Next
वास्तवाला भिडणारी कविता
BOI
Tuesday, January 23, 2018 | 01:16 PM
15 0 0
Share this article:

चांदणं उन्हातलंसनदी अधिकारी असलेल्या डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे ‘चांदणं उन्हातलं’ आणि ‘आकांत शांतीचा’ हे दोन काव्यसंग्रह अलीकडेच आदित्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहेत. या काव्यसंग्रहांची ही ओळख...
........
सनदी अधिकारी असलेल्या डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे ‘चांदणं उन्हातलं’ आणि ‘आकांत शांतीचा’ हे दोन काव्यसंग्रह अलीकडेच आदित्य प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहेत. प्रशासनासारख्या ‘रुक्ष’ आणि ‘दक्ष’ अशा नियोजन क्षेत्रात काम करणाऱ्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने, फक्त प्रशासनाच्या लाल फितीमध्ये किंवा ‘जीआर’मध्ये अडकून न पडता, त्यात आपला प्रभावी ठसा उमटवून प्रतिभेच्या क्षेत्रातही विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने ‘हे शक्य आहे’ या त्यांच्या पुस्तकाला अलीकडेच कर्मवीर भाऊराव पाटील राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. एका अर्थाने त्यांच्या साहित्यविश्वाला या पुरस्काराच्या रूपाने लोकमान्यता प्राप्त झाली आहे.

‘चांदणं उन्हातलं’ आणि ‘आकांत शांतीचा’ या काव्यसंग्रहात सुमारे १३० कविता आहेत. या सर्व कवितांमधून भापकरांच्या प्रतिभेचा आवाका समोर उभा राहतो. ‘चांदणं उन्हातलं’ या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांची प्रस्तावना लाभली आहे. त्या प्रस्तावनेत त्यांनी भापकरांच्या कवितेवर अतिशय चपखलपणे भाष्य केले आहे. नवनिर्माणाची आस आणि पुरुषोत्तम भापकरांचा भारतीय सेवा प्रशासनातील विविध अनुभव या कवितांतून प्रांजळपणे उतरला आहे. मग ते तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांचे संदर्भ देऊनही आपल्या भावना शब्दबद्ध करतात, तर कधी गांधी, ज्ञानोबा, तुकोबा यांच्या दिंडी-पालखीतून त्यांचे विचार अवतरत असतात. भापकर हे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. म्हणून विठोबा व विठोबाचे गणगोत भक्त यांची दिंडी-पालखी, यापेक्षा तिथला टाळ-मृदंगातला शुद्ध सात्त्विक विचार महत्त्वाचा आहे. कुठेतरी जिजाऊ, अहिल्याबाई असे उल्लेख कवितेतून येणार, ते याच सामाजिक जाणिवेतून. समाज प्रदूषणमुक्त करायचा असेल, तर आजही याच थोरा-मोठ्यांच्या विचारांच्या जागरणाची आवश्यकता आहे. अलीकडे झेंड्या-झेंड्यानी वाढलेल्या व अकारण अवहेलना करणाऱ्या प्रयत्नांनी, तर कधी प्रसारमाध्यमांनी कवी हैराण झाल्यास, तेही व्यक्त करतो; पण संयतपणानं ‘गाव’ लहानपणी पाहिलेलं. त्याचं गावपण आज कुठे हरवून गेलंय. खूप त्रास अकारण सहन करावा लागतो. त्याच्या वेदना कविता संपूर्ण व्यक्त करू शकत नाही, इतक्या त्या तीव्र विखारी असतात. अशा वेळी -

माझ्याच समाधीला
फूल वाहिले मी
वंचितांच्या उत्थानाचे
गीत गायिले मी

अशा ओळींतून विचार प्रकट होतात. या अपमानाचे, यातनांचे आणि सेवेतल्या कडीबंद नियमांचे पालन करताना पायी फक्त काटेच रुतत जातात. तरी कवीने लिहिले -

कोसळू दे डोंगर
अन् उसळू दे सागर
रोखण्यात अधीर झाले
दोन्ही माझे कर

अशा फिरस्तीच्या जीवनातलं गारूड या कवितासंग्रहामध्ये आहे.

