Next
‘महामानवाची भूमिका साकारायला मिळणे माझ्यासाठी दुग्धशर्करा योग’
प्रेस रिलीज
Thursday, April 25, 2019 | 01:08 PM
15 0 0
Share this article:

१८ मे म्हणजेच बुद्धपौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत अभिनेता सागर देशमुख बाबासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत आहे. ‘स्टार प्रवाह’वर सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे. सागरच्या या नव्या भूमिकेविषयी त्याच्याशी साधलेला हा खास संवाद...
----------------------------------------------------------------------------------

* पु. ल. देशपांडे साकारल्यानंतर आता तू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहेस, तुझ्या या भूमिकेविषयी काय सांगशील?
- खरतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावर मालिका येणे आणि त्यात महामानवाची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. दशमी क्रिएशन्सकडून जेव्हा यासाठी मला विचारणा करण्यात आली तेव्हा मी लगेच होकार दिला. ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी या भूमिकेसाठी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चरित्रात्मक भूमिका साकारायला मिळणार आहे याचा आनंद तर आहेच; पण आंबेडकर साकारणे ही खूप मोठी जबाबदारी आहे असे मला वाटते. या भूमिकेच्या निमित्ताने मी अभिनेता म्हणून नक्कीच श्रीमंत होईन.

* या भूमिकेसाठी तू काय विशेष तयारी केली आहेस?
- मी आयएलएस लॉ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. भारतीय संविधानाचा तेव्हा केलेला अभ्यास आता ही भूमिका साकारताना माझ्या कामी येतोय. ‘दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया’ असा एक पेपर लॉ शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यावा लागतो. भारताची राज्यघटना लिहिणे किती कठीण आहे हे पेपर लिहिताना नेहमी वाटायचे. राज्यघटनेचे शिल्पकार असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक अशा सर्वच स्तरांवर बाबासाहेबांचे विचार आणि कर्तृत्व खूप व्यापक आहे. महामानवाचे हे कार्य समजून घेण्यासाठी मी बरीच पुस्तके वाचत आहे. धनंजय कीर यांनी लिहिलेले बाबासाहेबांचे चरित्रसुद्धा वाचले. सुखदेव थोरात यांनी बाबासाहेबांवर दिलेली व्याख्याने पाहिली. सेटवरही फावल्या वेळात मी या पुस्तकांचे वाचन करत असतो. माझ्यातल्या अभिनेत्याच्या वाढीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे असे मला वाटते.

* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातली अशी कोणती गोष्ट आहे ज्याचा तुझ्यावर सर्वाधिक प्रभाव पडला?
- आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेणे वाटते तितके सोपे काम नाही. जातीव्यवस्थेचे उच्चाटन करून जगाला समानतेचा संदेश देण्याचा आंबेडकरांचा विचार माझ्या मनात खोलवर रुजलाय. यासोबतच आंबेडकरांची वाचनाची आवड मी आत्मसात करतोय.
 
* आंबेडकरांच्या लूकसाठी कशी मेहनत घ्यावी लागतेय?
- डॉ. आंबेडकरांचे ‘चित्रमय स्वगत’ हे पुस्तक उपलब्ध आहे. या पुस्तकातील फोटोंचा खूप फायदा होतोय. यु-ट्यूबवर आंबेडकरांच्या संदर्भातील लेक्चर्स उपलब्ध आहेत ती सुद्धा आम्ही पाहत असतो. सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विशाल पाठारे या लूकसाठी विशेष मेहनत घेत आहेत.
 
* या मालिकेचे वेगळेपण काय सांगशील?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातले एक महान पर्व आहे. इतिहासाचे हे सोनेरी पान पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जाणार आहे. आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तीदायी ठरते. महामानवाचे हेच विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने या मालिकेची निर्मिती केली आहे. डॉ. आंबेडकरांचे बालपण ते महामानव हा प्रवास या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search