Next
कडुनिंब लागवडीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
मुख्यमंत्र्यांनी दिली विद्यार्थ्यांना महासंकल्पाची शपथ
प्रेस रिलीज
Monday, June 24, 2019 | 03:54 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ हे अभियान महत्त्वपूर्ण असून, राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात केलेल्या कडुनिंब लागवडीच्या  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळे देशाचे नाव जगाच्या नकाशावर गेले असून, यात सहभागी झालेले सर्वजण इतिहास बनले आहेत,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

महाराष्ट्र शासनाचा ‘एनएसएस’ कक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ अभियानाच्या महासंकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, खासदार संजय काकडे, आमदार दिलीप कांबळे, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष राजेश पांडे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.  

मुख्यमंत्री म्हणाले, ‘पंढरपूरची वारी हा जगाच्या इतिहासात अभूतपूर्व उत्सव आहे. या वारीला ७०० वर्षांची परंपरा आहे. कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी मोठ्या भक्ती-भावाने या वारीत दर वर्षी सहभागी होतात. त्यांना कोणत्याही गोष्टीची आस नसते, त्यांना केवळ पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता ते या वारीत सहभागी होतात. वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची सेवा करून ही वारी हरीत आणि निर्मल करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे हे अभियान निश्चितच महत्त्वाची भूमिका पार पाडेल.’

एकाच वेळी मोठ्या संख्येने कडुनिंबाची रोपे लावण्याचा आणि त्याचे संवर्धन करण्याचा रेकॉर्ड गिनिज बुकमध्ये नोंद होत असल्याबद्दल सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर स्वत:चे रेकॉर्ड स्वत:च मोडत होता, त्याच प्रमाणे आजचा तुमचा रेकॉर्ड तुम्हीच मोडण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ वारी-निर्मल वारी यशस्वी होणार आहे. आपल्या देशातील अनेक विषयांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. आजचा कडुनिंबाच्या रोपांचे वाटप करण्याचा हा रेकॉर्ड खूप महत्त्वाचा आहे. पंढरपूर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना शासनातर्फे पाच लाख रेनकोटचे वाटप करण्यात येणार असून, वारकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.’ 

या वेळी फडणवीस यांनी या अभियानात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना महासंकल्प अभियानाची शपथ दिली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी समन्वयाची भूमिका पार पाडणाऱ्या मिलिंद वार्लेकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश पांडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य संजय चाकणे यांनी केले. ‘एनएसएस’चे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search