‘आकांत शांतीचा’ या काव्यसंग्रहाला कवी फ. मुं. शिंदे यांची पाठराखण मिळालेली आहे. ती फार बोलकी वाटते. ‘कोणाच्या मनाचा तसा अंदाज लागत नाही. एकाच वेळी आकांत आणि त्याचवेळी शांतीचा अनुभव ही मनाची अवस्था समजून घेण्याच्या भावना फार अस्वस्थ करून सोडणाऱ्या असतात. त्याच्या चाव्या कवीजवळ असतात. पुरुषोत्तम भापकर या कवीपाशी त्या चाव्या आहेत.

वाटलेले गाव आणि
विटलेली शीव आता
मला नको आहे

अशा धारणेचा आणि विचाराचा हा कवी आहे. त्याचा हा आकांत आहे! पाणी पेटण्याचा अनुभव काय ‘दुखलं मन शिकलं मन’ याचंच सार असतो. तिथे तो ‘एकटा मी’ असतो. जडल्या जिवालाही न्याय हवा असतो. कारण वाटा अर्ध्या असतात, तरीही मनभावन, श्रावण, श्वास सुखाचा-अभिमानाचा अनुभवता येतो. ‘जीवन पाणी रे पाणी, साठव थेंब पाणी, हे जगण्याचं सूत्र, गुलमोहर मोहरला’ या जाणिवेतच सुख पावतं, तोच घराचा निवारा असतो, तिथं घर हीच कविता असते. भापकरांची कविता समग्र काव्यप्रकारातून प्रकट झालेली आहे. त्यात संघर्ष आहे, उत्कर्ष आहे, कुचंबणा आहे, प्रतिकार आहे, लढा आहे, प्रस्थापित व्यवस्थेला दिलेला धडा आहे. प्रेम आहे, श्रृंगार आहे, अंगार आहे, भजन आहे, लावणी आहे, लावण्य आहे, कथा आहे, व्यथा आहे, भक्ती आहे, मुक्ती आहे, सर्वार्थाने अभिव्यक्ती आहे.

डॉ. पुरुषोत्तम भापकरकाव्याचे सर्वच प्रकार भापकरांनी हाताळले आहेत. मराठीमध्ये सूफी कविता प्रथमच भापकरांच्या कवितासंग्रहातून प्रकट झाली आहे. गवळणी, अभंग, देशभक्तीपर कविता, लोकजागरण करणाऱ्या कविता, त्याचप्रमाणे, निसर्गकविता, या सर्व काव्यप्रकारांतून भापकर व्यक्त झाले आहेत. चिंतनाची खोली त्यांच्या प्रतिभेला लाभलेली आहे. गझल प्रकारसुद्धा त्यांनी लीलया हाताळला आहे. संत आणि पंत परंपरेशी नाते सांगणारी कविता शाहिरी परंपरेचं नातंदेखील अधोरेखित करते. दोन्ही काव्यसंग्रह वाचावेत, गुणगुणावेत अशा प्रकारचे आहेत.

भारतीय प्रशासन सेवेतील एक अधिकारी! म्हणजे वेळ आणि कायदा, शिस्त यांनी बंदिस्त असलेलं एक व्यक्तिमत्त्व, असंच चित्र साधारणपणे आपल्या डोळ्यांसमोर येतं. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजे तो कायमच गंभीर चेहऱ्याचा आणि अरसिक असतो, असा एक गैरसमज आपल्याकडे आहे. पुरुषोत्तम भापकर यांनी हा गैरसमज मोडून काढला आहे. प्रशासकीय कौशल्यांसोबतच अत्यंत सूक्ष्म अशी जाणीव सोबत ठेवून त्यांनी रसिकता जोपासली आहे. ‘चांदणं उन्हातलं’ आणि ‘आकांत शांतीचा’ हे दोन्ही काव्यसंग्रह पाहिले म्हणजे याची खात्री पटते.

