Next
नाशिकमध्ये रुजतेय ‘अंकुर गणेशा’ची संकल्पना
डॉ. अमोल कुलकर्णींचा पर्यावरणपूरक प्रयोग
BOI
Saturday, August 31, 2019 | 04:02 PM
15 0 0
Share this article:नाशिक :
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती पर्यावरणासाठी घातक असतात, हे सर्वज्ञात आहे. शाडूच्या मातीच्या मूर्तीही पर्यावरणासाठी संपूर्णतः पूरक नसतात. कारण ती माती स्थानिक मातीत पूर्णतः मिसळून जात नाही. या पार्श्वभूमीवर, नाशिकमधील डॉ. अमोल कुलकर्णी यांनी स्थानिक मातीपासून तयार केलेल्या ‘अंकुर गणेशा’ची संकल्पना मांडली आहे. या मातीत बीज मिसळलेले असल्याने मूर्ती विसर्जनानंतर त्यातून रोपे अंकुरतात. गेल्या पाच वर्षांत या संकल्पनेला मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे. 

नाशिक रोड परिसरातील जेलरोड येथील डॉ. अमोल कुलकर्णी मानसोपचारतज्ज्ञ आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तींचे पाण्यात विघटन होत नाही. त्यामुळे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी तलाव किंवा नदीच्या किनारी अनेक गणेशमूर्तींची विटंबना झालेली पाहावी लागते. त्यामुळे जलप्रदूषण होऊन नदीतील जीवसृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. ही बाब डॉ. कुलकर्णी यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्यांनी याबाबत समाजमनात परिवर्तन घडवून आणण्याचे निश्चित केले. ‘पीओपी’पेक्षा शाडू मातीच्या मूर्तीचे महत्त्व व गरज पटवून देण्यासाठी त्यांनी शाळा, महाविद्यालये व ओळखीच्या लोकांमध्ये प्रबोधन केले. हळूहळू लोकांनाही ते पटते आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी हा विचार सर्वदूर पोहोचवण्याचे निश्चित केले. 

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘मूर्ती बनवणे, नैसर्गिक रंग तयार करणे याचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण न घेता केवळ एकलव्याच्या ध्यासातून मी ही कला आत्मसात केली. सध्या बाजारात शाडू मातीची मूर्ती म्हणून लोकांची सर्रासपणे फसवणूक केली जाते. अशा वेळी केवळ पर्यावरणपूरक मूर्तींचा प्रसार, प्रचार व प्रबोधन महत्त्वाचे नसून, पर्याय उपलब्ध करून देणे ही नैतिक जबाबदारी आहे. आम्ही शाडू मातीसह नैसर्गिक रंगाचा वापर करतो. माझ्यासह पत्नी वृषाली आणि प्रशांत बेलगावकर अशा तिघांनी सुरू केलेल्या चळवळीत पुढे अर्चना गुंजाळ, सुनीता जानोरकर, दीपक दिघे, गणेश डांगी यांच्यासह मुलगा श्लोक, मुली स्वरा व अनन्या यांचा सहभाग आहे.’ 

‘लेह-लडाख येथील पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्याशी माझी भेट झाली. त्या वेळी त्यांनी ‘शाडूच्या मातीला पर्यावरणपूरक म्हणावे का,’ असा प्रश्न उपस्थित केला. अधिक खोलात गेल्यानंतर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. मुळातच शाडूची माती ही आपल्या प्रदेशातील नसून, ती गुजरात, राजस्थानमधील आहे. महाराष्ट्रातील मातीत तिचे मिश्रण होऊ शकत नाही. शिवाय शाडू मातीत अंकुरण क्षमता नसते. मग एखाद्या प्रदेशातील माती आपल्या सण-उत्सवांसाठी उत्खनन करून टना-टनांनी अशा प्रदेशात आणणे, ज्या प्रदेशाच्या परिसंस्थेमध्ये त्या मातीला काहीही स्थान नाही, त्या मातीचा उपयोग नाही. अशा मातीचे पुढे करायचे काय? म्हणजे पुन्हा पर्यावरणाचा समतोल ढासळला जाण्याची शक्यता वाढते. त्यातून आपण एका वेगळ्या प्रश्नाला जन्म देतोय, ही बाब लक्षात आली. त्यानंतर सजग होऊन आपल्याच मातीतून गणपती बनवण्याचे ठरवले आणि त्यातूनच ‘अंकुर गणेश’ ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवली,’ असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

गेल्या पाच वर्षांपासून गंगापूर, कश्यपी धरणातून माती आणून त्यावर प्रक्रिया करून डॉ. कुलकर्णी आणि त्यांची टीम अंकुर गणेशमूर्ती तयार करते. या मूर्तींमध्ये फुलझाडे व फळभाज्यांचे बियाणे टाकले असल्याने मूर्तीचे विसर्जन बादली अथवा पिंपात न करता घरातल्या कुंडीतच केले जाते. त्यामुळे गणपतीच्या मूर्तीतील बीज अंकुरते व झाडाच्या रूपात गणपती वर्षभर आपल्याच घरात वास्तव्य करतात. ही भावना भक्तांना आनंद देणारी आहे. त्यामुळे डॉ. अमोल कुलकर्णींच्या या संकल्पनेला नाशिक जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभत आहे. याचे अनुकरण सर्वांनी करायला पाहिजे, असे डॉ. अमोल कुलकर्णींचे आवाहन आहे.

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ashvini Datir About 2 Days ago
जर 50% शेताची माती आणि 50% शाडू मातीचा वापर करून मुर्ती तयार करुन घरी कुंडीत बीज रोपण केले आहे. तर त्याचे परिणाम कसे असेल ते सांगा.
1
0
BDGramopadhye About 16 Days ago
People who specialize in Marketing may be able to help .
0
0

Select Language
Share Link
 
Search