Next
स्वप्नील जपणार ‘लिंबा राम’चा वारसा..
BOI
Friday, June 15, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

स्वप्नील ढमढेरे

तिरंदाजीत भारतीय खेळाडूंची पीछेहाट, ही गोष्ट आता लवकरच इतिहास ठरेल अशी कामगिरी नवोदित खेळाडू करत आहेत. महिला गटात जे वर्चस्व मेघा अगरवाल गाजवत आहे, तेच वर्चस्व पुरुष गटात स्वप्नील ढमढेरे गाजवत आहे. ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या तिरंदाज स्वप्नील ढमढेरेबद्दल...
...............
तळेगाव ढमढेरेसारख्या ग्रामीण भागातून पुण्यात आलेला स्वप्नील ढमढेरे व्यावसायिक तिरंदाजीचा सराव करता करता कधी आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनला, हे त्यालाही समजले नाही. गावात असताना गोट्या खेळणे, गलोलीने झाडावरची फळे पाडणे ही त्याच्या तिरंदाजीची पहिली पायरी होती, असे आता गंमतीने म्हणावे लागेल. कारण हीच त्याची लहाणपणीची सवय आज त्याची कारकीर्द बनली आहे. मेघा अगरवाल ज्या अकादमीत सराव करते, त्याच अकादमीत म्हणजे रणजित चामले सरांकडे स्वप्नीलही सराव करतो. 

शालेय शिक्षण तळेगावातच पूर्ण केल्यानंतर त्याच्या महाविद्यालयातील शिक्षकांनी त्याचा चामले सरांशी परिचय करून दिला आणि त्याने त्यांच्या अकादमीत सराव सुरू केला. रोज तळेगाव ते पुणे असा प्रवास, सराव आणि शिक्षण यांनी खरे तर तो मेटाकुटीला आला आणि अखेर त्याने पुण्यातच राहण्याचा निर्णय घेतला. सरावात खंड पडू न देता मार्गक्रमण करत असताना त्याने कायद्याची पदवी घेऊन शिक्षणातील आपले कसबही सिद्ध केले आहे. त्याच्या महाविद्यालयीन, विद्यापीठ, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेतील यशाची दखल घेत राज्य सरकारने त्याला शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले. कारकिर्दीतील पहिल्याच स्पर्धेत जेव्हा तो अपयशी ठरला, तेव्हा चामले सरांनी त्याला प्रोत्साहित केले. त्यानंतर निराशा झटकून त्याने पुन्हा एकदा कसून सराव सुरू केला आणि त्यानंतरच्या राज्यस्तरीय पात्रता स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावून सगळी कसर भरून काढली. 

पहिली स्पर्धा गमावल्यावर, आपले कुटुंबीय आपल्यासाठी खस्ता खात आहेत, तसेच आपला पुण्यात राहण्याचा खर्चही भागवण्यासाठी कसरत होत आहे, असे अनेक विचार त्याच्या मनात येत होते, अनेक प्रश्नही समोर होते; मात्र दोन सुवर्णपदके मिळाल्यानंतर ही चिंता थोडी कमी झाली. 

या दोन सुवर्णपदकांनी त्याच्या कारकिर्दीला कलाटणीच मिळाली आणि या खेळात जागतिक वर्चस्व प्रस्थापित करायचे, या ध्येयाने तो पछाडला गेला. दोन वेळा विद्यापीठ स्तरावरील जागतिक स्पर्धेतही पदके मिळवली आणि मग मात्र त्याने मागे वळून पाहिलेच नाही. इतकेच नव्हे, तर तीन वेळा विश्वकरंडक स्पर्धेत त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले. राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तीन वर्षे तो वैयक्तिक विजेता ठरला. सांघिक प्रकारात तर तो सलग सात वर्षे केवळ विजेताच ठरला असे नाही, तर विजेतेपदाचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. गेली सहा वर्षे तो महाराष्ट्राच्या तिरंदाजी संघाचा कर्णधार आहे.

लिंबा रामस्वप्नीलसमोर आदर्श आहे तो माजी ऑलिंपियन लिंबा राम याचा. १९९२मध्ये लिंबा रामने आशियाई तिरंदाजी स्पर्धेत जागतिक विक्रम साकारला होता. त्याने तीन वेळा ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग घेतला होता; मात्र पदक मिळविण्यात त्याला यश आले नाही. असे असले तरी लिंबा रामची मेहनत आणि जिद्द आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे स्वप्नील सांगतो. लिंबा रामसोबत आपलेही स्वप्न पूर्ण करण्याचा स्वप्नीलचा निर्धार आहे. राज्यस्तरीय पातळीवर त्याने आजवर वीस पदकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय स्तरावर त्याने विक्रमासह पाच पदकांची नोंद केली आहे. ३६व्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत मिश्र सांघिक गटात स्वप्नीलच्याच कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने यश मिळवले होते. 

‘शाळेत असताना दगडाने किंवा गलोलीने फळे पाडण्याची किंवा गोट्या खेळण्याची सवय आपल्याला कुठे घेऊन जाणार याची जराही कल्पना नव्हती,’ असे सांगताना स्वप्नील म्हणतो, ‘मला तिरंदाजीची आवड निर्माण होऊ लागली आणि हा खेळ आता माझ्यासाठी पॅशन बनला आहे. चामले सरांचे खूपच मोलाचे मार्गदर्शन मिळते. त्यांच्या अकादमीत केवळ प्रशिक्षणावर भर नसतो, तर बोटांचे, मनगटाचे, हात व खांद्याचे व्यायाम करण्यावरही भर असतो. धनुष्य पेलताना अपाल्याकडून एकही चूक होणार नाही, यासाठी असा सराव अत्यंत आवश्यक असतो. केवळ इतकेच नाही तर वाऱ्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने खेळण्याचाही सराव चामले सर करून घेतात. पुण्यात ठीक आहे, पण इतर अनेक मैदानांवर वाऱ्याच्या विरुद्ध प्रवाहाचा अडथळा होतो. तो सहज पार करण्यासाठी असा सराव  महत्त्वाचा ठरतो.’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही स्पर्धेत सहभागी होताना केवळ वाऱ्याशी जुळवून घेणे इतकेच आव्हान नसते, तर डोळ्यांचीही काळजी घ्यावी लागते शिवाय शारीरिक तंदुरुस्तीही तितकीच महत्त्वाची असते. हे सगळे व्यवस्थित जमले, तरच स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता वाढते.

आता स्वप्नील एक वकील म्हणून कार्यरत असला, तरी त्याची खरी ओळख तिरंदाज म्हणूनच आहे. येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या चीनमधील आशियाई स्पर्धेतील यश आणि पदक सर्वांत महत्त्वाचे आहे. या स्पर्धेद्वारे त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे खूप मोठे व्यासपीठ मिळेल आणि ऑलिंपिक पात्रता फेरीत खेळण्याची संधीही मिळणार आहे. बघू या देशाला येत्या काळात स्वप्नीलच्या रूपाने ऑलिंपिक पदक विजेता खेळाडू गवसणार का ते....

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. 'क्रीडारत्ने' सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link