपी गोष्टी नसल्यामुळे त्या स्टेजपर्यंत जात असताना दिग्दर्शक-निर्मात्याला एक प्रकारची प्रगल्भता प्राप्त झालेली असते. ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना दिग्दर्शक-निर्मात्यांनी पूर्ण अभ्यास करून पुराव्यांनिशी काम केले पाहिजे. वादाला प्रतिवाद करण्याची तयारी ठेवून काम केले पाहिजे. दुसरे असे, की चित्रपटांमध्ये काय असावे किंवा काय नसावे, हे ठरविण्यासाठी आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड असताना संस्कृतिरक्षणाच्या नावाखाली प्रति सेन्सॉर बोर्ड निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा आहे.’
 
चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या बदलत्या भूमिकेबद्दल विचारले असता जाधव म्हणाले, ‘काही अपवाद वगळता पूर्वी चित्रपटात अभिनय करणे किंवा पार्श्वगायिका असणे इतकीच महिलांची भूमिका मर्यादित होती. आता मात्र चित्रपट निर्मितीमधील सगळ्या स्वरूपाच्या कामांमध्ये महिलांनी आघाडी घेतली असून, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. त्यामुळे महिलांच्या विचारांना अधिक चालना मिळत असून, त्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे.’
 
आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना जाधव म्हणाले, ‘माझे वडील गिरणी कामगार होते. त्यामुळे माझीही वाटचाल असेच काहीसे काम करण्याकडे होती; मात्र स्वतःविषयी विचार करताना मला काही तरी वेगळे सांगायचे आहे, हे लक्षात आले आणि त्यातून मी कला क्षेत्राकडे वळलो. माझ्या पालाकंपर्यंतच्या पिढीने स्वतःचे आयुष्य मुलांना उभे करण्यातच व्यतीत केले. त्यासाठी स्वतःच्या अनेक गोष्टी त्यांनी बाजूला ठेवल्या. त्यामुळे, ‘तुला संधी मिळते आहे, तर सतत नवीन काहीतरी करीत राहा,’ असे माझे वडील मला नेहमीच सांगायचे. सुरुवातीला मी जाहिरात क्षेत्रात काम करू लागलो. हळूहळू स्क्रिप्ट रायटिंगकडे वळलो. त्या वेळी कामाच्या निमित्ताने बराच काळ परदेशात असताना मला फार तुटलेपण जाणवायचे. तेव्हा मी अनेक मराठी पुस्तके बरोबर घेऊन जायचो. त्या वाचनातून मला आपली संस्कृती, कला, साहित्य याविषयी आकर्षण वाटायला लागले. मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्या माझ्या बॉसने माझे कौतुक केले आणि ‘तू प्रयत्न करीत राहा. तुझे प्रयोग फसले, तर परत माझ्याकडे ये. तुझी जागा मी रिकामी ठेवतो,’ असे सांगितले. जेव्हा मी नटरंग चित्रपट करायचा ठरवला, त्या वेळी ‘तमाशापट ही संकल्पना आता जुनी झाली आहे,’ असे अनेक जण मला म्हणाले; पण याही चित्रपटातून मला काहीतरी वेगळेच प्रेक्षकांना द्यायचे होते. आधुनिक पद्धतीने हा तत्कालीन विषय मांडताना मी खूप संशोधन केले. त्या वेळी कुटुंबीयांनी मला खूप सहकार्य केले. ‘बालगंधर्व’च्या निर्मितीच्या वेळी देखील खूप अभ्यास केला. मी मूळचा चिपळूणचा असल्यामुळे त्या ठिकाणी मी बऱ्याचदा नाट्यसंगीत ऐकले होते, पुढे डोंबिवलीत आल्यानंतर मात्र त्यापासून काहीसा दुरावलो होतो.’
 
‘बालक-पालक’ या वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाविषयी सांगताना ते म्हणाले, ‘माझा मुलगा १३-१४ वर्षांचा झाल्यानंतर मला अनेक प्रश्न विचारू लागला. लैंगिकतेविषयीच्या त्याच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मी इंटरनेटचा आधार शोधू लागलो. त्या वेळी आपल्याप्रमाणेच परदेशातही हा विषय पाहिजे तितक्या मोकळेपणाने हाताळला जात नसल्याचे लक्षात आले. तेव्हा या विषयावर चित्रपट तयार करण्याचे निश्चित केले आणि मनोरंजनातून शिक्षणाचा मार्ग मी अवलंबला. हा प्रत्येक चित्रपट तयार करताना मला अनेक अडचणी आल्या; पण त्यांच्यावर मात करून मी पुढे गेलो आणि त्यातूनच घडतही गेलो. या अडचणीच तुम्हाला परिपूर्ण बनविण्यासाठी मदत करीत असतात, असे वाटते. तुम्ही कोणाला आणि काय दाखवू इच्छिता, यावर तुमचे यश अवलंबून असते.’
 
‘माझ्या वडिलांच्या सल्ल्याप्रमाणे मी सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आता करीत असलेले काम मी फार तर २०२२पर्यंत करीन आणि त्यानंतर नवीन विषयात स्वतःला वाहून घेईन,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या पुढील आयुष्यातील नियोजनाबद्दल सांगितले. 

(रवी जाधव यांच्या मुलाखतीच्या काही भागाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link