साखरपुड्यानंतर त्या मुलाचं वागणं एकदमच बदललं. तो पूर्वीसारखा तिच्याशी बोलत नव्हता. तिचे फोन उचलत नव्हता. फोन उचललाच तर काही ना काही कारणं देऊन घाईघाईने फोन ठेवून द्यायचा. असे बरेच दिवस गेले. शाल्मलीला ही गोष्ट खटकत होती; पण यातलं काही कोणाशीही न बोलता, तिने त्याला भेटायला जायचा निर्णय घेतला आणि दिवस ठरवून भेटायला गेली... ‘मनी मानसी’ या सदरात या वेळी पाहू या नात्यातील तणावांबद्दल...
................
शाल्मली २५ वर्षांची एक शांत, मनमिळाऊ, चुणचुणीत मुलगी. माझ्या चांगली परिचयाची. एमएस्सी पूर्ण करून एका चांगल्या कंपनीत, चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत होती. घरची परिस्थितीही चांगली होती. लहानपणापासून एकत्र कुटुंबात वाढल्याने सुसंस्कारी आणि साऱ्यांचा विचार करून वागणारी अशी.

मागील वर्षापासूनच घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली आणि एक स्थळ पसंत पडलं म्हणून संपर्क साधून मुलाकडच्या लोकांची भेट घेतली. पहिल्या भेटीत एकूण सगळं चांगलं वाटलं. शाल्मलीला मुलगा आवडला, म्हणून दोघांनी पुन्हा भेटायचं ठरवलं. शाल्मली मुळची कोल्हापूरची. भेटीचा दिवस ठरल्यावर ती त्याला भेटायला पुण्याला आली. दोघं एकमेकांशी बोलले. ती घरी परतली आणि तिने होकार दिला. त्यानेही होकार कळवला. दोन्हीही घरं आनंदली आणि अर्थातच पुढची बोलणीही सुरू झाली. एक महिन्याने हसत-खेळत दिमाखात साखरपुडा पार पडला, पण...

साखरपुड्यानंतर त्या मुलाचं वागणं एकदमंच बदललं. तो पूर्वीसारखा तिच्याशी बोलत नव्हता. तिचे फोन उचलत नव्हता. फोन उचललाच तर काही ना काही कारणं देऊन घाई-घाईने फोन ठेवून द्यायचा. असे बरेच दिवस गेले. शाल्मलीला ही गोष्ट खटकत होती; पण यातलं काही कोणाशीही न बोलता, तिने त्याला भेटायला जायचा निर्णय घेतला आणि दिवस ठरवून भेटायला गेली. भेटल्यावरही तो तसाच तुटक-तुटक वागला, बोलला. शाल्मलीला काहीच कळेना. या सगळ्यामागील कारण विचारायची तिची हिंमत होईना, त्यामुळे ती आणखी जास्त अस्वस्थ झाली. ती परत निघाली, तर तो तिला सोडायलादेखील आला नाही. तिनेच मग पोहोचल्यावर त्याला फोन केला. तेव्हा थोडंसं बोलून त्याने फोन ठेवून दिला.

शाल्मलीची अस्वस्थता अधिकच वाढली. कोणाला सांगताही येईना. तिने त्याला पुन्हा भेटायचं आणि या वेळेस मात्र उघडपणे यामागचं कारण विचारायचं असं ठरवलं. त्यानुसार ती गेली आणि यावेळी मात्र तिने त्याच्या वागण्यातील बदलामागचं कारण विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं, की त्याचं एका मुलीवर प्रेम आहे, परंतु ती मुलगी त्याच्या घरच्यांना पसंत नाही. त्यांच्या दबावामुळे त्याने या लग्नाला होकार दिला आहे. त्यांचं लग्न झालं तरी तो त्या मुलीला विसरू शकणार नाही आणि सोडूही शकणार नाही, असंही तो म्हणाला. ‘माझं तुझ्यावर प्रेम नाही आणि मी तुला कोणतंही सुख-समाधान देऊ शकणार नाही’ हे त्याने म्हटल्यावर शाल्मलीने हात-पायच गळाले.

आपली फसवणूक झाली आहे, हे कळल्यावर ती हादरून गेली. काय करावं..? कोणाशी बोलावं.? हे तिला कळेना. तशाच अवस्थेत तिने मला कसाबसा फोन केला. मी तिला घरी घेऊन आले. घरी आल्यावर काहीही न बोलता ती फक्त रडत राहिली. ती शांत झाल्यावर तिला बोलायला सांगितलं. ती रडत रडतच बोलत राहिली. घडलेलं सारं तिने सांगितलं. हे माझ्याच बाबतीत का.? माझं काय चुकलं.? त्यांनी हे आधी का सांगितलं नाही..? आजी-आजोबांना हे कळल्यावर काही होणार नाही ना.? अशा एक ना अनेक प्रश्नांनी तिच्या मनात गोंधळ उडवून दिला होता. ती पुरती गांगरून गेली होती.

याबद्दल तिच्याशी प्राथमिक बोलणी करून तिला शांत केलं. पुढील संकटांची, अडचणींची तिला जाणीव करून दिली थोड्या सकारात्मक आणि धाडस देणाऱ्या काही गोष्टी समजावून तिला या घटनेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. यानंतर ती सावरली आणि तिने फोन करून आई-वडिलांना बोलावून घेतलं. त्यांना घडलेला सारा प्रसंग सांगितला. हे एकूण तेही आधी गडबडले; पण नंतर त्यांनी स्वतःला आणि शाल्मलीलाही सावरलं. धीर दिला आणि लगेच मुलाच्या घरी जाऊन सगळं सांगितलं. नंतर घरी गेल्यावर घरातल्या सर्वांनाही त्यांनी हे सगळं विश्वासात घेऊन सांगितलं.

हे सारं झालं, तरी याचा प्रभाव तिच्यावर होताच. यातून बाहेर पडणं तिला अवघड जात होतं. त्यामुळे ती नियमित समुपदेशनाला येत होती. तिच्यापुढे असलेलं संपूर्ण आयुष्य, त्याची होऊ शकणारी नव्याने सुरुवात. आयुष्यातील चांगल्या गोष्टी, या गोष्टी लग्नाआधी समजल्या याचे महत्त्व अशा कैक सकारात्मक बाबी तिला यातून बाहेर येण्यासाठीच्या समुपदेशनात सांगितल्या. ती याचा विचार करत होती. बदलासाठी प्रयत्न करत होती आणि या साऱ्या प्रयत्नांमुळे ती हळूहळू यातून बाहेर आली. तिनं स्वतःला सावरलं. ती पुन्हा पूर्वीसारखी नोकरी करू लागली. स्वतःच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग आता तिने स्वीकारला. त्याचा तटस्थ राहून विचार केला. ज्यातून तिच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तिची तिलाच मिळाली आणि ती शांत झाली आणि नव्याने आयुष्य जगण्यास सज्ज झाली.
(केसमधील नावे बदलली आहेत.)
- मानसी तांबे-चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com
(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)
(दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत)