Next
‘वेदर रेडी’ आणि ‘क्लायमेट स्मार्ट’ होऊ या...
मानसी मगरे
Friday, March 23, 2018 | 08:30 AM
15 0 0
Share this article:


आज (२३ मार्च) जागतिक हवामानशास्त्र दिन (वर्ल्ड मेटिऑरॉलॉजिकल डे) आहे. त्या निमित्ताने, पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी (आयआयटीएम) या संस्थेतून निवृत्त झालेले शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांची मानसी मगरे यांनी घेतलेली ही मुलाखत...
............
- हवामानशास्त्र दिनाची यंदाची संकल्पना ‘वेदर रेडी, क्लायमेट स्मार्ट’ अशी आहे... त्याचा नेमका अर्थ काय.?
- या संकल्पनेत ‘वेदर’ आणि ‘क्लायमेट’ अशा दोन्हींचा उल्लेख आहे. आधी वेदर आणि क्लायमेट यांच्यातला फरक समजून घेतला पाहिजे. वेदर म्हणजे तत्कालीन  हवामानाची परिस्थिती. त्यामध्ये त्या दिवसाचे तापमान, हवामानाचा दाब आदींचे मोजमाप असते. क्लायमेट म्हणजे एका ठिकाणची बऱ्याच दिवसांची हवामानस्थिती. पृथ्वीवर राहणाऱ्या माणसाने त्या त्या ठिकाणच्या हवामानानुसार स्वतःला तयार करून घेतले आहे. म्हणजे त्या त्या ठिकाणच्या वातावरणानुसार तो स्वतः रुळताना दिसतो. वातावरणातील सततच्या बदलांमुळे हवेतील कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणात वाढ होत आहे. अगदी पावसाच्या बाबतीतही हे दिसते. पूर्वी त्या त्या काळात सगळे ऋतू व्यवस्थित होत असत. आजकाल पाऊसही व्यवस्थित पडताना दिसत नाही. हे जे बदल दिसतात, ते थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी तयार असणे म्हणजेच ‘वेदर रेडी’ ही संकल्पना आहे. तसेच या सततच्या हवामानबदलाची अचूक माहिती मिळवणे आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या, नैसर्गिक आपत्ती यांना नियोजितरीत्या तोंड देणे म्हणजे ‘क्लायमेट स्मार्ट’ ही संकल्पना आहे. थोडक्यात काय, तर बदलते हवामान आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व पातळीवरील समस्या या दृष्टीने नियोजनपूर्वक तयार असणे याला धरून ही ‘वेदर रेडी, क्लायमेट स्मार्ट’ ही थीम यंदाच्या जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने ठेवण्यात आली आहे.  

- हवामानाचे अंदाज हमखास चुकतात, अशी भावना लोकांमध्ये असते... मात्र भारत हा द्वीपकल्पीय प्रदेश असल्याने हवामानावर परिणाम करणारे अनेक घटक असल्याने अंदाज वर्तवण्यात काही मर्यादा असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. याबद्दल काय सांगाल? अंदाजांची अचूकता वाढविण्यासाठी काय केले जाते?
- हवामानाच्या अंदाजाबाबतीत सांगितले जाणारे परदेशातील काही अनुभव असे असतात, की ते लोक सकाळी आधी त्या दिवसाच्या हवामानाचा अंदाज पाहतात आणि त्यानुसार तयारीने घराबाहेर पडतात. संध्याकाळी चार वाजता पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला गेला असेल, तर तो तसा पडतोच. इतकी अचूकता अंदाजांमध्ये असते. या तुलनेत भारताचा विचार केला, तर आपल्याकडील हवामानाची प्रक्रिया वेगळी आहे. आपल्याकडील ढगनिर्मितीची क्रिया ही उष्णता पसरवण्याच्या एका प्रक्रियेने (convection) होते. म्हणजेच जमिनीवरील हवा तापते, ती वर जाते मग तिथे ढगांची निर्मिती होते वगैरे.. अशा वेळी नक्की कुठे पाऊस पडेल हे सांगता येत नाही. तरीही विशेषतः पावसाळ्यात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यानंतर बऱ्यापैकी अचूक अंदाज देता येतो. या कारणाने इतर वेळी पावसाचा अचूक अंदाज फारसा बांधता येत नाही. याचा अर्थ युरोपीय देशांत किंवा बाहेरील देशात यासाठी जे तंत्रज्ञान वापरले जाते, ते आपण वापरत नाही, असा नक्कीच नाही. सर्व देशांनी मिळून विकसित केलेले तंत्रज्ञानही आहे, जे अर्थात आपणही वापरतो. परंतु सततच्या बदलत्या हवामानामुळे त्याच्या अंदाजाबाबतची अचूकता आपण साध्य करू शकत नाही. ही समस्या असूनही बऱ्याचदा भारताने वर्तवलेले अंदाज बरोबरही ठरले आहेत. ‘सायक्लोन’च्या वेळचे उदाहरण सांगता येईल. इतर देशांनी ते ‘सुपर सायक्लोन’ होणार, असा अंदाज वर्तवला असताना, भारताने मात्र ते होणार नसल्याचा अंदाज त्या वेळी वर्तवला होता. आणि आपला अंदाज तेव्हा खरा ठरला होता. दुसरा मुद्दा असा, की अचूक हवामानाचा अचूक अंदाज तेव्हाच मिळू शकतो, जेव्हा आपल्याकडे अचूक नोंदी असतील. खरे तर स्वयंचलित हवामान केंद्रे, तेथील आधुनिक तंत्रज्ञान, सॅटेलाइट, रडार या सगळ्या सुविधा उपलब्ध असताना नोंदी अचूक मिळवणे तसे अवघड नाही. परंतु समुद्रालगतचा भाग असा असतो, की त्या ठिकाणी कोणत्याच नोंदी मिळत नाहीत. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या ठिकाणी तर आपण आपली स्वतःची निरीक्षण केंद्रे उभी केली आहेत. परंतु पुन्हा तोच मुद्दा... बदलत्या स्थितीमुळे अचूकता साधली जात नाही. यावर अजूनही काम सुरू आहे आणि हवामान अंदाजातील अचूकता साधली जाण्यावर नवनवीन प्रयोग होत आहेत.  

- गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, गारपीट, उन्हाच्या तीव्र झळा यांचे प्रमाण वाढल्याचे अनुभवायला मिळते आहे. हा खरोखरच हवामानबदलाचा परिणाम आहे, असे म्हणता येईल का?
- पृथ्वीचे तपमान आणि हवामानबदल या बाबी लक्षात घेता त्यावरील अभ्यासानुसार मागील १०० वर्षांपासून पृथ्वीचे तापमान वाढलेले आहे. परंतु याचा दृश्य परिणाम आपल्याला गेल्या ३०-३५ वर्षांपासून म्हणजेच साधारण १९८०पासून दिसू लागला आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारे दिसत आहे. तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळणे, समुद्राची पातळी वाढणे यांचा त्यात समावेश आहे. तापमान वाढल्याने समुद्राच्या पाण्याची वाफ जास्त होते, त्यामुळे पाण्याचे वाफेत रूपांतर होणे, वाफेचे ढगात रूपांतर होणे आणि मग त्यापासून पाऊस पडणे हे जे जलचक्र आहे, ते तीव्र झाले आहे. यामुळे पावसाचे एकूण प्रमाण सारखे असले, तरी त्याची तीव्रता वाढली आहे. याचा परिणाम संपूर्ण चक्रावर झाला असल्याचे दिसत आहे. उत्तरेकडील थंड हवा पूर्वी ३० अंश अक्षवृत्तापर्यंतच येत असे, ती आता आपल्याकडेही येत आहे. त्यामुळे आपल्याकडील तापमान कधी कधी एकदम खाली गेलेले दिसते. यामुळे मग खूप थंडी आणि खूप उष्णता या दोन्हींचे प्रमाण वाढताना दिसते आहे. याबरोबरच गारांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. हा निश्चितच हवामानबदलाचा परिणाम आहे, असे म्हणता येईल. 

डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी- गेल्या फेब्रुवारी महिन्यात या गारपिटीसंदर्भात शक्यता वर्तवण्यात आली होती आणि याचा अंदाज किमान दोन दिवस आधी बांधता येणे शक्य होईल, असेही तुम्ही म्हटले होते. त्याबद्दल काय सांगाल?
- या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज बांधण्यासाठी केवळ तंत्रज्ञान किंवा साधनांचा उपयोग न करता, हवामानाच्या इतरही काही महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या तत्त्वावरच अभ्यास करून मी या वर्षी सात फेब्रुवारीला एक अंदाज दिला होता आणि तो खरा ठरला. मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये ही गारपीट झाली होती. 

