Next
‘डान्स सीझन’अंतर्गत ‘रचनाबंध’ व ‘नृत्यमिती’ची प्रस्तुती
प्रेस रिलीज
Thursday, May 02, 2019 | 03:42 PM
15 0 0
Share this article:


पुणे : शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘डान्स सीझन २०१९’अंतर्गत मुद्रा कथ्थक नृत्यालयाने ‘रचनाबंध’ व ‘नृत्यमिती’ हे दोन कार्यक्रम सादर करण्यात आले. हिराबाग चौकातील जोत्स्ना भोळे सभागृहात हा कार्यक्रम झाला.

‘रचनाबंध’मध्ये नृत्य संरचनेचे सादरीकरण, तर ‘नृत्यमिती’मध्ये शास्त्रीय नृत्याकडे पाहण्याचा या क्षेत्रातील कलाकारांचा दृष्टीकोन याविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मुद्रा कथ्थक नृत्यालयाच्या लीना केतकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला.

‘रचनाबंध’ या कार्यक्रमात कथ्थक नृत्यांगना लीना केतकर यांनी ‘कर्ण– तेजमान पुत्र!’ व ‘नि:शब्दाच्या तळ्याकाठी...’  या दोन नृत्यरचना सादर केल्या. ‘कर्ण– तेजमान पुत्र!’ या रचनेत प्रत्येकाच्या मनात दडलेल्या कर्णाची वेदना, त्याग, त्याची स्वत:ला शोधण्याची धडपड व्यक्त करण्यात आली होती. कथ्थक नृत्यातील सूक्ष्म अभिनय, समर्पक संगीताचा वापर याद्वारे त्यांनी कर्ण साक्षात नजरेसमोर उभा केला. या रचेनेचे संगीत देवेंद्र देशपांडे यांनी दिले होते. ‘नि:शब्दाच्या तळ्याकाठी...’ या दुसऱ्या रचनेतून भारतीय तत्त्वज्ञानातील मौन सहज सोप्या पद्धतीने व नृत्यातून रंगमंचावर उलगडण्याचा प्रयत्न केतकर यांनी केला. भारतीय परंपरेत मौनाचा उद्गार घेऊन आलेले संत ज्ञानेश्वर, मौनाचा शास्त्रासारखा वापर करणारे महात्मा गांधीजी, तर मौनाच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारे गौतम बौद्ध हे रसिकांना नृत्याच्या माध्यमातून मौनाच्या विविध छटा दाखवून देणार ठरले. या वेळी लीना केतकर यांच्याबरोबर जुई रानडे, तनया रानडे, निकिता कारळे, भार्गवी सरदेसाई, शिवानी करमरकर, विदुला फराटे या कलाकारांनी सादरीकरण केले.

या नंतर ‘नृत्यामिती’ या चर्चासत्रात नृत्य कलाकार अरुंधती पटवर्धन, रसिका गुमास्ते, मंजिरी कारूळकर, नेहा मुथियान, मानसी वझे, लीना केतकर सहभागी झाल्या होत्या. या वेळी अरुंधती पटवर्धन यांनी आई व प्रसिद्ध नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांच्याकडून मिळालेल्या वारशाची जबाबदारी पेलणे व सतत नाविन्यपूर्ण गोष्टी रसिकांपुढे आणणे हे किती आव्हानात्मक आहे याबद्दल सांगितले. भरतनाट्यम् या शैलीतील कडकपणा व ओडिसी नृत्यातील अंग हस्तकांचे लालित्य सांभाळून दोन्ही नृत्यशैलींची वैशिष्ट्ये टिकवित रचना करणे कसे आवडते याबद्दल रसिका गुमास्ते यांनी माहिती दिली. मंजिरी कारुळकर यांनी भारती विद्यापीठातील नृत्याच्या अभ्यासक्रमास आलेले विद्यार्थी, त्यांची मानसिकता आणि त्यातून येत असलेला नृत्याचा दर्जा, यावर आपली मते मांडली. 

‘नृत्यमिती’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या डावीकडून अरुंधती पटवर्धन, नेहा मुथियान, रसिका गुमास्ते, मानसी वझे, मंजिरी कारूळकर, विदुला हेमंत आणि लीना केतकर.

नेहा मुथियान या गेल्या सहा वर्षांपासून नृत्यविषयक एक मासिक चालवित आहेत. हे करीत असताना पुण्यातील विद्यार्थिनी, गुरुंची लाभलेली मोलाची साथ, त्यामुळे आता डिजिटल दर्जाच्या नृत्य साहित्यात होत असलेली वाढ यावर आपल्या अनुभवांचे कथन केले. मानसी वझे यांनी नाटकाच्या शिक्षणातून एका संपूर्ण नृत्य कलाकृतीकडे पाहण्याची सवय कशी उपयोगी पडली व अभिनयाचा कसा उपयोग झाला याबद्दल आपले मत व्यक्त केले. विदुला फराटे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search