‘चांदणं उन्हातलं’ हा तसा त्यांच्या पहिल्यावहिल्या काही कवितांचा काव्यसंग्रह आहे, सोबतच ‘आकांत शांतीचा’ हा काही नव्या-जुन्या कवितांचा संग्रहही प्रकाशित झालेला आहे. दोन्ही कवितासंग्रहांच्या नावातच सारं काही सामावलं आहे. लक्ष्यार्थ घेतला, तर दोन्हीही काव्यसंग्रहांच्या नावातले शब्द एकमेकांच्या विरुद्ध आहेत, असे जाणवते. भर उन्हातही शीतलता देणारं चांदणं आयुष्यात यावं आणि त्याच्या स्पर्शाने लेखणीलाही पाझर फुटावा अशाच काही कविता या काव्यसंग्रहामध्ये आहेत. ‘आकांत शांतीचा...’ वास्तविक शांतीचं सूक्त असू शकेल किंवा शांत रसाच्या निर्झरी घेतलेला एकांतवासाचा अनुभवही असू शकेल; पण शांती जेव्हा अस्वस्थ करणारी असते किंवा ती अंतरीची शांती नसून उद्रेकाला दाबून टाकणारी शक्ती असते, तेव्हा तीच शांती आकांत करीत व्यक्त होत जाते. या दोन्ही काव्यसंग्रहांतील कवितांचं वाचन करताना हे अगदी पदोपदी जाणवतं.

या सहज स्फुरलेल्या कविता आहेत आणि त्यासाठी कुठल्याही साचेबद्धपणात स्वतःला बांधून घेण्याचा नकार कवीने दिला आहे हे अगदी सहज लक्षात येतं. काव्यात कवीचं नवखेपण जाणवत असलं, तरीही भावनेच्या अभिव्यक्तीतलं सरावलेपण मात्र लपून राहत नाही. त्यात एक सहजता आहे. रचनेच्या आराखड्यातून मुक्त झालेली कविता, असं त्या लेखनाचं वर्णन करता येईल; पण म्हणून काही तरी लिहून मोकळं होण्याचा भाव त्यात अजिबात नाही. मुक्तछंदाची जाणीव पदोपदी होत असली, तरीही अभंग आणि ओव्यांची सुलभता आणि गोडवा मात्र दिसून येतो. जात्यावर बसावं आणि दळण दळता दळता ओठांवर ओवी यावी, त्या लेखनासाठी केवळ अंतरीचा भाव सजग असावा, लौकिक शिक्षणाच्या काटेकोरपणातून शब्दरचनेची मुक्तता व्हावी, इतकी सहजता या रचनेमध्ये आहे.

‘चांदणं उन्हातलं..’मधली पहिलीच रचना अशी आहे -

पाय माझाच खोलात
दोष हाच जन्मजात
किती घातला आत
निघाला कोरडाच हात

या ओळी पाहिल्या, की कवितेचा नेमका सूर लक्षात येतो. ‘उतू नये, मातू नये घेतला वसा टाकू नये,’ची एक भावना त्यामागे दिसून येते. कितीही अपयश आले, तरीही समोर ठेवलेल्या ध्येयापासून दूर न सरण्याचं आव्हान पेलण्याची एक शक्ती अंतरंगामध्ये असल्याची ती एक अनुभूती आहे. होणाऱ्या प्रत्येक विरोधाला दूर सारण्याची हिंमत त्यामध्ये आहे.

छिन्नविच्छिन्न झालो तरी
दिलेशिर उखळात
झेलतो मी आव्हानांस
श्वापदांच्या कळपात 

आयुष्य हे आव्हान पेलण्यासाठीच असते, याची ही जाणीव आहे. पुढे ‘पोटापुरते..’, ‘कळला भाव’, ‘मुखडे आणि चेहरे’ अशा कवितांमधून आपल्याला कवीचे मानस उलगडत जाते. मी आणि माझे, माझे कुटुंब अशा सुखाच्या कल्पनांना कवटाळून स्वांत सुखाय जगणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध त्यांनी शब्दांची मोहीम उघडली आहे. ‘सावरले मी तोल’, ‘सुगी’, ‘शोध सुखाचा’ ‘मुक्त मी, संपृक्त मी’ या कविता जशा सकारात्मक भावचिंतनाच्या आहेत, तशाच किंचितशा आध्यात्मिक सुखाची जाणीव करून देणाऱ्याही आहेत. ‘मुक्त मी संपृक्त मी’मध्ये हे अगदी सरळसरळ दिसते.

झोपून झोपडीत माझ्या
मस्तीत मी झालो दंग
उजळल्या दाही दिशा
मागे उभा पांडुरंग

असे कवी अगदी स्पष्टपणे सांगत आहेत; पण हा पांडुरंग टाळ चिपळ्यांच्या संगे गायले जाणारे अभंग ऐकणारा असला, तरीही तो जनमानसामध्ये मुरलेला एकात्म असा चैतन्यभाव आहे. ‘डोळ्यांचे पारणे फिटले’ या कवितेतही असाच सर्वात्म विठ्ठल डोकावताना दिसतो. आणि असाच ईश्वर भाव ‘जादूई सकाळ’ या कवितेच्या अंतिम ओळीत दिसून येतो.

नकाशा मी कोरला मनी
विश्वास दाटला आहे.  
ईश्वराचा जेथे तेथे
हमखास वास आहे

खरे तर या रचनेला कविता न म्हणता ती गझलसदृश रचना आहे. शबाब, शराब आणि अध्यात्म हे तीनही विषय गजलेला वर्ज्य नाहीत. ‘भावबंध’, ‘शस्त्र आणि अस्त्र’, ‘जोगवा’ आणि ‘जय हो’, ‘प्रेरणा’ या महाराष्ट्राच्या मातीच्या कविता आहेत, असे मानायला हरकत नाही. ‘जेव्हा लढली माय, असुरांची नाही गय. भक्तांना कसले भय, ऊर्मी त्यांची जागवा...’ या ‘जोगवा’मधल्या ओळी नक्कीच प्रेरणादायक आहेत. यामध्ये जोगवा या मातृभूमीसाठी मागितलेला असला, तरीही तो जोगवा तिच्या भक्तांनी आपल्या त्यागाच्या साह्याने वाढायचा आहे. अनेक कविता समर्पणाच्या भावाच्या आहेत; पण एखाद-दुसरी कविता मात्र भक्तिसूक्ताप्रमाणे दिसून येते. ‘प्रभा भास्कराची’ ही कविता अशीच आहे.

जे जे हवे तुज, 
ते ते माझ्याकडून घे
तृषार्त या धरणीला, 
अर्घ्य पावसाचे दे

या शब्दांतच सारे काही सामावलेले आहे. ‘व्यथा आणि कथा’, ‘रंगला विडा’, ‘बीज अमृताचे’, ‘चांगभलं’ अशा अनेक कवितांचा समावेश काव्यसंग्रहामध्ये आहे. या सगळ्या कवितांचा आस्वाद प्रत्यक्ष काव्यसंग्रह वाचून घेणे जास्त श्रेयस्कर. कारण कवितांच्या संपूर्ण रचनेतून कवीची भेट होत असल्याचा प्रत्यय येतो. ‘चांदणं उन्हातलं’ याच शीर्षकाची कविता या प्रवासामध्ये आपल्याला भेटते.

चांदणे उन्हातले आज मला भेटायला आले
राहिले तेवढे सारे पांग फिटायला आले. 

हे सांगता सांगता
बंध होते चांगले घट्ट होते बांधले
पावसाचा वाढतो जोर तुटायला आले...