- हवामानबदलामुळे २०५०पर्यंत विकसनशील देशांतील काही लाख लोकांना स्थलांतर करावे लागणार असल्याचा एक अहवाल अलीकडेच प्रकाशित झाला आहे
- हो. असे होऊ शकते. खरे तर आपल्याकडे याआधीही ही परिस्थिती ओढवली गेलेली आहे. आजही मराठवाडा, विदर्भ यांसारख्या काही भागांतून लोक स्थलांतरित होताना दिसतात. शेतीत होणाऱ्या नुकसानामुळे उपजीविकेचे दुसरे साधन शोधणे, ही त्यांच्यासमोरील समस्या असते. आज ही समस्या वाढतानाच दिसत आहे. पावसाळ्यात पाऊस कमी पडतो आणि मग त्यानंतर दुष्काळ पडतो. आजकाल दर तीनेक वर्षांनी ही समस्या उद्भवत असल्याचे चित्र आहे. यामुळे ही स्थलांतरे मोठ्या प्रमाणात होतात. २०५०पर्यंत काही भागांमध्ये अशी भीषण अवस्था निर्माण होऊ शकते, की सध्या काही वर्षांनी एकदा पडणारा दुष्काळ हा तेव्हा सलग काही काळ पडू शकतो. तशी शक्यता वर्तवली गेली आहे. तेव्हा आज होणारी स्थलांतरे आणखी मोठ्या प्रमाणात होऊ शकतील, करावी लागतील. याआधी सुमारे दोन-चारशे वर्षांपूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली होती, अशा नोंदी आहेत. ‘दुर्गादेवी’चा दुष्काळ म्हणून एक घटना प्रसिद्ध आहे. हे दुष्काळ १०-१२ वर्षांचे असे सलग पडले होते. तेव्हाही मोठ्या प्रमाणात स्थलांतरे झाली होती, अशी नोंद सापडते. 

- हवामानबदलाच्या या समस्येची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच जात आहे... त्याबद्दल थोडं सांगा...
- जागतिकीकरण आणि औद्योगिकीकरण यात सतत होणारी वाढ हे एक महत्त्वाचे कारण म्हणता येईल. यामुळे कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण झपाट्याने आणि खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. हवेतील हा वायू नष्ट होऊ शकत नाही. या वायूमुळे तपमान वाढत आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून, काही दिवसांत तापमान पुन्हा कमी होईल, असे काही तज्ज्ञांचे सुरुवातीला मत होते. परंतु १०० वर्षांच्या काळाच्या निरीक्षणातून दिवसेंदिवस हे तापमान केवळ वाढतच गेले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली गेली. त्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ‘इंटरगव्हर्न्मेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज’ची (आयपीसीसी) स्थापना करण्यात आली. त्यामार्फत आता प्रयत्न होत आहेत. त्यात विशेषतः कार्बनचे उत्सर्जन कमी कसे करता येईल, यावर विशेष भर दिला जात आहे. यातही विकसित राष्ट्रांच्या तुलनेत विकसनशील राष्ट्रांमध्ये कार्बनच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे विकसित राष्ट्रांवर विशेष काही बंधने घालण्यात आली आहेत. 

- हवामानबदलाच्या समस्येला तोंड देण्यासाठी, शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त अचूक अंदाज वेळेत पोहोचवण्यासाठी सरकार किंवा सरकारी यंत्रणेने काय केले पाहिजे, असे वाटते?
- हवामान खात्याकडे कृषी विभाग नियंत्रण आहे. हवामान खाते आणि कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नांनी दर आठवड्याला हवामान आधारित कृषी सल्ला देण्याचा उपक्रम सुरू आहे. ही माहिती त्यांच्या वेबसाइटवरून प्रकाशित केली जाते. यामध्ये कित्येक लाख शेतकऱ्यांनी नोंदणीही केली आहे. त्यांना एसएमएसद्वारे ही माहिती दिलीही जाते. परंतु ही माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. टीव्ही, रेडिओ या माध्यमांचा उपयोग केला, तरीही पूर्णपणे ती माहिती पोहोचवता येणार नाही. यासाठी काही तरी थेट यंत्रणा केली पाहिजे, ज्यामुळे आगामी आठवड्याभराचा हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्याला घेता येईल आणि एखादी नैसर्गिक आपत्ती येणार असेल, तर त्याचा अंदाज त्याला मिळेल. होणारे नुकसानही त्याला कमी करता येऊ शकेल.    

- हवामानबदलाच्या समस्येची तीव्रता आणखी वाढू नये, यासाठी सामान्य नागरिक काय करू शकतात?
- कार्बनचे उत्सर्जन कमी करणे, हा महत्त्वाचा उपाय सामान्य नागरिक करू शकतो. पेट्रोल, डिझेल यांचा वापर कमी करणे, विजेचा वापर कमी करणे, असे उपाय सामान्य नागरिकाच्या हातातले आहेत. एक युनिट वीज निर्माण करण्यासाठी कितीतरी टन कोळसा जाळावा लागतो. विजेची बचत करून आपण याला हातभार लावू शकतो. इतरही अनेक बाबी आहेत, ज्या पर्यावरणाशी निगडित आहेत, ज्यामधून आपण हवामान संतुलित ठेवण्यास हातभार लावू शकतो. 

(डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search