असे कवी अगदी सहजपणे सांगून जातात. ‘चांदणं उन्हातलं’ या काव्यसंग्रहातली प्रत्येक कविताही कवीच्या केवळ अंतर्मनातलीच आहे, असे नाही, तर प्रत्येक भाव कवीला कुठल्या ना कुठल्या वळणावर भेटल्याप्रमाणे त्याचे रेखाटन केलेले आहे. कविता स्वानुभवातून सहजपणे बाहेर आलेली आहे, हे दिसून येते.

‘आकांत शांतीचा’मध्ये पहिलीच कविताही या मथळ्याची आहे.

हा खेळ तत्त्व-न्यायाचा, झाला अघोरी अन्यायाचा
परका आणि पारखा, झाला माणूस पोरका..

जगण्यातील काहूर जेव्हा असह्य होते, तेव्हा अशी भाषा कवीच्या ओठावर येते आणि आपसूकच हे सारे अन्याय झालेला माणूस सारे काही धिक्कारतो आणि क्रांतीच्या वाटेवर जातो..

घट्ट मूठ ही वज्राची, मनगटात ओतले प्राण
आसमंत भेदणार आता, माझा बिगुल क्रांतीचा..

ही आता जगण्याची विजिगीषा नव्याने उन्मेषात आल्याची स्थिती आहे. याच काव्यसंग्रहामध्ये असलेल्या ‘एकटा मी’, ‘अपयशाचे खापर..’ या कविता म्हणजे जगताना वाट्याला येणाऱ्या विरोधाभासाचे रेखाटन आहे. दुःख आणि दारिद्र्य यामुळे होणाऱ्या वेदना आणि नीती-अनीतीने जाणाऱ्या समाजाचं रेखाटन त्यामध्ये करण्यात आलेलं आहे. ‘बाप’ ही कविता काहीशा वेगळ्या अंगाने मराठीच्या काव्यदालनामध्ये आलेली आहे, असे समजायला हरकत नाही. अशा फार मोजक्या कविता आहेत, ज्या बाप या विषयावर आहेत. बहुतेक साऱ्या कवितांतून आईच डोकावताना दिसते. ही एका थकलेल्या बाबाची कहाणी आहे, असे समजायला हरकत नाही. इथे सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे हा ‘बाप’ विषय ‘सामान्य’ आहे. सर्वांच्या सहज अनुभवाला येणारा आहे. कारण ‘श्वास उसळलेला, रक्त खवळलेला, अपमान गिळलेला, पराक्रमही त्याच्यात मी अमाप पाहिला होता’ ही अंतिम ओळ सर्वांच्याच अगदी परिचयाची आहे. या काव्यसंग्रहातील ‘गात मी आहे..’ ही कविता एक युटोपिया... स्वप्नरंजन आहे. आत्यंतिक अशा स्वप्नाळू वृत्तीचे ते प्रतीक आहे. कवितेतील ‘तू’ कोण आहे याविषयी प्रत्येक वाचक वेगवेगळा अंदाज लावू शकतो. ‘गीत तुझेच नित्य, बोल तुझेच सत्य, अनित्य जरी आहे, खरे भासत आहे..’ या ओळीवरून तरी हे स्वप्नरंजन एका सत्याच्या... शाश्वताच्या शोधाचे आहे, हे दिसून येते. अशा बऱ्याच कविता अधूनमधून या काव्यसंग्रहामधून डोकावताना दिसतात. ‘रास चांदण्याची’, ‘मी जगणार कसा?’, ‘इथे तू तिथे मी..’, ‘माझ्या श्वासात तू..’ या साऱ्या कवितांतून असेच स्वप्नरंजन अधूनमधून डोकावताना आपल्याला दिसते.

याच काव्यसंग्रहामध्ये ‘उधळले डाव..’ ही कविता रचनेच्या दृष्टीने पाहता गझलेकडे जास्त झुकते; पण ती गझल नाहीये. ‘वस्त्रांचा बडेजाव अन् गर्द सालीची हाव, खुबीने उधळले सारे मी रचलेले डाव..’ हा आकृतिबंध कवितेपेक्षा गझलेकडे जास्त झुकताना दिसतो. अशा काही कवितांच्या गझला झाल्या, तर रसिकांना त्या अजून जास्त भावतील. ‘जडला जीव’, ‘हुतात्मा’, ‘नको आहे..’ या कविता खरे तर कवीच्या मनात दडलेला एक आक्रोश आहे. ‘वाटलेले गाव आणि विटलेली शिव आता मला नको आहे..’ या शब्दांत कवीने दृश्याचा आलेला उबग स्पष्ट केला आहे. हा केवळ स्थिती वा परिस्थितीचा विरोध नाहीये, तर भोगाव्या लागणाऱ्या वेदनांचा अंतःकरणातून आलेला विद्रोह आहे. तो शब्दांतून व्यक्त होऊन वाचकांच्या अंतःकरणाला जाऊन भिडावा, ही कवीची मनापासून इच्छा आहे. अशाच विटलेल्या भावनांची अभिव्यक्ती ‘पाणी पेटत आहे,’ या कवितेतही दिसून येते. ‘मी भारतीय’, ‘महाराष्ट्र माझी आण..’, ‘ध्यास आमुचा गुणवत्तेचा..’, ‘ग्रामस्वप्न,’ ‘मी वंदीन महाराष्ट्राला’, ‘जय महाराष्ट्र’ या कविता सरळसरळ मराठी कातळाच्या कविता आहेत. यात केवळ मराठी भाषेचा वा माणसाचा गौरव नसून, महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित त्यातून व्यक्त करण्याचा एक प्रयत्न दिसून येतो.

‘श्रद्धाळू’, ‘विठ्ठलाच्या दरबारी’, ‘हुंकार रुक्मिणीचा,’ ‘दिंडी चालली’, ‘विठ्ठल त्याचे नाम’, ‘वारीत चाललो मी’, ‘राऊळात पिकला मळा..’ वगैरे कविता या महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेशी समांतर नातं व्यक्त करणाऱ्या आहेत. महाराष्ट्राची मातीच अशी आहे, की इथला कुठलाही माणूस कितीही उच्च स्थानी गेला, तरी त्याचे पाय मात्र पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्याप्रमाणे मातीचेच असतात. या साऱ्या कविता नुसत्या भक्ती व्यक्त करणाऱ्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या मातीशी आपले नाते व्यक्त करणाऱ्या आहेत.

‘चांदणं उन्हातलं’ आणि ‘आकांत शांतीचा’ हे दोन्ही काव्यसंग्रह आदित्य प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहेत, ही बाब प्रकाशनासाठी फार गौरवाची आणि महाराष्ट्राच्या कविताविश्वाशी प्रकाशनाचे नाते आहे, हे सिद्ध करणारी आहे. भावांची अभिव्यक्ती आणि सरलता याबाबतीत कुठेही कविता कमी पडते असे दिसत नाही. उलट अभंग ओव्यांच्या आणि गाथेच्या परंपरेतील एक सहजता त्यामध्ये दिसून येते. दोन्ही काव्यसंग्रह एकाच वेळी रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल कवी पुरुषोत्तम भापकर आणि आदित्य प्रकाशनाचे विलास फुटाणे हे दोघेही अभिनंदनास पात्र आहेत. 

काव्यसंग्रह :
- चांदणं उन्हातलं
- आकांत शांतीचा
कवी : डॉ. पुरुषोत्तम भापकर
प्रकाशक : आदित्य प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठे (प्रत्येकी) : १०४
मूल्य (प्रत्येकी) : १०० रुपये
संपर्क : (०२४०) २३५४५४२, ८०८७७ ३१८९८

(हे दोन्ही काव्यसंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search